नाशिक – (विशेष प्रतिनिधी)
राज्यात अहमदनगर, संगमनेर, कोल्हापूर येथे घडलेल्या तणाव परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहर पोलिस अलर्ट झाले आहेत. समाज माध्यमांवर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
नाशिककरांनी फेसबुक, इंस्टाग्राम, व्हाट्सअँप, ट्विटर इत्यादी सारख्या समाज माध्यमांवरून कोणत्याही प्रकारच्या धार्मिक भावना दुखावणाऱ्या, अवमानकारक, सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट, फोटो अथवा संदेश प्रसारित (व्हायरल) करू नयेत असे आवाहन शहर पोलिसांनी केले आहे.
असे केल्यास त्यांच्या विरुद्ध माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात येईल. सामाजिक सलोख्याला बाधा येईल किंवा कोणत्याही समाजाच्या धार्मिक भावना दुखावतील असा कोणताही मजकुर समाजमाध्यमांवर प्रसारित करू नये. तसे आढळुन आल्यास कठोर कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असे आवाहन सायबर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक दानिश मन्सुरी यांनी केले आहे.