नाशिक

कोट्यवधी रुपयांच्या आदिवासी जमिनीवर बनावट कागदपत्रांचा डाव उघड

खोट्या सहीवर लेआउट मंजुरी घेणार्‍या संशयित आरोपीवर इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

इगतपुरी : प्रतिनिधी
इगतपुरी नगरपरिषद हद्दीतील तळेगाव शिवारातील आदिवासी शेतकर्‍याची कोट्यवधी रुपयांची जमीन बनावट कागदपत्रे व खोट्या सहीच्या आधारे बळकावण्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला. याबाबत तब्बल 23 वर्षांनंतर याप्रकरणी इगतपुरी पोलीस ठाण्यात संबंधित आरोपीवर 420 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एल्गार कष्टकरी संघटनेच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर हा गुन्हा दाखल झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
संघटनेने आणखी दोन मोठे गुन्हे दाखल होण्याचा दावा केला आहे. या प्रकरणात मोठा घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रमोद सदाशिव सोनवणे (वय 67, रा. ठाणे) यांनी दिलेल्या तक्रारीवरून मानस हॉटेलचे माजी संचालक संजय मनोहर करंबळेकर व इतरांविरुद्ध 24 फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना 24 जून 2003 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत घडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. तक्रारीनुसार, गट क्रमांक 271 व 272 या जमिनी बिगरआदिवासी शेतकरी संजय करंबळेकर यांच्या मालकीच्या असून, शेजारील गट क्रमांक 273 ही जमीन आदिवासी शेतकरी प्रमोद सोनवणे यांच्या नावावर आहे.लेआउट मंजुरीसाठी तिन्ही गटांचा एकत्रित अभिन्यास तयार करून नगररचना विभागाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला.
या प्रस्तावात गट क्रमांक 273 मधून 12 मीटर रुंदीचा रस्ता दाखविण्यात आला होता. मात्र, संबंधित आदिवासी शेतकर्‍याची कोणतीही अधिकृत संमती घेतलेली नव्हती. आरोपींनी खोटे दस्तऐवज तयार करून बेकायदेशीररीत्या गट क्रमांक 273 मधील सुमारे 42 गुंठे जागा दर्शवून ती लेआउटसाठी वापरल्याचे दाखवले. तसेच त्याआधारे गट क्रमांक 271 व 272 साठी मंजुरी मिळवताना नगरपरिषदेतील व नगररचना विभागातील संबंधित अधिकार्‍यांची दिशाभूल करण्यात आल्याचा आरोप आहे. 2003 मध्ये लेआउट मंजूर झाल्यानंतरही मंजुरीतील अटींचे पालन करण्यात आले नाही. प्रत्यक्ष जागेवर रस्ते, ओपन स्पेस, गटार, लाइट व्यवस्था किंवा प्लॉटची चिन्हे दर्शविण्यात आलेली नाहीत. अंतिम लेआउट मंजुरीच्या अटींची पूर्तता न झाल्याने मंजुरी आदेशाचा सरळ भंग झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
या प्रकरणात इगतपुरी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असून, पोलीस अधिकार्‍यांनी प्राथमिक चौकशीला सुरुवात केली आहे. तपासात आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. संघटनेनेही ‘हे फक्त ट्रेलर आहे. अजून दोन मोठे गुन्हे दाखल होणार आहेत,’ असा इशारा दिल्याने या प्रकरणाकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
आदिवासी जमिनींबाबत झालेल्या कथित गैरप्रकारामुळे प्रशासन व महसूल यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पोलीस तपासातून सत्य बाहेर येणार असून, दोषींवर काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक सारिका अहिरराव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल गायधनी यांच्यासह पोलीसपथक करत आहे.

फसवणूक करणार्‍या संबंधित आरोपींवर कठोर कलमे लावून त्यांना तत्काळ अटक करावी, तसेच संपूर्ण व्यवहार रद्द करून जमीन मूळ मालकाला परत द्यावी, अन्यथा एल्गार कष्टकरी संघटनेच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल. – भगवान मधे, अध्यक्ष, एल्गार कष्टकरी संघटना

Plot of fake documents on tribal land worth crores of rupees exposed

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

विंचूरसह परिसरातील वाढती गुन्हेगारी चिंताजनक

अवैध व्यवसायांसह खून, लहान-मोठ्या चोर्‍यांची मालिका सुरूच विंचूर : संदीप शिरसाठ विंचूर ऐतिहासिक परंपरा लाभलेले…

6 hours ago

गोंदेश्वर मंदिराच्या दानकर्त्याचे शिल्प प्रकाशझोतात

प्रा. जावेद शेख यांचा संशोधनातून महत्त्वपूर्ण शोध सिन्नर : वार्ताहर ऐतिहासिक व स्थापत्यवैभवासाठी ओळखल्या जाणार्‍या…

7 hours ago

दारू दुकान हटविण्यासाठी महिलांचा रास्ता रोको

अपघाती मृत्यूनंतर चांदवडमध्ये जनक्षोभ चांदवड : वार्ताहर येथील गणूर रोडवरील फुलेनगर भागात मंगळवारी (दि. 24)…

7 hours ago

मनमाडमध्ये स्वच्छतेचा केवळ देखावा; राष्ट्रवादीची टीका

मनमाड : अमिन शेख मनमाड नगरपालिकेचे नगराध्यक्ष योगेश पाटील यांच्याकडून सध्या शहरात राबविली जाणारी स्वच्छता…

7 hours ago

मनपा हद्दीत 16 ग्रामपंचायतींच्या कचर्‍याचा बोजा?

व्यवस्था कोलमडणार; महासभेवर लवकरच प्रस्ताव? नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेला आपल्याच कचर्‍याचे वर्गीकरण करण्यात अपयश…

7 hours ago

लक्ष्मी वेंकटेश मंदिर सायखेडा येथे ब्रह्मोत्सवात रंग-भक्तीचा संगम

पालखी सोहळ्याने सायखेडा भक्तिमय नाशिक : प्रतिनिधी सायखेडा येथे बालाजी भगवान संस्था यांच्या प्राचीन परंपरेनुसार…

7 hours ago