12 लाख 45 हजारांचा मुद्देमाल हस्तगत
सिडका : विशेष प्रतिनिधी
प्रतिबंधित पानमसाला व सुगंधित तंबाखू (गुटखा) विक्रीसाठी बेकायदेशीररीत्या वाहतूक करणार्या इसमाला गुन्हे शाखा युनिट क्र. 1च्या पथकाने अटक केली असून, त्याच्याकडून 12 लाख 45 हजार 644 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपआयुक्त (गुन्हे) प्रशांत बच्छाव, सहायक आयुक्त (गुन्हे) संदीप मिटके यांनी अशा अवैध वाहतुकीवर कारवाई करण्याचे
निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट 1चे पोलीस अंमलदार पोअं मुक्तार शेख यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत महिंद्रा कंपनीचा बोलेरो पिकअप (क्रमांक 15-2751)मधून गुटखा नाशिककडे आणला जात आसल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि चेतन श्रीवंत, पोहवा रमेश कोळी, पोअं मुक्तार शेख, राहुल पालखेडे, राम बर्डे, जगेश्वर बोरसे, नितीन जगताप व चालक समाधान पवार यांच्या पथकाने पेठरोडवरील तवली फाटा येथे सापळा रचून सदर वाहन थांबवले.
वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये गुटख्याचे मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित पानमसाला व सुगंधित तंबाखूचे साहित्य सापडले. वाहन चालवणार्या इसमाने आपले नाव वैभव सुनील क्षीरसागर (वय 25, रा. उमराळे बुद्रक, ता. दिंडोरी, जि. नाशिक) असे सांगितले. त्याने सदर गुटखा गुजरात राज्यातील सुतारपाडा येथून नाशिककडे विक्रीसाठी नेत असल्याचे सांगितले.
पोलिसांनी त्याच्याकडून अंदाजे 5 लाख 45 हजार 644 रुपये किमतीचा गुटखा आणि 7 लाख रुपये किमतीचा बोलेरो पिकअप असा एकूण 12 लाख 45 हजार 644 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोहवा रमेश कोळी यांच्या फिर्यादीवरून म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, सपोनि हिरामण भोये, पोउपनि चेतन श्रीवंत, पोहवा रमेश कोळी, रोहिदास लिलके, योगीराज गायकवाड, धनंजय शिंदे, देवीदास ठाकरे, मुक्तार शेख, राहुल पालखेडे, राम बर्डे, जगेश्वर बोरसे, नितीन जगताप, महिला पोहवा शर्मिला कोकणी, अनुजा येलवे आणि चालक समाधान पवार, सुकाम पवार यांनी संयुक्तपणे केली.