कांद्याने भरलेला ट्रॅक्टर चोरीला

सटाणा :  प्रतिनिधी
सटाणा कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातून पहाटेच्या वेळी, कांद्याचे ट्रॅक्टर पळविण्याचा प्रयत्न बाजार समिती सुरक्षारक्षकांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला असून, या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे  वातावरण आहे.
     सोमवार, दि. 10 रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास, एक तरुण इसम कांद्याचे ट्रॅक्टर घेऊन जात असतांना, प्रवेशद्वाराजवळ सुरक्षारक्षक गोपी साळे व शुभम पाल यांनी संबंधिताकडे ओळख म्हणून, आधारकार्डची चौकशी केली. यावेळी सदर इसमाने आधी ट्रॅक्टर प्रवेशद्वाराच्या बाजूला उभे करीत, यानंतर बाजार समिती सुरक्षा रक्षकांशी बोलतांना, सटाणा – मालेगाव रस्त्यालगत पुंडलिक नगरमधील नातेवाईकांकडून आधारकार्ड  घेऊन येतो, असे सांगून ट्रॅक्टर चोराने धूम ठोकली.यानंतर बाजार समितीच्या दुसऱ्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या दुचाकीवर स्वार होऊन चोर प्रसार झाल्याचे सुरक्षा रक्षकांनी सांगितले  याबाबत ट्रॅक्टर मालक व सावकी ( ता. देवळा ) येथील शेतकरी धर्माजी भामरे यांनी सटाणा पोलीस ठाण्यात माहिती दिली आहे. यापूर्वी बाजार समिती आवारातील वाहनांमधून होत असलेली डिझेल चोरी सुरक्षा रक्षकांनी रंगेहाथ पकडली होती. अशा घटना रोखण्यासाठी बाजार समितीमध्ये सुरक्षारक्षक दक्षता घेत असून, सोबत सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची देखील व्यवस्था करण्यात आली आहे.  उपरोक्त घटनांच्या पार्श्वभूमीवर बाजार समितीत येतांना शेतकरी बांधवांनी आपल्या ट्रॅक्टर – ट्रॉली तसेच इतर वाहनांवर स्वतःच्या नाव, गाव व मोबाईल नंबरचा उल्लेख करावा. तसेच शक्यतो लिलावासाठी वाहन मुक्कामी न लावता पहाटेच्या वेळी लवकर घेऊन येण्याचे आवाहन, कृषी उत्पन्न बाजार समितीचे  सचिव भास्कर तांबे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *