कांद्याचे निर्यात शुल्क कमी होऊनही दरात घसरण, शेतकर्‍यांत चिंता

कांद्याचे निर्यात शुल्क कमी होऊनही
दरात घसरण, शेतकर्‍यांत चिंता
सिन्नर : प्रतिनिधी
केंद्र शासनाने कांद्यावरील 20 टक्के निर्यात शुल्क रद्द केल्याने 1 एप्रिल नंतर कांद्याच्या दरात सुधारणा होईल, अशी शेतकर्‍यांना लागून असलेली अपेक्षा फोल ठरली आहे. गुरुवारी (दि.3) सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे लिलाव सुरू झाल्यानंतर कमीत कमी 500 सरासरी 1270 तर कमाल 1376 रुपये क्विंटल दराने व्यापार्‍यांनी कांद्याची खरेदी केली. विशेष म्हणजे गेल्या आठवड्यात हाच कांदा तब्बल 1650 रुपये क्विंटल दराने विकला गेला होता. त्यामुळे निर्यात शुल्क घटूनही दरात सुधारणा न झाल्याने शेतकर्‍यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.
मार्च अखेरमुळे बंद असलेल्या सिन्नर मुख्य बाजार आवारातील कांदा लिलावाचा नविन आर्थिक वर्ष सुरु होताच कांदा व्यापारी बाळकृष्ण चकोर यांचे हस्ते आणि सभापती गणेश घोलप यांच्यासह संचालकांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी दिलीपशेठ खिवंसरा, बाबुशेठ लढ्ढा, महेशशेठ पारख, विजय तेलंग, सतीषशेठ चकोर, बबन गोळेसर, सुनिल पन्हाळे, रवि बोर्‍हाडे, संजय सानप, तुषार कलंत्री, नागेश लहामगे, अनिल लहामगे आदी व्यापारी उपस्थित होते. बाजार समितीच्या आवारात 25 पिकअप, 68 ट्रॅक्टर अशा 93 वाहनातून 1950 क्विंटल कांद्याची आवक झाली होती. सिन्नर येथील शेतकरी ज्ञानेश्वर लोंढे यांच्या ट्रॅक्टर ट्रॉलीतून विक्रीस आलेल्या उन्हाळ कांदा शेतमालास लिलावात सर्वाधिक 1376 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. दरम्यान, सरासरी दर 1270 रूपये प्रति क्विंटल प्रमाणे राहिले. लिलावा नंतर बाजार समितीचे कार्यालयातून शेतकर्‍यांना त्वरीत रोख पेमेंट अदा करण्यात आले.

अशी झाली दरात घसरण
गेल्या आठवड्यात दोडी उप बाजारात कांद्याला सरासरी 1300 रुपये क्विंटल दर मिळाला होता. जास्तीत जास्त 1511 रुपये क्विंटल दराने कांदा विकला गेला होता. त्याचबरोबर नांदूर शिंगोटे येथे गेल्या आठवड्यात शुक्रवारी सरासरी 1300 ते 1600 रुपये क्विंटल दराने कांद्याची खरेदी व्यापार्‍यांनी केली होती. तर सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजार आवारातही हाच दर कायम होता. नवीन आर्थिक वर्षात कांद्याचे लिलाव सुरू होताच निर्यात शुल्क हटवूनही दरात मात्र दोनशे ते तीनशे रुपयांची घसरण झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *