दै. गांवकरीच्या वृत्ताची दखल
देवळाली कॅम्प : वार्ताहर
भगूर-पांढुर्ली रस्ता अनेक दिवसांपासून खराब अवस्थेत असून, खड्ड्यांमुळे नागरिकांचे हाल सुरू होते. रस्त्याची ही दयनीय अवस्था लक्षात घेता, स्थानिकांनी दैनिक गांवकरीशी संपर्क साधला. त्यानंतर सोमवारी (दि. 23) दैनिक गांवकरीत या समस्येवर प्रकाश टाकणारी ठळक बातमी प्रसिद्ध करण्यात आली.
या बातमीचा प्रभाव इतका तीव्र होता की, अवघ्या 24 तासांत संबंधित प्रशासनाला जाग आली आणि मंगळवारी (दि. 24) रस्त्याच्या दुरुस्तीचे काम तात्काळ सुरू करण्यात आले. रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, नागरिकांनी या वेगवान कारवाईबद्दल समाधान व्यक्त केले आहे.
आम्ही दैनिक गांवकरीचे आभार मानतो. प्रसारमाध्यमांनी वेळेवर आवाज उठवला तर प्रशासनही उत्तरदायी भूमिका बजावते.
– संदीप भालेराव, स्थानिक नागरिक, पांढुर्ली