नाशिकरोड कारागृहात कैद्यांच्या गांजा पार्टीचे फोटो व्हायरल

कारागृहातील प्रामाणिक अधिकार्‍यांना बदनाम करण्याचा प्रयत्न : अरुणा मुकुटराव

नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी
नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात कैदी गांजा घेतानाचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले असून, कैद्यांचे रील्सही उघड झाल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, हे फोटो जुने असून, याचा कारागृहातील आहेत का, हे तपासले जात आहे. कारागृहातील प्रामाणिक अधिकार्‍यांना बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे. तरीही या प्रकरणी चौकशी करणार असल्याची माहिती कारागृह अधीक्षक अरुणा मुकुटराव यांनी दिली.

कारागृहात मोबाइल ठेवण्यास कैद्यांना प्रतिबंध असतानाही नाशिकरोड कारागृहात कैद्यांकडे मोबाइल मिळाल्याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात या आधी अनेकदा गुन्हे दाखल झाले आहेत. चारही बाजूने कडेकोट बंदोबस्त असताना मोबाइल आणि अमली पदार्थ जेलमध्ये गेलेच कसे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
नाशिकरोड कारागृहात राज्यातील कुख्यात गुन्हेगार तसेच बॉम्बस्फोटातील दहशतवादी शिक्षा भोगत आहेत. परदेशी कैदीही आहेत. मुंबई आणि पुण्यामधील अनेक सराईत गुन्हेगारांच्या टोळ्यांचे सदस्य येथे आहेत. या टोळ्या राजकीय प्रभावाचा वापर करून व्हीआयपी ट्रीटमेंट मिळवण्याचा प्रयत्न करतात. कारागृह प्रशासनाशी त्यांचे आर्थिक हितसंबंध असल्याचा आरोप होतो. गुन्हेगारांना वेगळे जेवण देणे, प्रकृती खालावल्याच्या नावाखाली जिल्हा रुग्णालयात दाखल करणे, कैद्यांना मोबाइल, अमली पदार्थ, चैनीच्या वस्तू पुरवणे आदी सुविधा दिल्या जातात, असा आरोप होत आहे. अनेकदा गुन्हेगार कारागृहातून आपल्या टोळ्या चालवत असल्याचे उघड झाले आहे. व्हायरल झालेल्या फोटोमध्ये वरील टोळ्यांचे सराईत गुन्हेगार असल्याची चर्चा असून, हे गुन्हेगार पुण्यातील आणि मकोकासारख्या गंभीर गुन्ह्यातील असल्याचा दावा केला जात आहे. या गुन्हेगारांनी कारागृहातील खुल्या जागी आणि बराकीत फोटो, रील्स काढले आहेत. हे फोटो व्हायरल करण्यात आले आहेत. कारागृह प्रशासनाने या सराईत गुन्हेगारांना प्रतिबंध केल्यास ते असे व्हिडिओ काढून बदनाम करण्याचा प्रयत्न करतात, असा प्रशासनाचा दावा आहे. नाशिकरोड मध्यवर्ती कारागृह अनेक कारणांनी चर्चेचा विषय ठरत आहे. कैद्यांच्या हाणामार्‍या, कारागृह कर्मचार्‍यांवर हल्ला, प्रशासनाविरुद्ध उपोषण, कारागृहात मोबाइलचा वापर, अमली पदार्थांचा कारागृहात प्रवेश यामुळे हे कारागृह चर्चेचा विषय ठरले आहे.

प्रशासनाचा खुलासा

कारागृह अधीक्षक अरुणा मुकुटराव म्हणाल्या की, गेल्या काही वर्षांपासून कैद्यांसाठी गळाभेटीसारखे अनेक स्तुत्य उपक्रम राबवले जात आहेत. कारागृह प्रशासन पारदर्शी झाले आहे. हे पाहवले जात नसल्याने काही आत्मसंतुष्टांनी हे जुने फोटो व व्हिडिओ मुद्दाम व्हायरल केले आहेत. काही कैदी सुटीवरून कारागृहात येताना ड्रग्ज, तंबाखू प्लास्टिकची पुंगळी करून ती आपल्या खासगी भागात लपवून आणतात. मातीची चिलीम बनवतात व नजर चुकवून तंबाखूचे सेवन करतात. व्हायरल झालेले फोटो, व्हिडिओ जुने असून, ते या कारागृहातीलच आहेत का, याची खात्री केली जात आहे. त्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. तरीही या प्रकरणी सखोल चौकशी केली जाईल.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *