चिचोंडीत सुरू होणार कांदा प्रक्रिया उद्योग

गुंतवणुकीसह रोजगार निर्मितीला चालना, केंद्र सरकारचा हा प्रकल्पही दृष्टिपथात

येवला : प्रतिनिधी
येवला तालुक्यातील चिचोंडी येथील औद्योगिक वसाहतीत लवकरच कांदा प्रक्रिया उद्योग कार्यान्वित होणार आहे. याद्वारे येथे कोट्यवधींची गुंतवणूक येतानाच रोजगाराचीही मोठी निर्मिती होणार आहे. परिणामी, येवला परिसराच्या औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळणार असल्याची माहिती माजी खासदार समीर भुजबळ यांनी दिली आहे. येवला तालुक्यातील चिचोंडी येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळांतर्गत 109 हेक्टर क्षेत्रावर औद्योगिक क्षेत्र विकसित करण्यात आले आहे. या ठिकाणी पाणी, रस्ते, सांडपाणी व्यवस्था, वीज आदी पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत. कृषी प्रक्रिया उद्योग आणि वस्त्रोद्योगांना येथे प्राधान्य दिले जाणार आहे. त्यात स्थानिक उद्योजकांना उद्योग व व्यवसायाची संधी मिळणार असून, जास्तीत जास्त स्थानिक तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहे. चिचोंडी औद्योगिक वसाहतीतील भूखंडांच्या विक्रीची प्रक्रिया सुरू आहे. ग्रामीण भाग असल्याने हे औद्योगिक क्षेत्र विकसित करण्यासाठी प्रचलित दरात विहित मुदतीसाठी सवलत देण्याकरिता ना. छगन भुजबळ यांचे प्रयत्न सुरू आहेत. या औद्योगिक वसाहतीतील 50 एकर जागेवर कांदा प्रक्रिया उद्योगाला सवलतीच्या दरात भूखंड देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ उपसमितीने घेतला आहे.
लवकरच येथे कांदा प्रक्रिया उद्योग सुरू होणार आहे. चिचोंडी औद्योगिक वसाहतीत येण्यासाठी फर्टिलायझर कंपन्या इच्छुक आहेत. मात्र, आपल्याला या ठिकाणी प्रदूषण करणारे उद्योग नको आहेत. स्वच्छ व हरित उद्योगांसाठी आपण आग्रही आहोत. म्हणूनच या ठिकाणी जास्तीत जास्त कृषी प्रक्रिया उद्योग आणि पॉवरलूम उद्योगांसाठी उत्तेजन दिले
जाणार आहे.

पीएम मित्रा सिल्क पार्क

ही केंद्र सरकारची एक महत्त्वाची योजना आहे, ज्याचा उद्देश वस्त्रोद्योगाला चालना देणे हा आहे. या योजनेंतर्गत देशभरात 7 मोठ्या एकात्मिक वस्त्रोद्योग पार्कची स्थापना केली जात आहे. ज्यात महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, तमिळनाडू, तेलंगणा, कर्नाटक आणि उत्तर प्रदेश या राज्यांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील अमरावती येथे आणि मध्य प्रदेशातील धार येथे या पार्क्सची पायाभरणी झाली आहे. याचअंतर्गत चिचोंडी औद्योगिक वसाहतीत प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी मंत्री छगन भुजबळ यांचे प्रयत्न सुरू आहेत, असे समीर भुजबळ यांनी सांगितले आहे.

चिचोंडी औद्योगिक वसाहतीतील 50 एकर जागेवर कांदा प्रक्रिया उद्योगाला सवलतीच्या दरात भूखंड देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ उपसमितीने घेतला आहे. लवकरच येथे कांदा प्रक्रिया उद्योग सुरू होणार आहे. – समीर भुजबळ, माजी खासदार

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *