आरोग्यास धोका; परिसर स्वच्छ करण्याची मनसेची मागणी
दिंडोरी : प्रतिनिधी
दिंडोरी तालुक्यातील वणी- दिंडोरी रस्त्यालगत असलेल्या लखमापूर फाटा येथील कंपनीसमोर प्लास्टिक कचरा टाकण्यात आला आहे. नाशिक-पेठ या राष्ट्रीय महामार्गामधील जांबुटके फाटा याठिकाणी असाच प्रकार घडला आहे. याबाबत येथील परिसर हा स्वच्छ करण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष मनोज ठिकले, तालुकाप्रमुख नामदेव गावित, तालुका उपाध्यक्ष रोशन तिवटे यांनी केली आहे. याबाबतचे लेखी निवेदन दिंडोरीचे तहसीलदार मुकेश कांबळे यांना देण्यात आले आहे,
निवेदनात म्हटले की, शासन स्तरावर प्लास्टिकबंदीविरोधात अनेक कठोर भूमिका संबंधित विभागामार्फत घेतल्या जातात. मात्र, त्यास फाटा देत दिंडोरी तालुक्यातील जांबुटके फाटा येथे व वणी- दिंडोरी रस्त्यावरील लखमापूर फाटा येथील सनरशिया कंपनीसमोर मोठ्या प्रमाणात प्लास्टिक टाकले जात आहे. यामुळे प्रदूषण होऊन परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याठिकाणी अज्ञात व्यावसायिक तसेच या रस्त्यातून ये-जा करणारे काही जण चिकन, मांस, हॉटेलचे खाद्यपदार्थ या ठिकाणी आणून टाकत असल्याचे दिसते. याबाबत संबंधित विभागाने लक्ष देऊन कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे.
शासनामार्फत वेळोवेळी प्लास्टिक बंदीविरोधात संबंधित विभागामार्फत उपाययोजना केल्या जातात. तसेच त्याबाबत आक्रमक भूमिकासुद्धा घेतली जाते. मात्र, त्याकडेे लक्ष न देता संबंधितांकडून कानाडोळा केला जात आहे.