आज महिला दिन. महिला दिन म्हणून सर्वच महिलांना भरभरून सोशल मीडियावर मेसेजेस मिळतील. शुभेच्छा दिल्या जातील. काही महिलांचा सन्मानदेखील केला जाईल पण फक्त
आजच्या दिवसापुरताच का?
आधुनिक जगात शिक्षणाने आत्मनिर्भर झालेल्या स्त्रिया आणि जगाची बदलती विचारसरणी यावर आधारित 8 मार्च या दिवसाला राष्ट्रीय महिला दिन घोषित करण्यात आले. त्या पद्धतीने महिलांचा त्या दिवशी सन्मान केला जातो. त्यांना शुभेच्छा दिल्या जातात. मात्र, इतर दिवसाची परिस्थिती आहे तरी काय…
सर्वच पुरुष खरंच महिलांचा सन्मान करतात का? त्यांना आत्मनिर्भर समजतात का? आणि त्यांना रोजच सुरक्षित वाटेल असं वातावरण निर्माण करून देतात का, हा प्रश्न उठतो. कारण वाढते लैंगिक अत्याचाराचे प्रमाण, बलात्कार, किडनॅपिंग आणि त्यासोबतच यानंतर अधिकृतपणे तिची केली जाणारी हत्या.
गेल्या काही दिवसांत अगदी कोवळ्या वयातल्या मुलींपासून ते वृद्धांंपर्यंतसुद्धा बलात्कारासारखी प्रकरणं व्हायला लागलीत. त्यांचं प्रमाण हे कमी होण्याऐवजी वाढतच चाललंय. त्यामुळे प्रश्न पडतो की, महिला किती आणि कशी सुरक्षित आहे आणि महिलेसोबत कधीकधी असे प्रकार घडल्यावर अनेक प्रश्नही समाजात उपस्थित केले जातात जसे की,
स्वतंत्र विचारशैली.
अवेळी इतर ठिकाणी वावरणं.
कपडे आणि राहणीमान.
अशा या भडिमार आरोपांनी तिच्यावर होणार्या अन्यायाच्या वाटांना चुकीची चाहूल तर मिळत नाहीये ना? मला मान्य आहे की, कुठलीही गोष्ट अति आणि अवाजवी प्रमाणात झाली तर त्याचे नुकसानच होते. मात्र, एकंदरीत जर विचार केला तर असे प्रकार सर्वच पुरुष नाही करत. अनेक महिलांना बाहेर पडल्यावर अनुभव येतात की, आपल्या आजूबाजूची पुरुष मंडळी काही अशी असतात, जी महिलांचा प्रचंड सन्मान करतात. त्यांना प्रोत्साहन देतात. सहाय्य करतात आणि अगदी सकारात्मक वागणूकदेखील देतात, पण तेच काही क्षेत्राुत महिलांना व आवरताना असेही दिसून येते की, तिच्या उडणार्या पंखांना अडवण्यासाठी काही नजरा तिच्या अवतीभवती भिरभिरत असतात, पण शिक्षणाच्या शस्त्रांनी तिला इतका मजबूत केलेलं असतं की, ती त्या गोष्टींसाठी लढायला समर्थ असते, पण नकळत ती कधीतरी एखाद्या दृष्ट प्रवृत्तीला बळी पडते आणि आपलं सर्वस्व गमावून बसते. अतिरेक तेव्हा होतो जेव्हा गोष्टी लैंगिक अत्याचारापर्यंत न थांबता तिच्या हत्येपर्यंत येतात. आपल्या सनातन संस्कृतीप्रमाणे महिलांचा सन्मान करणे, त्यांचा आदर करणे, हे आपले संस्कार होय. नाजूक भावनेचा संस्कारांचा स्रोत आहे. तिला समाजात एक सुरक्षित आणि सन्मानाचा आयुष्य मिळवून देण्याचं आणि त्या पद्धतीने तिला जगू देण्याचे प्रयत्न हे प्रत्येक समाज बांधवाकडून अपेक्षित असतं, पण वाढत्या गुन्हेगारीचे प्रमाण कधीकधी या गोष्टींना तोडून त्या स्त्रीसाठी तिचं आयुष्य अगदी नरक बनवून सोडतात.
महिलांनी आत्मनिर्भर, पण त्यासोबत त्यांनी आपल्या आत्मसुरक्षिततेसाठी काही गोष्टी आवर्जून करणे गरजेचे आहे. शिक्षणाने तुम्ही आर्थिकदृष्टया जसे खंबीर होता तसे स्वसंरक्षण करण्यासाठीदेखील खंबीर झाले पाहिजे. जेणेकरून महिला दिन आणि त्या दिवसाचा मिळणारा सन्मान हा फक्त त्या दिवसापुरताच नाही, तर कायमचा आपल्या आयुष्यावर त्याचा ठसा उमटवता येईल.
महिलांना फक्त थोडंसं कौतुक, प्रोत्साहन आणि प्रेम गरजेचं असतं. ते प्रत्येक घरातल्या, परिवारातल्या व्यक्तींनी तिला दिलं तर तिला प्रत्येक दिवस हा महिला दिनाइतका सुंदर वाटेल. आपल्या अवतीभवती महिला अगदी सुरक्षित आणि सुखी असतील तर तुम्ही एक सुजाण आणि कर्तबगार नागरिक आहात असे प्रत्येक महिलेला वाटेल.
No good wishes; I want a safe environment…