‘नदीचे स्वर आणि नाद : नदिष्ट‘ या विषयावर श्रोत्यांना केले मार्गदर्शन
नाशिक : प्रतिनिधी
नदी आणि माणूस यांचं एक जन्मोजन्मीचं नातं आहे. निसर्ग वाचला पाहिजे. निसर्गातील प्रत्येक घटक आपल्याला खूप काही शिकवत असतो, मात्र आपण निसर्गाला समजून घेत नाही. निसर्गाला जर समजून घेतलं तर निसर्ग आणि माणूस यांचे सुंदर नातं तयार होईल, असे असे प्रतिपादन साहित्यिक प्रा. मनोज बोरगावकर यांनी केले.
गोदाघाटावरील देवमामलेदार यशवंतराव महाराज पटांगणावर सुरू असलेल्या वसंत व्याख्यानमालेचे स्व. द गे. खैरनार (गुरुजी) स्मृतिव्याख्यानात 15 वे पुष्प गुंफताना “नदीचे स्वर आणि नाद : नदिष्ट” या विषयावर प्रा. बोरगावकर बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर ज्योती स्टोअर्सचे संचालक तथा स्व. खैरनार गुरुजी यांचे चिरंजीव वसंतराव खैरनार, प्रकाशक विलास पोद्दार आदी उपस्थित होते.
बोरगावकर यांनी यावेळी नदिष्ट या आपल्या कादंबरीतील वेगवेगळ्या व्यक्तिरेखा उलगडून दाखवल्या. नदीचे आणि माणसाचे युगानुयुगाचे नाते आहे. नदीने अनेक गोष्टी आपल्या पोटात सामावून घेतल्या. पण गोदामाईने याची कुठेही तक्रार केलेली आढळत नाही. बोरगावकर पुढे म्हणाले की, मला कविता, आई आणि नदी ही एकच रुपे वाटतात. रात्रीच्या वेळी नदी शांत असते. नदीतील अनेक जीवजंतू रात्रीच्या वेळी आपल्या भावसमाधीत असतात.
आपली ही पर्यावरणाची, नदीची संस्कृती सांभाळणारे लोक खर्या अर्थाने वंचित होती आणि या वंचितांनीच आपली नदीची आणि एकूणच पर्यावरणाची संस्कृती सांभाळली आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
प्रारंभी स्व. खैरनार गुरुजी यांच्या जीवनावर आधारित चित्रफीत दाखवण्यात आली, तसेच त्यांच्या प्रतिमेला मान्यवरांचे उपस्थितीत पुष्पहार अर्पण करण्यात आला.
प्रा. बोरगावकर यांचा सत्कार वसंतराव खैरनार तसेच विलास पोतदार यांनी केला. रमेश खापरे यांनी विलास पोतदार, वसंतराव खैरनार यांचा सत्कार केला. व्याख्यानानंतर संगीतकार बर्मन यांच्या हिंदी गीतांवर आधारित कार्यक्रम संपन्न झाला. यात प्रशांत चंद्रात्रे, नमिता राजहंस, राधा जोशी, प्रकाश पाटील, प्रल्हाद चौधरी आदींनी सहभाग नोंदवला.
नाशिक वसंत व्याख्यानमाला
आजचे व्याख्यान
संतोष फासाटे प्रस्तुत सदाबहार हिंदी गाण्यांचा कार्यक्रम सादर होईल.
यात अविनाश देवरुखकर, राजू पवार व सहकारी आपला सहभाग नोंदवतील.