आज पक्षनेत्यांची बैठक : भुजबळ

पुणे ः
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे महाराष्ट्र शोकसागरात लोटला गेला आहे. अजित पवार यांच्या पार्थिवावर काल बारामतीत अंत्यसंस्कार झाले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घडामोडींना वेग आला आहे. खासदार प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या बैठकीला मंत्री छगन भुजबळ, धनंजय मुंडेदेखील हजर होते. विधिमंडळ गटनेता ठरवण्यासाठी आज पक्षाच्या नेत्यांची बैठक होईल. त्यात सुनेत्रा पवार यांचे नाव निश्चित झाल्यास उद्याच शपथविधी होण्याची शक्यता मंत्री छगन भुजबळ यांनी बोलून दाखवली आहे. याबद्दल भुजबळ यांनी अशी माहिती दिली की, ‘आम्ही काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटलो. त्यावेळी प्रफुल पटेल, सुनील तटकरे, धनंजय मुंडे उपस्थित होते. आजही आम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ गटनेतेदी निवड व्हावी यासाठी पक्षातील नेते, आमदार आग्रही आहेत. आम्ही ही बाब उद्याच्या बैठकीत सुनेत्रा वहिनींच्या कानावर घालू. त्यांचे मत जाणून घेऊ. शक्य झाल्यास उद्याच त्यांचा शपथविधी होईल. या सगळ्यामध्ये प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे लक्ष घालत आहेत,’ असं भुजबळ यांनी सांगितले.अजित पवार यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्षपद हाते. तेच पक्षाचे विधिमंडळ गटनेते होते. मग या दोन्ही पदांवर सुनेत्रा पवार यांचीच वर्णी लागणार का?, असा प्रश्न भुजबळ यांना विचारण्यात आला. त्यावर विधिमंडळ गटनेता निवडण्याला आमचे प्राधान्य आहे. त्यासाठी उद्याच बैठक घेतली जाईल. या बैठकीत सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब होऊ शकतं, असं भुजबळ म्हणाले.

Party leaders meeting today: Bhujbal

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *