मुंबई :
महापालिका निवडणुकीत बोटावर मार्करने लावण्यात येणारी शाई पुसली जात असल्याच्या तक्रारीची राज्य निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. निवडणुकीसाठी कोरस कंपनीने मार्कर पुरवले आहेत. त्यामुळे या कंपनीची चौकशी केली जाईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी गुरुवारी दिली. तसेच आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत असा प्रकार होऊ नये म्हणून भारत निवडणूक आयोग विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत जी मैसूर इंक कंपनीची शाई वापरते ती शाई वापरण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी गेलेल्या मतदाराला मतदानाच्या पूर्वी बोटावर मार्करने शाई लावली जात आहे. मात्र, ही शाई पुसली जात असल्याच्या तक्रारी आहेत. यासंदर्भात समाज माध्यमात व्हिडीओही व्हायरल झाले होते. मात्र, राज्य निवडणूक आयोगाने लावलेली शाई सहज पुसली जात असल्याचे दावे चुकीचे असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, या प्रकरणाबाबत प्राप्त झालेल्या तक्रारींची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच निवडणुकीदरम्यान गोंधळ निर्माण करणार्यांवर कारवाईचा इशाराही वाघमारे यांनी दिला आहे. सन 2011 पासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत बोटावर शाई लावण्यासाठी मार्कर वापरले जात आहेत. शाई लावल्यानंतर ती सुकायला 10 ते 12 सेकंद लागतात. या कालावधीत मतदार मतदान कक्षातच असतो. एकदा शाई सुकली की ती काढता येत नाही. ज्या प्रकारची शाई मार्करमध्ये आहे तीच शाई भारत निवडणूक आयोग वापरतो. जर शाई पुसून दुबार मतदान झाले, तर संबंधित मतदारावर कारवाई केली जाईल, असे वाघमारे यांनी सांगितले. शाई सुकण्याआधी ती पुसली गेली तर ती मतदाराची चूक आहे. अशा मतदारांवर गुन्हाही दाखल होऊ शकतो, असे ते म्हणाले.
शाई पुसली जात असल्याचा विरोधकांचा आरोप
दरम्यान, काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी वापरण्यात येणारा मार्कर पेन निकृष्ट दर्जाचा असून शाई सहज पुसली जात असल्याचा आरोप केला. शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब आणि युवासेनेचे नेते साईनाथ दुर्गे यांनीही हाच आरोप केला आहे. शाई पुसण्यासाठी सॅनिटायझरचीही गरज नाही. शाई तशीच पुसली जाते, असे परब म्हणाले. तर मी आज सकाळी मतदान केले आणि घरी गेल्यावर डेटॉलने हात धुतला. तेव्हा शाई पूर्णपणे निघून गेली. हा गंभीर मुद्दा असून बनावट मतदानाची शक्यता निर्माण होते, असे दुर्गे यांनी सांगितले.
जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मार्कर वापरला जाणार नाही
मतदान सुरु असतानाच राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना त्यांनी म्हटले की, बोटाला मार्करद्वारे लावत असलेली शाई एकदा सुकली की ती निघू शकत नाही. ज्या लोकांनी शाई पुसण्याचा प्रयत्न केला त्यासाठी त्यांनी काय वापरले हे आम्हाला माहिती नाही. समाजात फेक नरेटिव्ह पसरवल्याचा प्रयत्न केला जात आहे. यावर पत्रकारांनी आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत मार्करचा वापर करणार का? असा प्रश्न उपस्थित केला. याला उत्तर देताना वाघमारे यांनी, ‘मार्कर पेनचा अनुभव पाहता आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत आम्ही इंडिलेबल इंकचा वापर करणार आहोत.’ अशी घोषणा केली आहे. त्यामुळे आता 5 फेब्रुवारीला मार्करऐवजी काडीने बोटाला शाई लावली जाणार आहे.
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…