माझं वय काय झालंच नाही!

माझं वय काय झालंच नाही!

लेखिका: सुजाता येवले

एका उच्चशिक्षित, उच्च विद्याविभूषित वधुवर परिचयाच्या सोहळ्याचे आमंत्रण होते. अजून पर्यंत मंत्र्यांची टाईम बाधा न झाल्याने वेळेच्या आधी जाऊन पोहोचले. अहो आश्चर्यम! चहा नाश्त्याचा आस्वाद घेत उच्च विद्या विभूषितांच्या घोळक्या शेजारी जाऊन उभे राहिले. सगळेच एकमेकाची ओळख काढत किती साली पास आऊट, वर्क एक्स्पेरियन्स विचारत उभे होते. त्यांची खाण्यापिण्यापासून ते बोलण्या वागण्यापर्यंतचे वेल सोफेस्टीकेटेड मॅनर्स, चेहऱ्यावरचे शिक्षणाचे, विद्वत्तेचे तेज बघून माझ्यासारखी मोकळी ढाकळी व्यक्ती सुरुवातीला संकोचली, नंतर बावरली. आणि चेहऱ्यावरचे तेज सोडून मी पण त्यांच्यासारखेच खाणे पिणे, बोलणे ट्राय करू लागले. पण ओम फस्स! त्यांचे पास आऊट होण्याचे वर्ष बघून एकेक आश्चर्याचा धक्का बसत होता. माझ्यासारख्या सामान्य मानसशास्त्राच्या प्रोफेसर ला बोलवण्याचा हेतू लक्षात येत नव्हता. पण त्यांच्या गप्पांमधून त्यांची सायकॉलॉजी जाणून घेण्याचा जरूर प्रयत्न करत होते. आजूबाजूला अनेक घोळके उभे होते. लग्नाळू मुलांचे मोठे बंधू घरातील जेष्ठ व्यक्ती असाव्यात. कार्यक्रम सुरू झाला एक एक लग्नाळू (मुले आणि मुली सुद्धा) स्टेजवर येऊन त्यांचा परिचय करून देऊ लागले. शिक्षण आणि जॉब प्रोफाइल बघता म्हणजे ऐकताना छाती दडपत होती. जन्म तारखांवरून वयाचा अंदाज लावताना आमचा मानसशास्त्रीय मेंदू दडपत होता. मुलींचेही वय कमीत कमी बत्तीस तेहतीस च्या पुढचेच होते. स्टेजवर एक अडतीस वर्षाची कमीत कमी दहा डिग्रीधारक फॉरेनची नवयुवती इंडियन डॉक्टर उभी होती. अत्यंत आकर्षक चेहरा, नाजुक बांधा, बोलणे अतिशय आत्मविश्वास पुर्वक. थोडक्यात परिचय खूपच इम्प्रेसिव्ह वाटला. बऱ्याचशा लग्नाळूच्या माना उंचावल्या. बऱ्याचशा लग्नाळुंच्या चेहऱ्यावर स्त्रीसुलभ मत्सर दाटला. शेवटी तिने तिच्या अपेक्षा सांगितल्यावर बऱ्याचशा लग्नाळूचे हात टायच्या बोवर स्थिर झाले. परिचयाच्या शेवटी वय समजले आणि बोवरचे हात आपसूक खाली आले स्त्रीसुलभ मत्सराचे भाव स्त्रीसुलभ कुत्सिकपणात परावर्तित झाले.
नंतर असे अनेक परिचय ऐकले. कार्यक्रम संपला. किती प्रमाणात यशस्वी झाला माहित नाही. मात्र वयाच्या संदर्भातला भुंगा माझ्या मेंदूत सोडून गेला. वयाच्या बावीसव्या वर्षातच माप ओलांडून घरात आलेली मी सासर माहेरची उस्तवार करता करता दोन लेकरांना जन्माला घातले. त्यादरम्यानच सायकॉलॉजीची डिग्री पूर्ण करत कॉलेजमध्ये रुजू देखील झाले. प्रायोगिक ज्ञानावर भर म्हणून स्वतःची प्रॅक्टिसही सुरू केली होती. दरम्यान विवाहविच्छेद करू इच्छिणाऱ्यांना समुपदेशकाची भूमिकाही खूप उत्तमरीत्या (माझ्या मते) पार पाडली. पण आजचे विवाह इच्छुकांचे वय स्तिमित करणारी नक्कीच होते. आमच्या संगोपणातली आई वडिलांची भूमिका आठवली. वयाच्या चौदाव्या वर्षापर्यंत रोज लागणारा स्वयंपाक करता आलाच पाहिजे असा आग्रह आमच्या आईचा सर्वच बहिणींसाठी असायचा. मोठ्या बहिणी, आजूबाजूच्या बायका बघत बघत उपाशीपोटी तुळशीला पाणी घालणे. सडा रांगोळी करणे, आंघोळ झाल्यावर देवाची पूजा. सोळाव्या वर्षानंतर हौसेने आठवड्यातून एकदा आई साडी नेसायला लावायची. संध्याकाळी दिवेलागणी झाल्यावर शुभंकरोती, घरात पुरुष मंडळींना वाढल्याशिवाय आपण जेऊ नये हे संस्कार, जेवण मुकाट्याने करणे, जेवणाचे ताट वाढण्याची पद्धत. सणवार, श्राद्ध ‘अतिथी देवो भव’ पाहुणचार सगळेच आईकडून नकळत शिकत गेलो. लग्नानंतर घर, नातेवाईकांशी सौहार्दाचे संबंध टिकवण्यासाठी खूप उपयोगी पडले. अजूनही माझ्याविषयी नातेवाईकांनी चार शब्द कौतुकाचे काढल्यास आई-वडीलच काय सासू-सासर्‍यांचीही मान अभिमानाने उंचावते. पती परमेश्वराच्या नेत्रात सात्विक प्रेम तरळते. तर मुलाच्या मित्रांच्या गोतावळ्यात त्याची आई म्हणजे कोणीतरी हीरोइन, सुपर वुमन असा त्याला भारी फील येत असतो.
विवाह विच्छेदक विषय हाताळताना त्यांच्यातल्या समस्यांचा अभ्यास केला त्यात सर्वात मोठी समस्या म्हणजे लग्नाचे उलटून गेलेले वय. अभ्यास, नोकरी, करियर यांच्या पाठी धावता धावता वय वाढलेच पण सोबत अहंकारही प्रचंड वाढला. आई-वडिलांचे एकुलते एक अपत्य मग तो मुलगा असो व मुलगी प्रचंड लाडात वाढत असतात. मागणीनुसार सतत पुरवठा सुरु असतो. मुलांच्या प्रत्येक डिमांडसाठी आई वडिल सतत अक्षरशः हात जोडून उभे असतात. परिणामी खुप मुले हट्टी आणि बेजबाबदार बनत आहेत. वर्क फ्रॉम होम च्या ट्रेंडमध्ये आणि ऑनलाईन क्लासेस असल्यास मुलांना तोंडात घास भरवुन देणारेही पालक आहेत. त्यांच्या क्लासेसच्या फीसाठी गाडी घर विकणारेही पालक आहेतच. पण क्लासेस मध्ये शिकवले जाते तितकेच ज्ञान घेण्याची तयारी या मुलांची असते. स्वकष्टार्जित ज्ञान म्हणजे काय? हे त्यांना माहितही नाही. परिणामी नौकरीच्या ठिकाणी अशी मुले खुप प्रॉब्लेम्स फेस करतात. प्रगती खुपच सावकाश होते. वय पुढे ढकलले जाते.
मुलांनी पालकांच्या अपेक्षा पुर्ण कराव्यात अशी त्यांची इच्छा असते. साहजिकच आहे. आई-वडील त्यांचे राहून गेलेले स्वप्न, छंद त्यांच्या अपत्यांच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतात. आई किंवा वडीलही स्वतःचे घर जॉब सांभाळून त्यांची स्वप्न पूर्ण करण्याच्या नादात स्वतःचा आणि मुलांचाही जीवनक्रम घड्याळाच्या काट्यांशी बांधून मुलांसोबत शाळा, क्लास, कोचिंग, हॉबी क्लासेसकडे धावाधाव करत स्वतःचे आयुष्य त्यांनी बांधून घेतले आहेत. शिवाय मुलाला हवी ती गोष्ट हव्या त्या वेळेला उपलब्ध करून देणे, एखादे काम करून घेण्यासाठी महागडे अमिष दाखवणे हेही उद्योग करत असतात. त्यामुळे आयुष्यातला स्ट्रगल या मुलांना कळतच नाही. या सर्व धावाधावीत जीवनावश्यक गरजांसाठी लागणारी कामे निदान दैनंदिन कामे याबाबतीतही पूर्ण पिढी मागे पडत आहे. कॉम्प्रमाईज या शब्दाची संपूर्णतः फारकत असलेली ही पिढी मनमानी करण्यास अगदी स्वतःच्याच कॉम्पिटिशन मध्ये असते. जीवनचक्र संपूर्ण बदलले आहे. उठण्याच्या वेळा, झोपण्याच्या वेळा, खाण्यापिण्याच्या वेळा सगळ्याच गोष्टी बदलल्या रादर बदलवल्या गेल्या. कधी कामासाठी, तर कधी आळसापोटी, कधीकधी क्रेझ म्हणून. मित्र सकाळी अकरा वाजता उठतो म्हणून मी बारा वाजता उठायचे. अशीही कॉम्पिटिशन मनात निर्माण झाली आहे. रात्रभर एकमेकाशी कसले चॅटिंग करतात कोणास ठाऊक? आणि याच कॉम्पिटिशन्सपायी व्यसनाधीनता ही निर्माण झाली आहे. करियर मेकिंग च्या नादात तर कधी अजूनही कुटुंबाचे पालन पोषण करण्यास समर्थ नाही तर कधी वर वधू संशोधनात अतिशय जास्त चोखंदळपणा यामुळे लग्नाचे वय पुढे ढकलले जात आहे. बॅचलर लाईफ एन्जॉय करायचे ही पण एक खुळचट कल्पना या लग्नाळूंच्या डोक्यात सतत घर करून असते. पण लवकर लग्न करून संपूर्ण आयुष्य एन्जॉय करता येते हाच कन्सेप्ट त्यांना पटत नाही. लग्न म्हणजे फक्त आणि फक्त भांडणे आणि जबाबदारी असा काहीतरी वेडाचार डोक्यात घेऊन ते जबाबदाऱ्यांपासून पळतात परिणामी अर्धे वय वाढले तरी परिपक्वता येतच नाही. खुप वेळा ही परिपक्वता येऊ न देण्याला मुलांचे पालक जास्त जबाबदार असतात. अर्ध्या वयानंतर त्यांना ही जाणीव होते पण वेळ हातातून निघुन गेलेली असते.
खूप वेळा भरपूर डिगऱ्या घेऊन बऱ्याच वेळा नोकरी समाधानकारक नाही म्हणून नोकरीतही चोखंदळपणा करत करत हे तरुण लग्नही नाही नोकरी नाही म्हणून फ्रस्ट्रेशनचे शिकार बनत आहेत. बरेच लग्नाळू जे आज चाळीस पंचेचाळीशीच्या उंबरठ्यावर आहेत, त्यांच्याशी चर्चा केल्यावर बऱ्याच त्यांच्या दृष्टीने असलेल्या समस्या समोर आल्या. वर वर्णिलेल्या तर सगळ्या होत्याच पण काहींच्या बाबतीत अजूनही लग्नासाठीची मानसिकता नाही, आजारी आईवडिलांची जबाबदारी, योग्य ते स्थळ येतच नाही. व्यसनाधीनतेचे परिणाम, प्रेमात झालेली फसवणूक, लहान भावंडांची जबाबदारी, स्वतःचे घरदार नाही, गाडी नाही आणि बऱ्याचशा लग्नाळूच्या विशेषतः मुलांच्या मनात लग्नविषयक बसलेली भीती घरात किंवा आजूबाजूला सतत असलेली भांडणे शिवाय ऐकिवात असलेली लग्नानंतरची अनेक भांडणे, घटस्फोट , ऐकीव माहितीनुसार मुलींचा शहाणपणा किंवा उधळपट्टीपणा या चुकीच्या तत्त्वांच्या आधारावर मनात सतत भीती बाळगुन लग्नास नकार देत असतात. मित्रमंडळीत बायकांविषयी फक्त निगेटिव्ह मारलेल्या गप्पा, तासंतास व्हाट्सअप वरील चुकीचा संदेश देणारी मेसेजेस, भरीसभर जगातील असंख्य उद्योगपती, स्पोर्ट्स वाले, कलाकार, राजकीय नेते जे बिगर लग्नाचे आहेत तेच फक्त प्रगतिशील आहेत असाही चुकीचा संदेश लग्नाळुंमध्ये सर्रास फिरवला जात आहे. विना लग्नाच्या जगात अनेक महिला देखील प्रगतिशील आहेत पण मुलींच्या मनात ही भीती खूपच क्वचित बसते. ज्या सहजतेने त्या लग्नाआधी माहेरी वावरत असतात त्या सहजतेने त्या सासरीही काही दिवसातच रुळतात. मुलगा मात्र सासुरवाडीला फारच क्वचित कम्फर्टेबल असतो. एका वधू वर मेळाव्यात बऱ्याच मुलांना प्रश्न विचारला होता घर जावई बनायला आवडेल का? ज्यांना ज्यांना विचारले त्यातले बरेचसे चिडलेलेच होते, तर उरलेल्यांनी सौम्य शब्दात का असेना तीव्र नापसंतीच दर्शवली. त्यामुळे ज्या ज्या पालकांना फक्त मुलीच आहेत विशेषतः एकुलता एक त्यांना किंवा त्यांच्या मुलींनाही मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले. मुलांचा नॅचरल इगो तर मुलींकडे आई-वडिलांच्या काळजीचा इश्यू निर्माण झाला. आपसूक लग्नाचे वय पुढे ढकलले गेले. वय लांबवले जाण्याचे आणखी एक मोठे कारण म्हणजे परदेशातील नोकरीचे अमिष. खूप सारे तरुण परदेशातील चकाचौंध, पण शिस्तप्रिय लाइफस्टाईलला भुलून भारतीय उदात्त मानसिकतेचा तिरस्कार करत इथल्या मुलींना नाकारतात किंवा तुच्छ तरी लागतात. जरी लग्न करून परदेशात नेले तरी बऱ्याच अंशी मुलींची फसवणूकच असते परदेशात राहूनही मुलींकडून ते एका भारतीय आदर्श नारी सारखी अपेक्षा करत असतात. त्यात मुलींचे शिक्षण करियर या सगळ्या गोष्टी अक्षरशः वाया जातात. एकतर उशिरा लग्न झाल्यामुळे आणि जास्तीच्या पॅकेजेसमुळे अहंकार वाढीस लागलेला असतो. त्यामुळे संतती होण्यातही बऱ्याच वेळा प्रॉब्लेम्स येतात. एका डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार हल्ली चाळीस टक्के जोडप्यांना अपत्य प्राप्तीसाठी ट्रीटमेंटची गरज पडत आहे. वयाच्या पस्तीशीत अपत्य प्राप्ती झाल्यावर पस्तीसची आई आणि चाळीशीत पोहोचलेले वडील, तर साठीच्या पुढचे त्यांचेच पालक त्या लहानशा बाळाच्या संगोपनात सर्वच थकतात. आणि इतक्या उशिरा अपत्य नॉर्मल जन्माला येईलच असेही काही नाही. फक्त ते अपत्य जन्माला आल्यावर पालकांच्या त्या बाळाकडून वाढत्या अपेक्षांच्यापायी अपत्य ही थकत आहे. त्यामुळे माया ममतेचे बॉण्डिंग कमी होत आहे. मुले संस्कार, संस्कृती पासून दूर होत आहे. एकदा समज आल्यावर आई-बाबांच्या अपेक्षांच्या कचाट्यातून सुटण्याची धडपड वाढीस लागली आहे. एका विशिष्ट वयानंतर मुलं मानसिकरित्या आई-वडिलांपासून पूर्ण तया दूर गेलेली आहेत. घटस्फोट, लिव्ह इन, अनैतिक संबंधांसारख्या घातक प्रवृत्ती ज्या विषवृक्षासाख्या प्रचंड फोफावत आहेत त्या भारतीय उदात्त संस्कृतीला नक्कीच गालबोट आहेत. म्हणूनच लग्नाचे वाढते वय आणि अपत्य प्राप्तीसाठीचे वाढते वय ही तज्ञांच्या पुढची मोठी समस्या आहे. आई-वडिलांनी जरा समजून उमजून पुढाकार घेऊन भावी पिढीला लग्नाचे वय, पावित्र्य, महत्व आणि अपत्य प्राप्तीसाठीचे योग्य वय या सर्व उत्तम संस्कारातील जबाबदाऱ्यांची जाणीव, नुसती जाणीवच नव्हे तर योग्य मार्गदर्शन केल्यास भावी भारतीय पिढी सुसंस्कृत निकोप आणि विचारांनी परिपक्व निश्चितच असेल. वधु वर मेळाव्यातही या गोष्टीचा उहापोह झालाच पाहिजे. प्रिय वाचक चला आपण सर्वजण आपल्या उदात्त आणि आदर्श संस्कृतीच्या निकोप जपणुकीसाठी आणि सुदृढ वाढीसाठी सर्व मिळून प्रयत्न करूया.

सुजाता संजय येवले,
नाशिक रोड.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *