खड्ड्यांत हरवला मार्ग; प्रशासनाचे दुर्लक्ष
देवळाली कॅम्प : प्रतिनिधी
सिन्नर, इगतपुरी आणि नाशिक तालुक्यांना जोडणारा महत्त्वाचा भगूर-पांढुर्ली रस्ता सध्या अत्यंत दयनीय अवस्थेत असून, अक्षरशः खड्ड्यांनी भरला आहे. “रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता?” अशी परिस्थिती निर्माण झाली असून, वाहनचालक व नागरिकांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत.
या मार्गावरून दररोज सिन्नर एमआयडीसीकडे जाणारी कामगारांची मोठी वर्दळ असते. तसेच शेतकरी आपल्या शेतमालाच्या वाहतुकीसाठी आणि विद्यार्थी शाळा-कॉलेजला ये-जा करण्यासाठी या रस्त्याचा वापर करतात. पावसाळा संपून हिवाळाही संपत आला तरीही रस्त्याची स्थिती ‘जैसे थे’च आहे.
विशेष म्हणजे, सिन्नर तालुक्यातील विद्यमान खासदार राजाभाऊ वाजे यांचा हा मतदारसंघ असून, आमदार माणिकराव कोकाटे यांचाही हा तालुका आहे. या दोन्ही मान्यवरांचे या मार्गाने वारंवार येणे-जाणे होत असतानाही रस्त्याच्या दुरुस्तीकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याची भावना स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत. सन 2027 मध्ये नाशिक येथे होऊ घातलेल्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर जर या रस्त्याची अशीच अवस्था राहिली तर वाहतूक कोंडी व अपघातांचे प्रमाण वाढण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. स्थानिक पातळीवर प्रश्न सुटत नसेल तर खासदारांनी हा मुद्दा संसदेत उपस्थित करून निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने पाहणी करून कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, अशी मागणी जोर धरत आहे.