केंद्र सरकारकडून कांदा निर्यातीवर बंदी

संतप्त शेतकऱ्यांनी लिलाव पाडले बंद

लासलगाव:समीर पठाण

केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यातबंदी लागू केल्यामुळे आज शुक्रवारी सकाळी नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यामध्ये संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी कांद्याचे लिलाव बंद पाडले.कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा रोष पहाता कांद्याच्या व्यापाऱ्यांनी सुध्दा कांदा लिलावात सहभाग घेतला नाही.

कांद्याचे भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी २८ ऑक्टोबर रोजी कांद्यावरील निर्यात मूल्य दर ८०० डॉलर प्रति टन करण्याचा निर्णय केंद्राकडून घेण्यात आला होता.३१ डिसेंबर पर्यंत एमइपी ८०० डॉलर प्रति टन ठेवण्यात आले होते.मात्र ८ डिसेंबर २०२३ रोजी पुन्हा वाणिज्य विभागाने नोटिफिकेशन काढून कांद्यावर निर्यात बंदी लादली आहे. ३१ मार्च २०२४ पर्यंत कांदा निर्यात बंदी राहणार आहे. गेल्या हंगामात पावसाने पाठ फिरवल्याने तसेच काढणीला आलेल्या कांद्याला अवकाळीचा फटका बसल्याने कांदा आवक घटली आहे.पुन्हा कांदा दरावर अंकुश राहण्यासाठी निर्यात बंदी लावली असल्याचे समजते.

मागील काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील लासलगाव सह जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या दरात चांगली सुधारणा होत कांद्याला चार हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत बाजारभाव मिळत होते
परंतु केंद्र सरकारने कांद्याची निर्यात बंदीची अधिसूचना काढल्यामुळे आज सकाळी सर्व बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या बाजारभावात १५०० ते २००० रुपयांची घसरण झाल्यामुळे केंद्र सरकारने घेतलेल्या कांदा निर्यात बंदीच्या निर्णयाचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी जोरदार निषेध केला आहे

दरम्यान आज दुपारी चांदवड येथे नाशिक जिल्हा कांदा व्यापारी असोसिएशन ची तातडीची बैठक आयोजित करण्यात आली असून या पुढील दिशा या बैठकीत ठरणार असल्याची माहिती मिळाली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *