नाशिक : प्रतिनिधी
राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियिमांतर्गत नाशिक जिल्ह्यातील गरीब व गरजू कुटुंंबांना अन्नधान्याचा पुरवठा करण्यासाठी शासनाकडून प्रत्येक जिल्ह्यातील गरीब आणि गरजू कुटुंबांची नोंदणीप्रक्रिया करण्यात येत आहे. याअंतर्गत नाशिक जिल्ह्यासाठी अंत्योदय अन्न योजनेंतर्गत (शिधापत्रिका संख्या) एक लाख 78 हजार 537 इष्टांक निश्चित करण्यात आला. गेल्या वर्षीच्या तुलनेत इष्टांकात चार हजार 425 ने घट आली आहे.
राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियमांतर्गत केंद्र सरकार प्रत्येक राज्यासाठी व जिल्ह्यासाठी लाभार्थ्यांचा इष्टांक (लाभार्थ्यांची संख्या) ठरवते. ग्रामीण भागात हे प्रमाण लोकसंख्येच्या 75 टक्के, तर शहरी भागात 50 टक्के असते. यासाठी राज्य सरकारकडून लाभार्थ्यांची यादी निश्चित केली जाते. राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियिम-2013 अंतर्गत पात्र लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी शासन निर्णयान्वये जिल्हानिहाय लाभार्थ्यांचा इष्टांक देण्यात आला होता.
अंत्योदय अन्न योजनेंतर्गत नाशिक जिल्ह्यासाठी सन 2023-24 साठी एक लाख 83 हजार 160 इष्टांक शासनाकडून निश्चित करण्यात आला होता. मात्र, जिल्हा प्रशासनाकडून एक लाख 77 हजार 452 अंत्योदय रेशनकार्डची नोंदणी करण्यात आली. यंदा 2025-26 साठी एक लाख 78 हजार 537 इष्टांक निश्चित केला आहे.
प्राधान्य कुटुंंब लाभार्थी योजनेत सन 2023-24 साठी नाशिक जिल्ह्यासाठी 33 लाख 69 हजार 39 इष्टांक देण्यात आला होता. प्रत्यक्षात जिल्हा प्रशासनाकडून 30 लाख 94 हजार 780 प्राधान्य कुटुंबांची नोंद करण्यात आली. सन 2025-26 साठी 31 लाख 24 हजार 763 इष्टांक शासनाकडून निश्चित करण्यात आला आहे.
स्वस्त दरात रेशन
इष्टांक निश्चित झाल्यानंतर लाभार्थ्यांना स्वस्त दरात तांदूळ (3 रुपये प्रतिकिलो), गहू (2 रुपये प्रतिकिलो), ज्वारी-बाजरी एक रुपया प्रतिकिलोने दिली जाते. व्यवस्थेचे नियोजन व अंमलबजावणीसाठी इष्टांकाचा (आधारभूत संख्या) उपयोग केला जातो.
1,085 रेशनकार्डधारक प्रतीक्षेत
जिल्ह्यातील एक हजार 85 रेशनकार्डधारक म्हणजेच 28 हजार 544 नागरिक इष्टांकाच्या प्रतीक्षेत आहेत.