पेठरोड रस्त्याच्या दुरुस्तीसाठी  रास्ता रोको

पेठरोड रस्त्याच्या दुरुस्तीसाठी  रास्ता रोको
पंचवटी : सुनील बुनगे
शहरातून गुजरात राज्याकडे जाणाऱ्या पेठरोड रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून वाहन चालवतांना अतिशय कसरत करावी लागत आहे . तर रस्त्यावरून उडणाऱ्या धुळीमुळे नागरिकांच्या आरोग्याचा देखील प्रश्न उपस्थित होत असून प्रशासनाकडून नागरिकांना रस्त्याच्या कामासाठी प्रतिसाद मिळत नसल्याने सोमवार( दि .२१ ) रोजी पेठरोड वासियांनी आक्रोश करत पेठरोड वरील मेघराज बेकरी समोर रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान पोलिसांनी रास्ता रोको न करण्याचे आवाहन केल्याने पोलीस व नागरिकांमध्ये बाचाबाची झाली .
शहरातील गुजरात राज्याकडे जाणारा पेठरोड हा मुख्य रस्ता असून हनुमान चौक राऊ हॉटेल ते महानगर पालिका हद्दीपर्यंतच्या रस्त्याची भयानक दुरावस्था झाली आहे. या जवळपास अडीच ते तीन किलोमीटर रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात अवजड वाहने तसेच इतर वाहनांचा मोठा राबता असल्याने रस्त्यावरील धुळीने रस्त्यालगत राहणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न देखील उपस्थित झाला आहे . रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनांचे नुकसान तर होतेच परंतु मणक्याचे आजार देखील उद्भवू लागले आहेत . वाहनांच्या अपघातात देखील वाढ झाली असून दिवस भरात किरकोळ स्वरूपाचे अपघात होत असतात . याबाबत पेठरोड परिसरातील नागरिकांनी नाशिक महानगरपालिका आयुक्त तसेच संबधित प्रशासनाशी वेळोवेळी निवेदन , पत्रव्यवहार करूनही प्रशासना कडून नागरिकांच्या निवेदनाला केराची टोपली दाखविण्यात आल्याने परिसरातील नागरिकांना तीव्र संताप झाल्याने अखेर आंदोलनाचे हत्यार उपसावे
लागले .दरम्यान दहा दिवसांपूर्वीच परिसरातील नागरिकांनी मनपा प्रशासनाला निवेदन दिल्यानंतर मनपाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी पोलिसांशी पत्रव्यवहार करत मनपाकडे रस्ता कॉंक्रिटीकरण किंवा डांबरीकरण करण्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध नसून स्मार्ट सिटी मार्फत रस्ता करण्याची मागणी केल्याचे सांगितले .
सकाळी दहा वाजेच्या सुमारास परिसरातील वैद्यकीय व्यवसायिक तसेच नागरिक व महिला मेघराज बेकरी समोर जमा झाले . तेव्हा त्याठिकाणी पेठरोड वासियांनी नाशिक महानगरपालिकेच्या विरोधात तसेच लोकप्रतिनिधींच्या विरोधात घोषणाबाजी करत रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला.तसेच जोपर्यंत नाशिक महानगरपालिकेचे अधिकारी येत नाही तोपर्यंत रास्ता रोको करण्यात येईल असे सांगितल्यावर पोलिसांनी त्याला विरोध केला . पण नागरिक अगोदरच रस्त्याच्या दुरावस्थेने व धुळीमुळे हैराण झालेले असताना मात्र ते देखील पोलिसांचे ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते . म्हसरूळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक साखरे यांनी नागरिकांना समजवण्याचा प्रयत्न केला . तर मी स्वतः तुमची व मनपा प्रशासनाची चर्चा घडवून देतो असे सांगितल्यावरही काही राजकीय व्यक्तींनी विरोध केल्यावर त्यांना पोलिसांनी पोलीस गाडीत बसवण्याचा प्रयत्न केला. अखेर जर मनपाच्या अधिकाऱ्यांनी जर दोन दिवसात याबाबतीत लक्ष न घातल्यास पुन्हा कोणालाही न सांगता परिसरातील नागरिक तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडतील असा इशारा दिला . आंदोलनात परिसरातील नागरिक प्रभाकर पिंगळे , सोमनाथ पिंगळे , दिलीप पिंगळे , राजेंद्र ठाकरे , महेश शेळके , सुनील निरगुडे , प्रतीक पिंगळे , विजय पिंगळे , योगेश कापसे , पंचवटी मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.सचिन देवरे , डॉ.सचिन भांबेरे, डॉ. हेमंत साबळे , डॉ.मनीष देवरे , सचिन पवार , दर्शन बोरसे , विलास आवारे आदींसह पेठरोड वरील मेघराज बेकरी समोरील वेदनगरी , इंद्रप्रस्थ नगर आदी भागातील महिला व नागरिक उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *