लासलगावसह जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये उद्यापासून कांदा लिलाव सुरू होणार

 

 

लासलगाव:समीर पठाण

लासलगाव सह जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे लिलाव उद्या मंगळवार दि. 03 ऑक्टोबर पासून पूर्ववत सुरू होणार असल्याची माहिती पालकमंत्री दादा भुसे तसेच लासलगाव बाजार समितीचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर,उपसभापती गणेश दोमाडे व सचिव नरेंद्र वाढवणे यांनी दिली असून याची सर्व संबंधित घटकांनी नोंद घ्यावी असे आवाहन लासलगाव बाजार समिती प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.गेल्या तेरा दिवसांपासून व्यापाऱ्यांच्या बंदमुळे हैराण झालेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी याबाबत समाधान व्यक्त केले आहे.

नाशिक जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी आपल्या विविध मागण्याकरता कांद्याला लिलाव बंद ठेवले होते यामुळे कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडलेला असताना शेतकरी हिताकरीता लासलगाव सह जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यामध्ये उद्या मंगळवार पासून कांदा लिलाव सुरू करण्याचा निर्णय घेतल्यामुळे शेतकरी व लासलगाव शहरातील छोटे मोठे व्यावसायिकांनी समाधान व्यक्त केले

नाशिक जिल्ह्यातल्या सर्व बाजार समितीत पुन्हा एकदा कांद्याचे लिलाव सुरू होणार आहे.शेतक-यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून व्यापा-यांनी दोन पावलं मागे घेत आंदोलन मागे घेतले आहे.यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.पालकमंत्री दादा भुसे यांनी पुन्हा एकदा कांद्याचे लिलाव सुरू होणार असल्याची घोषणा केली आहे.कांदा व्यापा-यांनी आपल्या काही मागण्या सरकारसमोर ठेवल्या होत्या.यासंदर्भात दिल्लीत केंद्रीय स्तरावर बैठक झाली.मात्र,कोणताही तोडगा निघू शकला नाही.त्यानंतर कांदा व्यापा-यांनी आंदोलन सुरूच ठेवलं होतं.मात्र शेतक-यांचं वाढतं नुकसान लक्षात घेऊन आता कांदा खरेदी-विक्री सुरू करण्याचा निर्णय व्यापा-यांनी घेतला आहे.व्यापाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी लिलाव बंद केलेत. कांदा निर्यातीवर लावण्यात आलेलं 40 टक्के निर्यात शुल्क कमी करावं ही प्रमुख मागणी व्यापाऱ्यांकडून करण्यात आली होती.कांदा निर्यातीवर 40 टक्के शुल्क लावल्यामुळं राज्यातील राजकारण देखील पेटलं होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *