सिडको : वार्ताहर
खोटे दस्तऐवज तयार करून स्वतःच्या फायद्यासाठी अफरातफर करून वेळोवेळी रक्कम काढून घेत कंपनीतील भागीदाराची फसवणूक करणार्या दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी शुभम राजेश डिक्कर (वसुंधरा हाईट्स, प्रशांतनगर, पाथर्डी फाटा) यांची अंबड एम. आय.डी.सी.मध्ये ग्रॉफीट्रॉडस प्रा. लि. कंपनी आहे. या कंपनीत फिर्यादी शुभम डिक्कर व आरोपी तुषार नारायण चिमणपुरे ( वय 36, रा. अनमोल, नयनतारा, नाशिक) यांची भागीदारी होती. काही रक्कम देऊन या कंपनीचे कामकाज पाहण्यासाठी फिर्यादी डिक्कर यांनी आरोपी चिमणपुरे यांना मंजुरी दिली होती; मात्र ठरलेली रक्कम न देता आरोपीने कंपनीचे कामकाज चालू ठेवले. दरम्यान, आरोपी तुषार चिमणपुरे व भूषण जी. कोतकर (वय 32, रा. भास्कर भागीरथी, तिडके कॉलनी, नाशिक) यांनी संगनमत करून फिर्यादी शुभम डिक्कर यांची खोटी सही करून खोटा दस्तऐवज तयार केला.
त्या दस्ताचा वापर करून स्वत:च्या फायद्यासाठी अफरातफर केला. त्या दस्तऐवजाच्या आधारे बँकेतून वेळोवेळी रक्कम काढून घेत फिर्यादी डिक्कर यांचे आर्थिक नुकसान केले. हा प्रकार दि. 26 फेब्रुवारी 2020 ते दि. 11 मे 2022 या कालावधीत घडला. ही बाब लक्षात आल्यानंतर डिक्कर यांनी अंबड पोलीस ठाण्यात तुषार चिमणपुरे व भूषण कोतकर यांच्याविरुद्ध फिर्याद दिली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पवार करीत आहेत.