येवला : प्रतिनिधी
येवला शहर स्वच्छ व सुंदर करण्याच्या दृष्टीने प्लास्टिक बंदीचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. शहरातील स्वच्छता व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला. विशेषतः येवला नगरपालिका घंटागाडी कर्मचारी यांच्या कामकाजाबाबत तसेच घराघरांतून कचरा संकलन आणि कचरा विलगीकरण प्रभावीपणे कसे राबवायचे यावर सविस्तर चर्चा बैठकीत करण्यात आली.
नागरिकांनी ओला व सुका कचरा वेगळा देण्याचे आवाहन करण्याबरोबरच स्वच्छतेबाबत जनजागृती वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला.
मंत्री छगन भुजबळ यांच्या सूचनेनुसार येवला येथील संपर्क कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे, नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, पालिकेच्या स्वच्छता निरीक्षक पूनम भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर स्वच्छतेसंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक झाली.
शहरातील वाढते प्लॉस्टिक प्रदूषण लक्षात घेता येवला शहरात प्लास्टिकबंदी प्रभावीपणे राबवण्याचा निर्धार बैठकीत घेण्यात आला. प्लास्टिक वापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी दुकानदार व नागरिकांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. नियमांचे उल्लंघन करणार्यांवर कारवाई करण्याबाबत चर्चा केली. बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे, मुख्याधिकारी तुषार आहेर, नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, छगन भुजबळ यांचे स्वीय सहाय्यक बाळासाहेब लोखंडे, उपनगराध्यक्ष पुष्पा गायकवाड, स्वच्छता सभापती पारूळ गुजराती, नगरसेवक प्रवीण बनकर, शंकर मांजरे, नगरसेविका लक्ष्मीबाई गुड्डू जावळे, प्रल्हाद जावळे, गणेश गायकवाड, नगरसेवक निसार शेख, सुनील पैठणकर, भाऊसाहेब धनवटे, माजी नगरसेवक दत्ता निकम, स्वच्छता निरीक्षक पुनम भामरे, तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
Plastic ban decided in Yeola; Municipality in action mode