नाशिक : प्रतिनिधी
जिल्हा परिषदेतील अधिकारी व कर्मचारी वर्गासाठी ऑनलाइन हजेरी सक्तीचे आदेश देण्यात आले असून, गैरहजेरीवर थेट कारवाईची चेतावणी मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी दिली. दि.20 रोजी प्राप्त झालेल्या अहवालानुसार अनेक कर्मचारी ऑनलाइन हजेरी प्रणालीचा वापर टाळत असल्याचे आढळून आले. मुख्य कार्यकारी अधिकारी पवार यांनी जिल्हा परिषदेतील विविध विभागांना अचानक भेट देऊन कामकाजाचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी कर्मचारी व अधिकार्यांच्या हजेरीचा अहवाल मागविला. या अहवालातून हजेरीबाबत मोठ्या प्रमाणावर अनियमितता समोर आली. यावर तत्काळ पत्र काढत पवार यांनी सर्व अधिकारी व कर्मचारी वर्गास सक्त सूचना दिल्या. यापुढे ऑनलाइन पंच-इन व पंच-आऊट प्रणालीद्वारे 100 टक्के हजेरी नोंदविणे बंधनकारक राहणार आहे. महिन्यात तीन वेळा उशिरा हजेरी नोंदवल्यास एक दिवसाची रजा धरली जाणार आहे. तसेच हजेरी नोंदवली नाही तर संबंधितांचे वेतन रोखण्यात येईल. सतत गैरहजर राहणार्यांविरोधात विभागीय चौकशीचा प्रस्ताव दाखल करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. या आदेशामुळे जिल्हा परिषदेत कार्यरत कर्मचारी व अधिकार्यांमध्ये खळबळ उडाली आहे.