श्रावणी सोमवारी कपालेश्वराचे लाखावर भाविकांनी घेतले दर्शन

भक्तांनी केला ‘हर हर महादेव’चा गजर

पंचवटी : प्रतिनिधी
श्रावणातील तिसर्‍या सोमवारला अधिक महत्त्व असल्याने तिसर्‍या सोमवारची पर्वणी साधत लाखाच्या वर शिवभक्तांनी गोदास्नान करत श्री कपालेश्वर महादेवाच्या दर्शनाचा योग साधला. यामुळे गंगाघाट परिसर शिवभक्तांनी
फुलून गेला होता. सायंकाळी निघालेल्या श्री कपालेश्वर पंचमुखी महादेव पालखी दर्शनासाठीही भाविकांची गर्दीदेखील उसळली होती. यावेळी महादेव भक्तांनी ‘बम बम भोले’ व ‘हर हर महादेव’चा गजर करत गोदाघाट दुमदुमला गेला.
विविध सण आणि व्रतवैकल्ये करण्यासाठी पवित्र मानला गेलेला श्रावण महिना भगवान शंकराला अत्यंत प्रिय असल्याने या महिन्यापासून सण-उत्सवांची सुरुवात होते तसेच शिवभक्त उपवास, पूजा आणि अभिषेक करतात. श्रावण महिन्यात धार्मिक कार्यांना विशेष महत्त्व असून, या महिन्यात वैदिक पूजा, धार्मिक विधी केल्याने भक्तांना सुख, शांती, समृद्धी आणि मोक्ष मिळतो, अशी श्रद्धा आहे. त्यामुळे श्रावण महिन्यातील तिसर्‍या श्रावणी सोमवारला विशेष महत्त्व असल्याने भगवान श्री शंकराचे दर्शन घेण्यासाठी गोदाघाटावरील विविध शिवमंदिरांत आबालवृद्ध भाविकांची गर्दी उसळली होती. श्री महादेव कपालेश्वर मंदिरात गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी संस्थानचे प्रशासक विलास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष व्यवस्था केली होती. महादेवाच्या पिंडीभोवती केलेली आरास भाविकांचे लक्ष वेधून घेणारी ठरली. पहाटेपासूनच स्त्री-पुरुष भक्तांनी दर्शन तसेच पूजाविधी करण्यासाठी गर्दी केली होती. रात्री उशिरापर्यंत दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. तर अनेक शिवभक्तांनी सालाबादप्रमाणे मंदिर प्रदक्षिणाही केली.
सायंकाळी निघालेल्या श्री कपालेश्वर पंचमुखी महादेव सोमवार पालखीचे ठिकठिकाणी स्वागत झाले. मंत्रोच्चार करणारे बाल ब्रह्मवृंद तसेच ढोल व झांज पथकाने पालखी सोहळ्याची रंगत वाढवली. श्रीक्षेत्र रामकुंड येथे पंचमुखी मुखवट्याचे स्नान व आरती झाल्यानंतर पालखी सोहळ्याची सांगता झाली. यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक गजेंद्र पाटील आपल्या कर्मचार्‍यांसह गोदाघाट परिसरावर लक्ष ठेवून होते. मालेगाव स्टॅण्ड, लेवा पाटीदार भवन, खांदवे सभागृह येथून वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आल्याने भाविकांना निर्विघ्नपणे दर्शन व पूजाविधीसाठी जाता आले.

पालखीचे रांगोळ्यांनी स्वागत

तिसर्‍या श्रावणी सोमवारी पहाटे चार वाजता पुजारी व गुरव यांच्या हस्ते कपालेश्वर महादेवाचा दुग्धाभिषेक व जलाभिषेक करून पूजा करण्यात आली. दुपारी पंचमुखी कपालेश्वराचा मुकुट व मुखवटा मंदिरात आणून त्याची विधिवत पूजा करून सवाद्य पालखी सोहळ्यास सुरुवात झाली. पालखी मिरवणुकीने कपालेश्वर मंदिरातून मार्गक्रमण करत मालवीय चौक, शनी चौक, काळाराम मंदिर पूर्व दरवाजा, सरदार चौक, मुठे गल्ली, पुन्हा शनी चौकातून रामकुंड गाठले. मार्गावर ठिकठिकाणी आकर्षक रांगोळ्या काढून आणि फुलांनी सजवून पालखीचे स्वागत करण्यात आले. दर्शनासाठी रस्त्यालगत भाविकांची मोठी रांग लागली होती.रामकुंडावर पोहोचताच पंचमुखी कपालेश्वराचा दूध, दही, मध व उसाच्या रसाने अभिषेक करण्यात आला. महापूजा आणि महाआरतीनंतर मुखवटा पुन्हा कपालेश्वर मंदिरात आणण्यात आला.

प्रशासकांकडून नियोजन

कपालेश्वर संस्थानमध्ये विश्वस्तांचा कार्यकाळ संपल्याने सध्या प्रशासकीय अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कपालेश्वर मंदिरावर नियुक्त असलेले प्रशासक विलास पाटील यांनीदेखील पहिल्या श्रावणी सोमवारपासून चोख नियोजन केले आहे. विशेष म्हणजे, त्यांनी व्हीआयपी दर्शनाला बंदी घातल्याने भाविकांचा त्रासदेखील कमी झाल्याने भाविकांनी समाधान व्यक्त केले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *