मुंबई ते दुबई थेट मार्ग सुरू; पाकचा कांदा बाजार कोसळण्याच्या मार्गावर
लासलगाव : वार्ताहर
भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने 5 मे रोजी पाकिस्तानच्या कराची बंदरावरून होणार्या मालवाहतुकीवर बंदी घातल्यानंतर कांद्याच्या निर्यातीस मोठा अडथळा निर्माण झाला होता. मात्र, 6 मेपासून मुंबईहून दुबईकडे थेट जहाजसेवा सुरू झाल्याने लासलगावसह नाशिक जिल्ह्यातून आखाती देशांमध्ये कांद्याची थेट निर्यात पुन्हा वेग घेत आहे.
आत्तापर्यंत 350 कंटेनरद्वारे 90 हजार क्विंटल (30 हजार मेट्रिक टन) कांद्याची निर्यात झाली असून, यामुळे भारतीय कांदा पुन्हा आंतरराष्ट्रीय बाजारात गाजू लागला आहे.
याआधी दुबईकडे जाणारी बहुसंख्य कांद्याची वाहतूक कराची बंदरमार्गे होत असे. त्यामुळे पाकिस्तानला या मार्गातून वाहतूक शुल्क, सेवा शुल्क आणि बाजार ताबा यामधून मोठा आर्थिक फायदा होत होता. मात्र, भारताने थेट दुबई मार्ग सुरू करताच पाकिस्तानचा महसूल थांबला. भारतीय व्यापार्यांचे थेट आंतरराष्ट्रीय बाजारात वर्चस्व वाढण्याची शक्यता आहे.
थेट निर्यातीचे फायदे – वेळ, खर्च व गुणवत्तेची
मुंबई ते दुबई या नवीन थेट मार्गामुळे वाहतूक वेळेत 56 दिवसांची बचत होते,
जे कांद्यासारख्या नाशवंत मालासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.
शिवाय, थेट डिलिव्हरीमुळे गुणवत्तेचा दर्जा टिकतो. परिणामी,
दर चांगले मिळतात आणि स्पर्धा कमी होते. तसेच निर्यातीसाठी जास्तीत जास्त
जहाजे व कंटेनर उपलब्ध करून देण्याची आणि कांद्याच्या निर्यातीवर
अनुदान (सबसिडी) देण्याची मागणी कांदा निर्यातदारांनी केली आहे.
भारताचे कांदा साम्राज्य परतणार
भारतीय कांद्याचा दर, गुणवत्ता आणि वेळेवर पुरवठा या गोष्टी
जर चालू राहिल्या तर पाकिस्तानने गेल्या काही वर्षांत हस्तगत केलेली
आखाती बाजारपेठ पुन्हा भारतीय व्यापार्यांच्या हातात येऊ शकते.
या घडामोडींमुळे कांदा उत्पादक शेतकर्यांना नवसंजीवनी मिळू शकते
आणि यामुळे लासलगावसारख्या कृषी बाजारपेठांचे महत्त्व जागतिक
पातळीवर अधिक बळकट होणार आहे.