ग्रामीण भागात पुरुष अग्रेसर, शहरात मात्र अनास्था
नाशिक ः प्रतिनिधी
कुटुंबात एक किंवा दोन मुले झाली की, कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया करण्याचा विचार केला जातो. महिलांच्या तुलनेत कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया करण्यात पुरुषांंचे प्रमाण कमीच आहे. शहरी भागात तर हे प्रमाण अत्यल्प आहे. आदिवासी पाड्यांवर मात्र कुटुंबनियोजन शस्त्रक्रियांचे प्रमाण जास्त असल्याचे चित्र आहे.
महिलांच्या तुलनेत केवळ 4.11 टक्के पुरुषांनी नसबंदी केल्याचे आकडेवारीवरून दिसतेे. 2024-25 च्या मार्चअखेर 657 पुरुषांनी नसबंदी केली. मार्च ते मेपर्यंत केवळ तिघांंनी नसबंदी केली आहे.
कुटुंब नियोजनाच्या सन 2023-24 या वर्षभरात केवळ 728 पुरुषांच्या, तर 16 हजार 890 महिलांनी शस्त्रक्रिया केल्या आहेत. 2024-25 मार्चअखेर 657 पुरुषांनी नसबंदी केली आहे. 15 हजार 985 महिलांनी कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया केली आहे. महिलांच्या तुलनेत पुरुषांचे नसबंदी करण्याचे प्रमाण कमी आहे.
पेठ, सुरगाणा व त्र्यंबकेश्वर या आदिवासी भागातील पुरुष नसबंदी करण्यात अग्रेसर असून, अजूनही शहरी भागात पुरुषांमध्ये नसबंदीबाबत अनास्था असल्याचे चित्र आहे. 2024 मध्ये जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने 21 ते 4 डिसेंबर या कालावधीत पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया पंधरवडा राबविण्यात आला. यात पेठ, सुरगाणा व त्र्यंंबकेश्वर या आदिवासी भागातील केवळ 143 पुरुषांनी नसबंदी केली होती. 2024-25 मार्चअखेर पंधरा तालुक्यांत दिंडोरी 18, निफाड 10, पेठ 226, सुरगाणा 230, त्र्यंबकेश्वर 150 आणि याच तालुक्यांत महिलांचे कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया करण्याचे प्रमाण इतर तालुक्यांच्या प्रमाणात अधिक आहे. इतर तालुक्यांत पुरुषांच्या अत्यल्प नसबंदी शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.
पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर व दिंडोरी या आदिवासी भागात पुरुष नसबंदीचे प्रमाण दिलासादायक आहे. ग्रामीण भागात नसबंदीचे प्रमाण अधिक असल्याचे दिसते. कुटुंब पूर्ण झाल्यांनतर कुटुंबनियोजन शस्त्रक्रियेसाठी महिलेला आग्रह केला जातो.
मूल जन्माला घालणे, संतती नियमनाची शस्त्रक्रिया करणे ही महिलांचीच जबाबदारी आहे, अशी समाजात धारणा आहे. हा प्रघात पुरुषांनी अजूनही धरून ठेवला आहे. याबाबत जनजागृती करणे अत्यंत गरजेचे आहे. शहरी भागापेक्षा आदिवासी भागात पुरुष नसबंदीचा स्वीकार करण्याचे प्रमाण जास्त आहे. शहरी भागात डॉक्टरांचे समुपदेशन, जनजागृती कमी होत असावी, असे चित्र आकडेवारीवरून दिसते.
लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया
पुरुष नसबंदी लॅप्रोस्कोपिकद्वारे केली जाते. त्यामुळे दुसर्या दिवशी पुरुष घरी जाऊ शकतो. अशक्तपणा किंवा पुढील आयुष्यावर कोणताच परिणाम होत नाही. पूर्वीसारखे काम करू शकतात.
हम दो- हमारा एक!
वाढत्या महागाईत पती-पत्नी कमावते असले, तरी हम दो- हमारा एक अशी मानसिकता होत आहे. मुलगा किंवा मुलगी असली तरी कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करून घेण्यावर भर असतो.
हे आहेत गैरसमज
कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया केल्याने पुरुषत्व कमी होते. ताकद कमी होते. पुरुषांना मेहनतीचे काम करावेे लागते. कुटुंबातील ज्येष्ठांचा आणि महिलांचाही विरोध होत असल्याने पुरुष नसबंदी करून घेण्यात नाखूश असतात.
शस्त्रक्रियेत सहभाग वाढावा यासाठी जनजागृतीवर भर दिला जात आहे. पुरुषांना नसबंदीचा कोणताही त्रास होत नाही. लोकांनी चुकीचा गैरसमज करू नये.
– डॉ. हर्षल नेहते, माता व बाल संगोपन अधिकारी, जिल्हा परिषद, नाशिक