सरासरीपेक्षा 4 ते 5 अंश जास्त तापमान; पुन्हा अवकाळीचे संकट
नाशिक : विशेष प्रतिनिधी
मार्च महिन्यात सामान्यतः थंड रात्री व उबदार दिवस अनुभवणार्या उत्तर महाराष्ट्राला यंदा असाधारण उष्णतेचा तडाखा बसला आहे. नाशिक, धुळे, नंदुरबार आणि जळगाव या जिल्ह्यांमध्ये तापमान झपाट्याने वाढले असून, अनेक ठिकाणी पारा 40 अंशांच्या जवळ पोहोचला आहे. अनेक भागांत यापुढेही 38 ते 40 अंशांपर्यंत तापमान राहण्याचा अंदाज कायम आहे. दरम्यान, नाशिकमध्ये सरासरीपेक्षा 4 ते 5 अंश जास्त तापमान असून, हवामान विभागाने उत्तर महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तविली आहे. यामुळे आधीच अडचणीत असलेल्या शेतकर्यांवर पुन्हा अवकाळीचे संकट दाटले आहे.
गेल्या 24 तासांत नाशिक शहरात सरासरी 37.8 अंश, मालेगावमध्ये 39.4 अंश, जळगावमध्ये 40.4 अंश, तर अहिल्यानगरमध्ये 37.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. धुळे जिल्ह्यात तापमानाचा पारा 39 अंशांच्याही पुढे गेला आहे.
नाशिक शहरातील कमाल तापमान मार्चच्या पहिल्या आठवड्यातच 37.1 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले होते, तर किमान तापमान 16 अंशांवर नोंदविण्यात आले. नाशकात वाढत्या उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले असून, दुपारच्या सुमारास शहरातील बहुतांश प्रमुख रस्त्यांवरील वर्दळही कमी झाल्याचे दिसून येत आहे.
सरासरीशी तुलना
नाशिकमध्ये मार्च महिन्याच्या पहिल्या दोन आठवड्यांच्या काळात सरासरी कमाल तापमान 32.3 अंश सेल्सिअस राहते, तर महिन्याच्या मध्यात ते 33.6 अंशांपर्यंत पोहोचते. यंदा मात्र नाशिक शहरात उष्मा 37 ते 38 अंशांवर पोहोचला आहे. म्हणजे सरासरीपेक्षा तापमान तब्बल 4 ते 5 अंश जास्त आहे. यंदा मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच नाशिक, धुळे, जळगाव व नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये तापमानात सातत्याने वाढ होत आहे. मार्चच्या सुरुवातीपासूनच नाशिकमध्ये दिवसाचे सामान्य तापमान 33 ते 35 अंश राहत आहे, जे यंदा सातत्याने ओलांडले जात आहे. पुढील काही दिवस नाशिकमध्ये दिवसा 34 ते 37 अंश सेल्सिअस तर रात्री किमान 19 ते 22 अंश सेल्सिअस तापमान राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
हवामान विभागाचा इशारा
हवामान विभागाने गेल्या आठवड्यात नाशिकसह पालघर, ठाणे, जळगाव, धुळे, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, जालना, अकोला आणि अमरावती या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला होता. लेटेस्ट हवामान अंदाजानुसार, जळगाव, नाशिक, अकोला, अमरावती आणि बुलढाणा येथे उष्णतेच्या लाटेसदृश स्थिती कायम राहण्याचा इशारा देण्यात आला होता. उत्तर महाराष्ट्रात सध्या उन्हाची तीव्रता कायम असली तरी 15 मार्चपासून या भागात हलक्या पावसाची शक्यता असून, वातावरणात काही प्रमाणात बदल होऊ शकतो, असे हवामान विभागाने सांगितले.
नागरिकांसाठी खास सूचना
♦ नाशिक, मालेगाव, जळगाव, धुळे – दुपारी 12 ते 4 या वेळेत शेतावर जाणे टाळावे.
♦ द्राक्ष व कांदा उत्पादकांनी सकाळीच शेतकाम आटोपावे.
♦ पिकांना दुपारच्या वेळी आवश्यक असल्यास तुषार सिंचनाचा वापर करावा.
♦ भरपूर पाणी व ओआरएस श्रमाच्या कामासाठी बाहेर जाताना सोबत बाळगावे.
♦ 15-16 मार्चला संभाव्य वादळी पाऊस-शेतमालाचे व उभ्या पिकांचे संरक्षण करावे.
♦ वृद्ध व लहान मुलांना उन्हात बाहेर नेणे टाळावे.
शेतकर्यांवर दुहेरी संकट
उत्तर महाराष्ट्रातील कांदा, द्राक्ष, टोमॅटो, ज्वारी व गहू या पिकांसाठी मार्चमधील अशा तीव्र उष्णतेचा परिणाम विपरीत होत आहे. धुळे जिल्ह्यात तापमान 39 अंशांपुढे गेल्याने फुलांच्या उत्पादनात घट झाली असून, फुलांच्या हारांच्या किमतीत पाच रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. लग्नसराई सुरू असल्याने फुलांच्या किमतीत आणखी भर पडली आहे.
काय असेल पुढची स्थिती?
15 व 16 मार्च रोजी धुळे, जळगाव, नाशिक, पुणे, अहिल्यानगर, सातारा, सांगली, कोल्हापूर व सोलापूर जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी गडगडाटी स्वरूपाच्या किरकोळ पावसाची शक्यता आहे. हवामानतज्ज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांच्या मते, 16 मार्चपर्यंत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस, विजांचा कडकडाट आणि वादळी वारे होण्याची शक्यता आहे. मात्र, हा अवकाळी पाऊस उष्णतेपासून कायमस्वरूपी दिलासा देणार नाही; उलट शेतकर्यांच्या रब्बी व उन्हाळी पिकांना त्याचा फटका बसण्याची भीती कृषी विभागाला आहे.