एसी लोकलमध्ये प्रवाशाचा चक्क छत्री उघडून प्रवास
शहापूर : साजिद शेख
लोकल ही मुंबईतल्या प्रवाशांची लाईफलाइन आहे. रोज लाखो प्रवासी मुंबईत येण्यासाठी आणि मुंबईतून आपलं घर गाठण्यासाठी ट्रेनचा वापर करतात. मुंबईकरांच्या आयुष्यात ट्रेनचं महत्त्व अनन्यासाधारण आहे. या लोकल ट्रेनमधले अनेक किस्से, व्हिडीओ, फोटो व्हायरल होत असतात आणि चर्चेत येतात. असाच एक फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. एका प्रवाशाने एसी लोकलमध्ये छत्री उघडून प्रवास केल्याचा हा फोटो आहे.
एसी लोकलमध्ये खूप गर्दी आहे. या गर्दीत एक माणूस चक्क छत्री उघडून प्रवास करताना दिसतो आहे. हा माणूस एसी लोकलमध्ये शांतपणे छत्री उघडून प्रवास करतो आहे आणि इतर प्रवासी त्याच्याकडे पाहात आहेत असा हा फोटो आहे. एका रेडइट युजरने हा फोटो पोस्ट केला आहे. मुंबई लोकलमध्ये तुम्हाला रोज नवं काहीतरी बघायला मिळतं, आता हेच बघा ना. असं कॅप्शन देऊन हा फोटो या युजरने पोस्ट केला आहे. ही पोस्ट रेडइट आणि सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
एसी लोकलमध्ये छत्री उघडून प्रवास करणारा हा प्रवासी छत्री वाळवतो आहे की गळणाऱ्या छतापासून स्वतःचा बचाव करतोय? असा प्रश्न एकाने विचारला आहे. तर दुसरा एक युजर म्हणतो मला वाटतं एसी डब्यात असलेल्या प्रकाशापासून तो स्वतःचा बचाव करतो आहे. त्याला बहुदा नीट जागा मिळालेली नाही. त्यामुळे तो लक्ष वेधून घेण्यासाठी हे सगळं करतोय बाकी काही नाही असं आणखी एका युजरने म्हटलंय. तर मला नीट उभं राहता येत नाही ना मग इतरांनाही त्रास झाला पाहिजे म्हणून या माणसाने छत्री उघडली आहे असंही काही लोक म्हणत आहेत. मात्र हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. मुंबई लोकलमधली एखादी घटना अशा प्रकारे व्हायरल होण्याची ही काही पहिली घटना नाही. मागच्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात एक माणूस फोल्डेबल खुर्ची घेऊन मुंबई लोकलमध्ये बसला होता.
ऐन गर्दीत ही घटना घडली होती त्यामुळे त्या घटनेचे फोटोही व्हायरल झाले होते. गर्दीच्या वेळी मुंबई लोकलमध्ये शिरायला मिळणं कठीण असतं. कारण गर्दीच्या वेळी मुंगीलाही आत जाता येणार नाही इतकी दाटीवाटी असते.अशा वातावरणात लोक प्रवास करतात. अशा गर्दीत एक माणूस खुर्ची टाकून डब्यात बसला तर त्याची चर्चा रंगणारच तशी ती रंगली होती.