4 व 5 फेब्रुवारी 2023 : वर्धा येथील विद्रोही साहित्य संमेलनाच्या निमित्ताने
महात्मा जोतीराव फुले यांनी 24 सप्टेंबर 1873 ला सत्यशोधक समाजाची स्थापना करुन स्त्री-शूद्रातिशूद्र कष्टकरी बांधवांच्या शोषणाविरोधात संघर्षाची मजबूत सुरुवात केली. ओबीसी,दलित,आदीवासी, शेतकरी, कष्टकरी इत्यादी बहुजन समाजाच्या शोषणाची विविध अंगाने चिकीत्सा करणाऱ्या, धर्माच्या मिषाने बहुजन समाजाला पंगु करणाऱ्या धर्म व्यवस्थेच्या विरोधात मोठा विद्रोह करणाऱ्या या सत्यशोधक समाजाच्या स्थापनेला 24सप्टेंबर 2023 ला 150 वर्षे पूर्ण होत आहे. सत्यशोधक विचाराच्या विविध संघटना, या सत्यशोधक समाज शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षात शोषकांच्या विरोधातील शोषितांचा विद्रोह तेज करण्यासाठी पुढे सरसावल्या आहे.
सत्यशोधक समाजाचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्षात, 4 व 5 फेब्रुवारी 2023 ला वर्धा येथे संपन्न होणाऱ्या 17 व्या अ. भा. विद्रोही मराठी साहित्य संमेलनाची चर्चा राज्याच्या कानाकोपऱ्यात होत आहे. वर्धा येथील विद्रोही साहित्य संमेलनाचे संयोजक डॉ. अशोक चोपडे आणि स्वागताध्यक्ष प्रा. नितेश कराळे तसेच त्यांच्या सोबत असलेल्या फुले-शाहू-आंबेडकरी विचाराच्या टिमने बैठका आणि चर्चांची धडाकेबाज सुरुवात केली. चार वर्षापूर्वी वर्धेत सत्यशोधकी साहित्य संमेलन मोठ्या जनसमुहाच्या उपस्थितीत यशस्वी करणारे, सत्यशोधकी चळवळीच्या साहित्याचे अभ्यासक डॉ. अशोक चोपडे या संमेलनाचे संयोजक असल्याने, संमेलन निश्चितपणे दिमाखदार होणार आहे. स्वागताध्यक्ष प्रा. नितेश कराळे हे आपल्या वऱ्हाडी शैलीत कठीण विषय सोपे करुन शिकविणारे शिक्षक म्हणून लोकप्रिय आहे. त्यांच्या बोलण्याच्या अनोख्या ग्रामीण शैलीसोबतच सामाजिक न्यायाच्या भूमिकेबाबत स्पष्टतेने, फुले-शाहू-आंबेडकरी विचारधारेशी असलेल्या बांधिलकीने, शेतकरी बळीराजावर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात विद्रोह करणारे व्यक्तीमत्व म्हणून त्यांची ख्याती आहे. तसेच विविध आयोजनांचा अनुभव असलेली सत्यशोधकी विचाराची चमू त्यांच्या सोबत प्रयत्नरत असल्याने ओबीसी, दलित, आदिवासी, शेतकरी, कामकरी, अल्पसंख्याक इत्यादी कष्टकरी बहुजन समाजाचा हुंकार बुलंद करणारे हे संमेलन होणार आहे.
विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे प्रा. प्रतिमा परदेशी आणि किशोर ढमाले यांच्या नेतृत्वात अ. भा.विद्रोही साहित्य संमेलनाचे सर्व पदाधिकारी वरचेवर बैठका घेऊन तयारीला गती देत आहे. प्रस्थापित धनदांडग्यांच्या मदतीविना सामान्य कष्टकरी, शेतकरी,कामकरी बहुजनांकडून पै-पै गोळा करून 16 विद्रोही साहित्य संमेलने यशस्वी करण्याचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. वर्धेत चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची मोठी फळी आहे. 1990 च्या काळात ओबीसी विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून डॉ.अशोक चोपडे आणि प्रा. नूतन माळवी यांनी खेड्यापाड्यात मंडल आयोग प्रबोधन मोहीम राबविली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील विविध भागात सत्यशोधकी विचाराचे कार्यकर्ते आहेत. यामुळेच वर्धेत होणारे 17 वे अ. भा. विद्रोही मराठी साहित्य संमेलन शेतकरी, विद्यार्थी, कामगार ओबीसी, दलित, आदिवासी बहुजनांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी यशस्वी ठरण्याची खात्री संयोजन समितीमध्ये दिसत आहे.
म. जोतीराव फुले यांनी 24 सप्टेंबर 1873 ला , आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने सत्यशोधक समाजाची स्थापना करुन वैदिक धर्म व्यवस्थेने स्त्री-शुद्रातिशुद्र कष्टकरी बहुजन समाजाला विभाजित करुन चालवलेल्या शोषणाच्या विरोधात मोठा विद्रोह केला.त्यानंतर सत्यशोधक समाज आणि ब्राम्हणेतर पक्षाने सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक शोषणाविरुद्धचा संघर्ष, सत्यशोधक कृष्णराव भालेकर,जेधे, दिनकरराव जवळकर, नारायण मेघाजी लोखंडे, भास्करराव जाधव, अन्नासाहेब लठ्ठे, केशवराव विचारे, मुकुंदराव पाटील, आत्माराम महाजन, पंढरीनाथ पाटील, वर्धेचे व्यंकटराव गोडे, नागपूरचे बाबुराव भोसले , आनंदस्वामी इत्यादी असंख्य सत्यशोधक पुढाऱ्यांनी पुढे नेला. धर्माच्या मिष्याने शूद्रातिशूद्र कष्टकरी बहुजन समाजाची लुबाडणूक करणाऱ्या पुरोहितशाहीला , उच्च निचपणाचा छळ चालवलेल्या जातीव्यस्थेला नकार देऊन, वामनी, विषारी विंचवांची नांगी ठेचत, विश्वात्वात्मक बंधुत्वाचा, समतेचा, न्यायाचा विचार मनामनात रुजविण्याचे काम सत्यशोधक पुढाऱ्यांनी वेळोवेळी केले. सत्यशोधक चळवळीचा विद्रोह, समतेच्या, न्यायाच्या प्रस्थापनेसाठीचा विद्रोह होता. जातीव्यस्थेच्या, धर्म व्यवस्थेच्या चक्रव्यूहात भरडल्या जाणाऱ्या स्त्री शूद्रातिशूद्र बहुजनांना कवेत घेणारा, त्यांना मनुच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी, स्वातंत्र्याचा श्वास घेण्यासाठी सत्यशोधकी झंजावात होता. सत्यशोधक चळवळ ही महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यात पोहचलेली पहिली चळवळ असल्याचा उल्लेख , डॉ. गेल ऑमवेट, डॉ. अशोक चोपडे व इतर अनेक अभ्यासकांच्या लेखनात आलेला आहे. त्याचं मुख्य कारण म्हणजे त्या काळात उपलब्ध असलेली प्रबोधनाची सर्व साधने सत्यशोधकांनी वापरल्याचे दिसते. सभा, संमेलनांचा झंझावात निर्माण करतांनाच समता, बंधुभाव आणि एकमय राष्ट्र निर्मितीसाठी सत्यशोधकांनी विपुल प्रमाणात लेखन केले. विविध वृत्तपत्रे चालविली, समाजोन्नतीच्या ध्यासाने विविध साहित्य प्रकारात लेखन केले. तरवडी सारख्या खेडेगावातून निघणारे ” दीनमित्र ” नावाचे सत्यशोधक चळवळीचे मुखपत्र सत्यशोधक मुकुंदराव पाटील यांनी तब्बल 57 वर्षे चालवले. अलीकडच्या काळात सत्यशोधक चळवळीच्या साहित्य संशोधनात बऱ्याच अभ्यासकांनी लक्ष घातल्याने मोठ्या प्रमाणात सत्यशोधकी साहित्य उपलब्ध होऊ लागले. खुद्द महात्मा फुले यांनी संवाद शैलीतील लेखन, नाट्य, अखंड, पवाडे,वृत्तपत्रांचे फॉर्म,कटाव,पत्र, निबंध, निवेदन अशा विविध साहित्य प्रकारात लेखन केले. नंतरच्या सत्यशोधक पुढाऱ्यांनी, लेखकांनीही फार्स, सत्यशोधकी जलसा इत्यादी साहित्य प्रकार हाताळले. दीनबंधूंच्या उत्कर्षाचा ध्यास घेऊन हे सर्जनशील साहित्य पुढे येत होतं, हा सत्यशोधकी साहित्याचा वैशिष्ट्यपूर्ण केंद्रबिंदू आहे. म्हणूनच पुढे पुरोहितशाहीच्या जाचातून दीनबंधूंना मुक्त करण्यासाठी मो. तु. वानखेडे सारखे सत्यशोधक लेखक स्वयंपुरोहित सारखे लोकोपयोगी ग्रंथ लिहिताना दिसतात. मुजोर अमानवी ब्राम्हणशाहीची नांगी ठेचण्यासाठी महात्मा फुले ब्राम्हणी धर्माच्या आडपडद्यात गुलामगिरी, ब्राम्हणांचे कसब यासारख्या ग्रंथांचे लेखन करतात, विद्याखात्यातील ब्राम्हण पंतोजी नावाचा पवाडा लिहितात. त्यासोबतच सांस्कृतिक वारसा स्पष्ट करण्यासाठी बळीराजाचा अस्सल सांस्कृतिक वारसा उजागर करतात. छत्रपती शिवाजी राजेंवर पवाडा लिहितात. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला विरोध करणारी, मळमळणारी सनातनी छावणी जेव्हा उच्छाद मांडतात , महात्मा फुले यांची बदनामी करणारे घाणेरडे लेखन करतात, तेव्हा सत्यशोधक दिनकरराव जवळकरांची लेखणी समशेरीचं रुप धारण करून ‘देशाचे दुश्मन‘ नावाचे पुस्तक लिहितात. सनातनी उन्मादाचा सामना करण्यासाठी मुकुंदराव पाटील ‘ढड्डाशास्त्री परान्ने‘ सारख्या पुस्तकाचे लेखन करतात. याच उद्देशाने वर्धेतून सत्यशोधक व्यंकटराव गोडे ‘ब्राम्हणेतर‘ नावाने सत्यशोधक, ब्राम्हणेतर चळवळीचे मुखपत्र सुरू करतात. सत्यशोधक साहित्याची निर्मिती ही समतेसाठीच्या संगराचे साहित्य म्हणून पुढे येते. त्यासोबतच सार्वजनिक सत्यधर्माच्या रुपाने विश्वबंधुत्व, एकमय नेशन, धर्मातीतता ( धर्मनिरपेक्षता)सारख्या वैश्विक मूल्यांच्या दिशेने झेपावत़े.. साहित्यासाठी साहित्य ही भूमिका सत्यशोधकी साहित्याने कधीच घेतली नाही. म्हणुनच व्याकरणाच्या चुका काढणाऱ्यांनाही त्यांनी कधी भिक घातली नाही. बोटचेप्या, नाटकी भूमिका घेणाऱ्या आजच्या सैर झालेल्या व्यवस्थेचा सामना करण्यासाठी देखील आपल्याला सडेतोड भूमिका घ्यावी लागणार आहे. महात्मा फुले यांनी मराठी ग्रंथकार सभेच्या निमंत्रण पत्राला या बाणेदार भूमिकेमुळेच नकार दिला. बहुजन समाजातील साहित्यिकांना, नेत्यांना, कार्यकर्त्यांना, युवा-युवतींना हीच बाणेदार भूमिका घ्यावी लागणार आहे.
मराठी ग्रंथकार सभेस महात्मा फुले यांनी लिहिलेल्या पत्राची भूमिका मध्यवर्ती ठेवून होऊ घातलेल्या वर्धा येथील विद्रोही मराठी साहित्य संमेलनामध्ये शेतकरी आंदोलन, ओबीसी आंदोलन, दलित ,आदिवासी,अल्पसंख्याक समुहातील कष्टकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात संघर्ष करणाऱ्या आंदोलनाना उर्जा पुरवण्याच्या दृष्टीने विचारमंथन व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
माझ्या घालमोड्या दादा, त्या गृहस्थांकडून एकंदर सर्व मनुष्याच्या मानवी हक्काविषयी वास्तविक विचार केला जाऊन त्यांचे त्यास ते हक्क त्यांच्याने खुशीने व उघडपणे देववत नाहीत, व चालू वर्तनावरून अनुमान केले असता पुढेही देववणार नाहीत, तसल्या लोकांनी उपस्थित केलेल्या सभांनी व त्यांनी केलेल्या पुस्तकातील भावार्थांशी आमच्या सभांचा व पुस्तकांचा मेळ मिळत नाही. कारण त्यांच्या पूर्वजांनी आम्हावर सूड उगविण्याच्या इराद्याने, आम्हास दास केल्याचे प्रकर्ण त्यांनी आपल्या बनावट धर्म पुस्तकात कृत्रिमाने दडपले. याविषयी त्यांच्यातील जुनाट खल्लड ग्रंथ साक्ष देत आहेत. यावरून आम्हा शूद्रादी अतिशुद्रास काय काय विपत्ती व त्रास सोसावे लागतात, हे त्यांच्यातील उंटावरून शेळ्या वळणाऱ्या ग्रंथकारास व मोठमोठ्या सभास्थानी आगंतुक भाषण करणारास कोठून कळणार? हे सर्व त्यांच्या सार्वजनिक सभेच्या उत्पादकास जरी पक्के माहीत होते, तरी त्यांनी फक्त त्यांच्या व आपल्या मुलाबाळांच्या क्षणीक हिताकरिता डोळ्यावर कातडे ओढून त्याला इंग्रज सरकारातून पेन्शन मिळताच तो पुन्हा अटल जात्याभिमानी, अट्टल मूर्तीपूजक, अट्टल सोवळा बनून आपल्या शूद्रादी अतिसुंद्रास नीच मानू लागला; व आपल्या पेन्शनदात्या सरकारने बनविलेल्या कागदाच्या नोटीस सुद्धा सोवळ्याने बोट लावण्याचा विटाळ मानू लागला! अशीच का शेवटी ते सर्व आर्य ब्राह्मण या हतभाग्य देशाची उन्नती करणार! असो, आता यापुढे आम्ही शूद्र लोक, आम्हास फसवून खाणाऱ्या लोकांच्या थापांवर भुलणार नाहीत तेव्हाच सारांश, यांच्यात मिसळल्याने आम्हा शूद्रादी अतिशूद्रांचा काही एक फायदा होणे नाही, याबद्दल आमचा आम्हीच विचार केला पाहिजे. अहो, त्या दादांना जर सर्वांची एकी करणे असेल, तर त्यांनी एकंदर सर्व मानवी प्राण्यात परस्पर अक्षय बंधुप्रिती काय केल्यानेवाढेल, त्याचे बीज शोधून काढावे व ते पुस्तकाद्वारे प्रसिद्ध करावे. अशा वेळी डोळे झाकणे उपयोगाचे नाही. या उपर त्या सर्वांची मर्जी. हे माझे अभिप्रायादाखल छोटेखानी पत्र त्या मंडळीच्या विचाराकरिता तिजकडे पाठविण्याची मेहरबानी करावी.
(संदर्भ- महात्मा फुले समग्र वाङ्ममय, संपादक-प्रा.हरी नरके, पान नं. ३५६)
महात्मा फुले यांनी घालमोड्यादादाला लिहिलेल्या पत्रातील भूमिकेला मध्यवर्ती ठेवून चर्चा झाली पाहिजे. जगाच्या इतिहासात कधीही झालेले नाही, इतके दीर्घकाळ चाललेले शेतकरी आंदोलनाची दखल का घेतल्या जात नाही याचे उत्तर म. फुले यांच्या भूमिकेतून शोधण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. ओबीसी जनगणना आंदोलन समजून घेणारे विचारमंथन झाले पाहिजे. बहुजनांचा स्वतंत्र सांस्कृतिक वारसा उजागर करण्याच्या दृष्टीने चर्चा झाली पाहिजे. आत्महत्या शेतकऱ्यांच्या अधिक का होतात? याची उत्तरे जातीव्यवस्था, धर्म व्यवस्थेच्या शोषणात असल्याचे सत्यशोधकी निदान पुढे आले पाहिजे. सार्वजनिक सत्यधर्मातील धर्मातीतता (धर्मनिरपेक्षतेच्या) तत्वाची चर्चा झाली पाहिजे. बेरोजगारीचे चटके सर्वाधिक ओबीसी, दलित, आदिवासी, शेतकरी, श्रमिक भावंडांना का बसतात? याचे मंथन झाले पाहिजे.
@ बाबा बीडकर