नाशिक महापालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक दहामध्ये भारतीय जनता पार्टीच्या तीन आणि शिंदे सेनेच्या एका उमेदवाराने विजय मिळविला. भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या या प्रभागात पक्षाबरोबरच वैयक्तिक संबध आणि उमेदवारांचा असलेला प्रभावदेखील कामी आला. त्यामुळेच भाजपाला येथे यश मिळवितानाच शिवसेनेनेही एका जागेवर विजय मिळवत आपली ताकद दाखवून देण्याची किमया केली.
सावरकरनगर, विश्वासनगर, पिंपळगाव बहुला, जाधव संकुल असा सातपूर कॉलनीपासून, तर थेट पिंपळगाव बहुलापर्यंतची व्याप्ती असलेल्या या प्रभागात तिरंगी लढत झाली. त्यातही महिला गटात चारच उमेदवार रिंगणात होते. त्यामुळे सरळ लढतीमुळे मतांची फारशी विभागणी झाली नाही. मागील वेळेस येथे भारतीय जनता पार्टीचेच उमेदवार विजयी झाले होते. मात्र, कालौघात काहींनी पक्ष बदल केल्यामुळे यावेळी काय होते याबद्दल मोठी उत्सुकता होती. अ गटातून विश्वास नागरे, अरुण घुगे, पोपटराव जेजुरकर, प्रवीण नागरे, शशिकांत जाधव, देवा जाधव असे उमेदवार रिंगणात होते. त्यातही विश्वास नागरे नवखे उमेदवार होते. अरुण घुगे त्यातल्या त्यात या भागातील ओळखीचा चेहरा. माजी नगरसेवक शशिकांत जाधव यांनी या भागाचे नेतृत्व केलेले. परंतु असे असतानाही मतदारांनी विश्वास नागरे यांच्यावरच विश्वास दाखविला. कारण पिंपळगाव बहुला गावाने त्यांना गावचा उमेदवार म्हणून साथ दिली. शशिकांत जाधव यांचा गेल्या काही वर्षांत जनसंपर्क कमी झाला होता. प्रभागात विकासकामांच्या बाबतीतही आनंदीआनंदच होता. त्यामुळे पक्षानेही त्यांना उमेदवारी नाकारण्यामागे ते एक कारण होते. मागील वेळेस त्यांच्याच पॅनलमधून निवडून आलेल्या पल्लवी पाटील यांनी निवडणुकीच्या अगोदर शिवसेना शिंदे गटाची वाट धरली. शिंदे गटाने त्यांना माधुरी बोलकर या भाजपाच्या माजी नगरसेविकेविरुद्ध उमेदवारी दिली. पाटील यांनी चांगली लढत दिली. तथापि, बोलकर यांचा प्रभागातील असलेला संपर्क आणि पैठण्यांचे, हळदी-कुंकवाचे कार्यक्रम त्यांना फलदायी ठरले. समाधान देवरे यांना या प्रभागात सर्वाधिक मते मिळाली. यामागे त्यांचा दांडगा जनसंपर्क व नगरसेवक नसतानाही त्यांनी जनतेची केलेली सेवा याचे फळ त्यांना मिळाले. इतर उमेदवार दहा ते अकरा हजार मते मिळवत असताना देवरेंना बारा हजारांहून अधिक मते मिळाली. हे त्यांच्या वैयक्तिक जनसंपर्कामुळेच शक्य झाले. त्यांच्या विरोधात असलेले नंदकुमार जाधव यांचा प्रभागाशी फारसा संपर्कच नव्हता. त्याचा फटकाही त्यांना बसला.
शिवसेना उबाठामध्ये असलेले समाधान देवरे निवडणुकीच्या अगोदर भाजपमध्ये आले आणि गेल्या आठ वर्षांत त्यांनी या भागात जे प्रभावी काम केले त्यामुळे जनतेने त्यांना निवडून दिले. यात पक्षाबरोबरच त्यांचा जनसंपर्क कामी आला. भाजपाच्या या बालेकिल्ल्यात इंदूबाई नागरे यांनीही विजय संपादन केला. त्यांनाही या भागातील जनसंपर्क आणि जनतेची केलेली कामे विजयापर्यंत घेऊन गेली. निवडणुका आल्या की, सक्रिय होणार्यांना मतदारांनीच नाकारले. या भागात उबाठाच्या वृषाली सोनवणे यांनी तिसर्यांदा निवडणूक लढवली. मागील वेळेस अल्प मतांनी पराभूत झालेल्या सोनवणे यांना उबाठाने यावेळीही उमेदवारी दिली. पण या भागात मुळातच उबाठाची काही संघटनात्मक बांधणी नव्हती. खा. राजाभाऊ वाजे वगळता अन्य कुणी फारसे लक्षही घातले नाही. शिवाय कार्यकर्त्यांचा अभाव, पॅनलमध्ये जी एकवाक्यता लागते ती दिसून आली नाही. त्यामुळे महाविकास आघाडीच्या पॅनलला येथे फारसा फायदा होऊ शकला नाही. महिलांच्या ब गटात इंदूबाई नागरे, सलीममामा शेख यांच्या पत्नी फरिदा शेख, कलावती सांगळे अशी तिरंगी लढत झाली. भाजपाच्या पॅनलमध्ये असल्याने सांगळे यांनी लढत दिली. मात्र, इंदूबाई नागरे यांचा या भागात मोठा प्रभाव आहे. विक्रम नागरे यांचे सूक्ष्म नियोजन, कार्यकर्त्यांचे पाठबळ यामुळे भाजपाचे तीन उमेदवार विजयी होत असताना त्यांनी एक जागा राखत भाजपाला शह दिला. या प्रभागात मतदारांशी उमेदवारांचा असलेल्या वैयक्तिक संबंधांचाच जास्त फायदा झाल्याने भाजपाबरोबरच शिंदेसेनेनेही येथे बाजी मारली.
अ गट
विश्वास नागरे
मते (10,475)
अरुण घुगे
(6,759)
ब गट
इंदूबाई नागरे
(9,769)
कलावती सांगळे
(9,303)
क गट
माधुरी बोलकर
(10,775)
पल्लवी पाटील
(7,179)
ड गट
समाधान देवरे (12,820)
नंदकुमार जाधव
(5,837)
Personal public relations also proved effective in BJP’s stronghold