पंढरीची वारी आणि वारकरी संप्रदाय

हाराष्ट्राचे आध्यात्मिक, परमार्थिक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे पंढरीची वारी. महाराष्ट्रात भीमा नदीतीरावर असणार्‍या लोकविख्यात पवित्र तीर्थक्षेत्र पंढरपूर क्षेत्राचे अधिष्टातृदैवत जे पांडुरंग किंवा श्रीविठ्ठल या नावाने ओळखले जाते, त्याच्या दर्शनासाठी नित्यनियमाने येणार्‍या भाविकाला वारकरी असे म्हणतात. पंढरी क्षेत्रात नियमित येऊन विठ्ठलदर्शनाचे गुरुपरंपरेने उपासना स्वरूपात वारीचे असे म्हणतात. वारकरी हा शब्द वारीकरी या शब्दाचा अपभ्रंश असावा, जो मूळ वारीकर या शब्दापासून आलेला आहे. संत ज्ञानोबा यांच्या अभंगात वारीकर हा शब्द याच अर्थाने येतो.
काया वाचा मने जीवे सर्वस्व उदार।
बाप रखुमादेवीवर विठ्ठलाचा वारीकर॥
वारी म्हणजे नियमित येणे व जाणे-येरझार करणे. आपल्या इष्टदेवतेच्या दर्शनासाठी येरझार करणारा तो वारीकर. अमरकोशात वार या शब्दाचा समुदाय अगर संघात असा अर्थ दिला आहे. या अर्थाने वारकरी हा एका समुदायाचा, संघाचा घटक असतो. ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीतही वारी शब्द निरनिराळ्या संदर्भाने वापरला आहे. महाराष्ट्रात जेजुरीच्या खंडोबाची, कोल्हापूरजवळ ज्योतिबाची, तुळजापूरच्या तुळजा भवानीचीदेखील वारी करणारा वर्ग आहे; परंतु वारकरी म्हणजे पंढरीचा वारकरी असा अर्थ विशेषरीत्या रूढ होत गेला आहे. आज या संप्रदायाचे महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेर आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश आदी प्रांतातदेखील उपासक असून, यांची संख्या कोटीने आहे. पंढरीशी संबंधित आषाढी, कार्तिकी, माघी व चैत्री या चार प्रमुख व दर महिन्याच्या शुद्ध दशमी, एकादशी व द्वादशीस संयुक्त अशी मासिक वारी करणारे वारकरीदेखील आहेत. या संप्रदायाला अद्वैत तत्त्वज्ञानाचा वेदांतयुक्त संतवाङ्मयाचा, अभंग, अवीट व अविचल असा पाया लाभत आहे. याचे अधिष्टातृदैवतही तितकेच सरळ, सहज व सर्वांना आश्रय देणारे आहे. संप्रदायाचे तत्त्वज्ञानही सर्वसमावेशी व सर्वांना भक्ती-ज्ञान कर्मोपासनेचा अधिकार आहे, हे सांगणारे आहे.
यालाच भागवत धर्म असे नाव महाराष्ट्रात प्रचलित आहे. संप्रदायाचे उपास्यदैवत श्रीविठ्ठल हे गोपाळकृष्णाचे बालरूप मानले जाते. भोळी बाळमूर्ती पांडुरंग। श्रीकृष्णांस तुलसीदल अत्यंत, प्रिय या तुळशीलकाष्टापासून तयार केलेली मेरूमण्यासह असणारी 108 मण्यांची तुळशीमाळ प्रत्येक वारकरी श्रद्धापूर्वक, निष्ठेेने आपल्या गळ्यात घालतो. या लक्षणाने या संप्रदायाला टिळा लावणे, तुळशीकाष्ठ माळ धारण करणे, संतवाङ्मयाचा नित्यपाठ, हरिपाठ म्हणणे व एकादशीव्रत करणे, हे सोपे नियम या उपासकांना आहेत. मद्य-मांसाहार-व्यभिचार आणि पापाचरणाचा निषेधही संप्रदायाच्या आचारविचारात केला आहे. जगद्गुरू आद्य शंकराचार्यांनी आपल्या शांकरभाष्यात ज्यांचे खंडन केले तो भागवतधर्म द्वैती असून, वासुदेव, संकर्षण, प्रद्युम्न व अनिरुद्ध चर्तुव्यूह कल्पना त्यात प्रमुख आहेत. द्वारकाधीश श्रीकृष्ण परमात्म्याचे बाळरूप हे श्रीविठ्ठलरूपाने उपास्यदैवत असल्याने हा वैष्णव संप्रदाय आहे. वेद, स्मृती, उपनिषद, षड्दर्शन, पुराणादि, इतिहासग्रंथ, श्रीमद्भागवत, भगवद्गीता तसेच ज्ञानोबाराय, नामदेवराय, एकनाथ महाराज, तुकोबाराय व निळोबाराय इ. सर्व विठ्ठलभक्त वैष्णव संतांचे वाङ्मय या सांप्रदायिकांना प्रमाण आहे. सगुणोपासना, नामस्मरण, हरिकीर्तन सर्वात्मभाव, आत्मसमर्पण, अनन्य शरणागती गुरुकृपा इ. भागवताच्या एकादश स्कंधात सांगितलेली भागवत श्रेष्ठाची लक्षणे ही वारकर्‍यांचीही लक्षणे ठरतात. भक्ती हे वारकरी भागवत धर्माचे सारभूत तत्त्व आहे. आपल्यापेक्षा श्रेष्ठ असणार्‍या व्यक्ती तत्त्व वा शक्तीची सापेक्ष किंवा निरपेक्षभावाने अंत:करणापासून केलेली अखंड सेवा म्हणजे भक्ती उपासक उपास्य व उपासना किंवा भज्य-भजक भक्ती अशी त्रिपुटी यात आढळते. शुद्धभक्ती मागाचा प्रसार करत धार्मिक क्षेत्राशी संबंधित जागृतीबरोबरच तद्अनुषांगिक समाजिक व वाङ्मयीन कार्यदेखील या उपासकांनी केलेले दिसते. वारकरी संप्रदाय हा पथ वैदिक धर्माविरुद्धचे बंड नसून त्यातीलच प्रागतिक स्वरूप आहे. या संप्रदायातील उपासक संतांच्या वाङ्मयप्रमाणातून येणारी अनेक प्रमाणे हा वैदिक परंपरेतील संप्रदाय आहे, हे सिद्ध करतात. आपल्या वैदिक सनातन धर्मपरंपरेच्या मूळ स्वरूपाला धक्का न लावता स्वतःचा सर्वाननुकूल सर्वसमन्वयक विस्तार, वारकरी संप्रदायाने केलेला दिसतो. या पंथाच्या अनुयायी व मार्गदर्शक संतांनी वेदांचे प्रामाण्य मान्य केले. जो आचार-विचार आम्ही करतो तो वैदिक आचार असून, जो वेदशास्त्रदिकांचे प्रमाणांना मानत नाही. तो पाखंडी आहे, असे संतांनी स्पष्ट केले आहे. ज्ञानोबाराय म्हणतात…
या कारणे पै बापा।
जया आधीचे आपुली कृपा॥
तेणें वेदाचिया निरोपा आन न कीजे॥ (ज्ञानेश्वरी. 16-455)
वेदशास्त्रप्रमाण श्रुतीचे वचन।
एक नारायण सार जप॥
(ज्ञानेश्वर महाराज हरिपाठ अभंग 19) तुकोबाराय म्हणतात…
वेदा निंदी तो चांडाळ।
भ्रष्ट सुतकीया खळ॥2॥
(तु.मं.अ.1345), वेदशास्त्र नाही
पुराणप्रमाण तयाचे वदन नावलोका॥
(तु. मं. अ.2186)
या प्रमाणावरून वारकरी संप्रदाय हा वैदिक संप्रदाय आहे, हे स्पष्ट होते. मात्र, या संप्रदायाचा आरंभ केव्हा झाला असे कालगणनेच्या आधारे सांगता येत नाही. हा मूळ वेदांस चिकटून असणारा व तितकाच प्राचीन संप्रदाय आहे. कारण उपलब्ध ऐतिहासिक शिलालेखांवरून व इतर पुराव्यांवरून नामदेवराय ज्ञानोबारायांच्याही अगोदर या संप्रदायाचे अस्तित्व होते, हे सिद्ध झाले आहे.
वारकर्‍यांची उपासना ही पांडुरंगाभोवती केंद्रित असली, तरी वारकरी संप्रदायाचा इतिहास व मूर्तीचा वा क्षेत्राचा इतिहास याचा संबंध मनानेच जोडता येत नाही. नामदेवराय ज्ञानोबारायाच्या पूर्वकाळातही दोन वेळा यात्रा भरत होती. हे
आषाढी कार्तिकी विसरु नका।
मज सांगत तसे गुज पांडुरंग॥
या नामदेवरायांच्या प्रमाणावरून सिद्ध होते. आद्य शंकराचार्यांच्याही खोतातून पांडुरंगाष्टकातून पंढरी क्षेत्र व पांडुरंगाचा उल्लेख आलेला पाहावयास मिळतो. सगुण उपासनेमध्ये नाम, रूप, लीला आणि धाम या चार गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्यांपैकी धाम म्हणजे देवाचे वास्तव्य असणारे पवित्र ठिकाण पंढरपूर या पवित्र धामास जाण्याची वारीची प्रदीर्घ पंरपरा आहे. जिये मार्गीचा कापडी महेशु या ज्ञानोबारायाच्या वचनाप्रमाणे या परंपरेचे आद्य वारकरी आहे, हे सूचित होते. वारकर्‍याच्या समष्टी म्हणजे सामुदायिक साधना सोहळ्याची सुसंबंध रचना ज्ञानदेवांनी केली. वारी ही वारकरी पंथातील प्रत्येक व्यक्तीसाठी पर्वणीच आहे.
माझ्या जीवाची आवडी।
पंढरपुरा नेईन गुढी॥
हेच वारकर्‍यांचं हृदयगत आहे. भक्तिसाधनेत अभिगमन ही एक किया होय. म्हणजेच आपल्या आराध्याकडे पायी चालत जाणे. वारी म्हणजे केवळ दोन ठिकाणांमधील अंतर कापणे नव्हे, तर वाचिक, कायिक, मानसिक तपाचरण करणे आवश्यक ठरते. नाचत जाऊ त्याच्या गावारेखेळिया असे वारकरी परस्परांना म्हणतात. वारीच्या वाटेने मनाने कोणत्याही भौतिक गोष्टीचे चिंतन घडू नये. वाचेने इतर काही वदू नये. किंबहुना आपला जीवभाव हा केवळ प्रभू असावा, अशी वारी व वारकरी ज्ञानोबारायांना अपेक्षित आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *