पंचवटीतील पोलिसावर निलंबनाची कारवाई

अंमली पदार्थ विकणार्‍यांशी कनेक्शन उघड

सिडको : विशेष प्रतिनिधी
नाशिक पोलीस दलात मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. पंचवटी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला पोलीस हवालदार युवराज शांताराम पाटील अंमली पदार्थ विक्री आणि गुन्हेगारांच्या संपर्कात असल्याचे उघड झाल्याने पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी निलंबनाची कारवाई केली आहे.
तपासा दरम्यान पोलीस हवालदार युवराज पाटील याचे भद्रकाली, इंदिरानगर आणि नाशिकरोड पोलिस ठाण्यात अंमली पदार्थ विक्री करणार्‍या गुन्हेगारांशी नियमितपणे संपर्क असल्याचे आढळून आले. त्याचबरोबर, इंदिरानगर आणि भद्रकाली पोलीस ठाणे येथे गोवंश मांस विक्री व वाहतुकीसाठी जबाबदार असलेल्या गुन्हेगारांशी त्याचे मोबाइलवर संभाषण सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे.
युवराज पाटील याचा अंमली पदार्थ विक्री प्रकरणात सहभाग असल्याने त्याला सहआरोपी म्हणून गुन्ह्यात समाविष्ट करण्यात आले आहे. पोलीस आयुक्त कर्णिक यांच्या आदेशानुसार पाटील याला निलंबन कालावधीत राखीव पोलीस म्हणून मुख्यालयात हजेरी लावण्याचे आणि परवानगीशिवाय मुख्यालय न सोडण्याचे निर्देश दिले आहेत.

या प्रकारामुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांमध्ये असा विश्वासार्ह सदस्य गुन्ह्यात सामील असल्याने पोलीस आयुक्त कर्णिक यांनी संपूर्ण तपास तपशीलवार करण्याचे निर्देश दिले आहेत. इतर पोलीस कर्मचार्‍यांचे फोन रेकॉर्ड तपासून त्यांच्यावर देखील कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.पोलिस हवालदार युवराज पाटील याने पोलीस शिस्तीचा भंग करत, जबाबदारीचे उल्लंघन केले आहे. त्याच्यावर कारवाई केली गेली असली तरी पोलीस दलात अशा प्रकारच्या वर्तनाने चिंता व्यक्त केली जात आहे. तसेच, इतर पोलीस ठाण्यांमध्येही अशा प्रकारच्या कार्यपद्धतीला आळा घालण्यासाठी पोलीस विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी गंभीर चर्चा सुरू केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *