नाशकात ‘स्थानिक’साठी विरोधकांची वज्रमूठ

मविआ-मनसे एकत्र मात्र, अंतिम निर्णय वरिष्ठच घेणार

नाशिक : प्रतिनिधी
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी नाशिक जिल्ह्यात मोठे राजकीय समीकरण जुळून आले आहे. महाविकास आघाडी (मविआ) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) यांनी एकत्र येत निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे. सोमवारी (दि. 10) नाशिक येथे झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ही घोषणा औपचारिकपणे करण्यात आली. विशेष म्हणजे, राज्यात प्रथमच मनसे मविआसोबत आली असून, या घडामोडीने राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
या पत्रकार परिषदेला मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील, सलीम शेख, काँग्रेसचे राहुल दिवे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे वसंत गिते, विनायक पांडे, माकपचे डॉ. डी. एल. कराड, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाचे गजानन शेलार, शिवसेनेचे डी. जी. सूर्यवंशी, प्रथमेश गिते, अंकुश पवार, सुदाम कोंबडे, तानाजी जायभावे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
मनसेचे नेते दिनकर पाटील यांनी सांगितले, की लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. मुंबईत एकत्र मोर्चा काढल्यानंतर आता नाशिकमध्येही आम्ही संयुक्तपणे उभे आहोत. ओला दुष्काळ, कर्जमाफी आणि शेतकर्‍यांच्या न्यायासाठी आम्ही लढा सुरू ठेवणार आहोत, असे त्यांनी नमूद केले. यावेळी डॉ. डी. एल. कराड म्हणाले, की राज्यात सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणण्याचा आमचा प्रयत्न यशस्वी होत आहे. राज्यात भ्रष्टाचाराचे थैमान आहे. जातीपातीचे राजकारण करून जनतेत फूट पाडली जाते. हे थांबवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. आगामी निवडणुका एकत्र लढविण्याचा निर्णय घेतला आहे. मतदार याद्यांमधील त्रुटी दूर करून मतपत्रिकेवरच मतदान व्हावे, अशी आमची मागणी आहे, असे त्यांनी सांगितले.
वसंत गिते म्हणाले, की आम्ही विरोधी पक्षात आहोत. विरोधक म्हणून सत्ताधार्‍यांच्या विरोधात एकत्र येत आवाज उठवणे आणि निवडणुकीच्या माध्यमातून एकत्रित सामना करत आहोत. गजानन शेलार म्हणाले, की आमच्या प्रत्येक पक्षाची ताकद एकत्र झाली तर भ्रष्टाचारी सरकारला उत्तर देऊ शकतो.

प्रस्ताव वरिष्ठांना पाठवणार : दिवे
वरिष्ठ पातळीवर काँग्रेसकडून अद्याप वेट अँड वॉचची भूमिका ठेवली असली तरी, स्थानिक पातळीवरील युती संदर्भात स्थानिक पदाधिकार्‍यांकडून वरिष्ठ मत जाणून घेणार असल्याने असल्याने मनसे सोबत स्थानिक पातळीवर युतीबाबतचा प्रस्ताव वरिष्ठांना पाठवणार असल्याचे राहुल दिवे यांनी सांगितले.
मुंबईत काही दिवसांपूर्वी मविआ आणि मनसेने संयुक्त मोर्चा काढला होता. त्या वेळी काँग्रेसचा सहभाग मर्यादित होता. मात्र, आता नाशिकमध्ये काँग्रेस आणि मनसेचे स्थानिक पदाधिकारी एकत्र येऊन पत्रकार परिषद घेत असल्याने राजकीय वर्तुळात युतीबाबत जोरदार चर्चा सुरू झाली आहे. नाशिकमधील ही घडामोड राज्यातील आगामी राजकारणाचे नवीन समीकरण ठरू शकते. मविआ-मनसे एकत्र आल्याने महायुतीसमोर कठीण आव्हान उभे राहण्याची शक्यता राजकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

नाशकात विरोधकांची एकी
अगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुत्तीसमोर तगडे आव्हान निर्माण करण्यासाठी नाशकात विरोधकांनी एकीची मोट बांधली असून आगामी निवडणुका एकत्र लढण्याचा निर्धार केला आहे.

काँग्रेसची राज्यपातळीवर स्वतंत्र चुल

स्थानिक पातळीवर मनसे आणि महाविकास आघाडीत घटक पक्षांनी एकीची मोट बांधत महायुतीचा सामना करण्याचे ठरवले आहे. मात्र राज्य पातळीवर काँग्रेसने निवडणुका स्वबळावर लढविण्याचा निर्णय घेतल्याने याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. स्थानिक पातळीवर विरोधकांचे झालेले मनोमिलन वरिष्ठांच्या संमतीने टिकणार की फक्त स्थानिक पातळीपुरते मर्यादित राहणार हे आगामी काळात स्पष्ट होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *