नोव्हेंबर 2025 मध्ये झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर राष्ट्रीय जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबात वादळ उठले. लालू यांची कन्या रोहिणी आचार्य यांनी कौटुंबिक कलहातून घर सोडले. त्यानंतर लालूंच्या तीन मुलीही घराबाहेर पडल्या. लालू प्रसाद यांना हा मोठा धक्का होता. लालूंनंतर आणखी एका राजकीय पक्षाच्या प्रमुखाला त्यांच्या लेकीने धक्का देत पक्ष सोडला. तेलंगणातील भारत राष्ट्र समितीचे प्रमुख कल्वाकुंटला चंद्रशेखर राव (केसीआर) यांना त्यांची मुलगी के. कविता यांनी जोरदार धक्का देत पक्ष सोडला. केसीआर यांच्या कन्या आणि विधान परिषदेच्या सदस्या के. कविता यांनी पक्षाविरोधात बंडाचे निशाण फडकवले. ‘पक्षात माझा वारंवार अपमान करण्यात आला. आता पुरे झाले,’ अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त करत त्यांनी ‘तेलंगणा जागृती’ या आपल्या सांस्कृतिक संघटनेचे रूपांतर एका नव्या राजकीय पक्षात करण्याची घोषणा 5 जानेवारी 2026 रोजी केली. लालू प्रसाद यादव यांची कन्या रोहिणी आचार्य यांच्या पावलावर पाऊल ठेवून कुटुंबात अपमान झाल्याचा आरोप कविता राव यांनी केला. पक्षात अपमान होत असल्याची जाहीर तक्रार त्यांनी आधीच केली होती. त्यांना पक्षातून निलंबितही करण्यात आले होते. राष्ट्रीय जनता दल हा पक्ष लालू प्रसाद यादव हे एकहाती चालवतात. त्यांनी पक्षाची सूत्रे त्यांचे पुत्र तेजस्वी यादव यांच्याकडे दिली. बिहार विधानसभा निवडणुकीच्या आधी त्यांचे दुसरे पुत्र तेजप्रताप यांनी जनशक्ती जनता दल नावाने स्वतंत्र पक्ष स्थापन केला होता. त्याआधी त्यांची राष्ट्रीय जनता दलातून हकालपट्टी करण्यात आली होती. विधानसभा निवडणुकीनंतर तेजप्रताप यादव यांनी संयुक्त जनता दलाचे नेते मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारला पाठिंबा देण्याची भूमिका घेतली असली, तरी त्यांच्या पक्षाचा एकही आमदार नाही. रोहिणी आचार्य यांना पक्षात आणून त्यांना जबाबदारी देण्याचा तेजप्रताप यांचा प्रयत्न आहे. लालू प्रसाद यादव यांनी राष्ट्रीय जनता दल पक्ष एखाद्या संस्थानासारखा चालवला. पक्ष आणि राजकारणामुळे त्यांचे घर फुटल्याची देशभर चर्चा झाली. पक्ष व राजकारणामुळे केसीआर यांचेही घर फुटले आहे. तेलंगणातील भारत राष्ट्र समिती पक्षाचे संस्थापक व माजी मुख्यमंत्री केसीआर यांनीही संस्थानासारखा पक्ष चालवताना कुटुंबाकडे लक्ष दिले नाही. परिणामी त्यांच्या मुलीला पक्षातून बाहेर पडावे लागले. त्यांनीही नवीन पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली आहे. ‘तेलंगणा जागृती’ या आपल्या सांस्कृतिक संघटनेचे रूपांतर एका नव्या राजकीय पक्षात करण्याची घोषणाही त्यांनी केली. तेलंगणा विधान परिषदेत आपले शेवटचे भाषण करताना के. कविता कमालीच्या भावुक झाल्या. पक्षातून निलंबन झाल्यानंतर त्यांनी सप्टेंबर महिन्यातच विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. सोमवारी (5 जानेवारी 2026) सदन सुरू झाल्यानंतर त्यांनी आपला राजीनामा स्वीकारण्याची विनंती केली. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, “मी आज या सभागृहातून एक सामान्य नागरिक म्हणून बाहेर पडत आहे, पण लवकरच एक मोठी राजकीय शक्ती म्हणून पुन्हा विधानसभा गाठेन.” तेलंगणा आंदोलनाच्या काळात सांस्कृतिक चळवळ म्हणून उभा राहिलेला ‘तेलंगणा जागृती’ हा प्लॅटफॉर्म आता निवडणूक रिंगणात उतरणार आहे. ‘राज्यात एका नव्या राजकीय पर्यायाची गरज आहे. आमचा पक्ष विद्यार्थी, बेरोजगार तरुण आणि समाजातील सर्व वंचितांच्या हक्कासाठी लढेल,’ असे विधान कविता यांनी केले. आगामी निवडणुकांमध्ये हा पक्ष पूर्ण ताकदीनिशी उतरणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले. कविता यांनी आपल्याच वडिलांच्या (केसीआर) जवळच्या लोकांवर गंभीर आरोप केले आहेत. माझ्या वडिलांच्या अवतीभवती असलेल्या काही लोकांनी माझ्याविरुद्ध जाणीवपूर्वक कट रचला. मला राजकीयदृष्ट्या संपवण्याचा प्रयत्न झाला आणि अखेर मला पक्षाबाहेर काढण्यात आले. हा माझ्या आत्मसन्मानाचा प्रश्न आहे, असे त्या म्हणाल्या. रोहिणी आचार्य यांनी अशाच प्रकारचे आरोप लालू यादव यांच्यावर केले होते. केसीआर यांच्या कुटुंबात मालमत्तेचा वाद असल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. त्यावर कविता यांनी ही लढाई मालमत्तेसाठी नसून स्वाभिमानासाठी असल्याचे सांगितले. सन 2014 मध्ये तेलंगणा राज्याची निर्मिती झाल्यापासूनच आपल्यावर आणि आपल्या वैयक्तिक स्वातंत्र्यावर निर्बंध लादले गेल्याचा आरोपही त्यांनी केला. स्वतंत्र तेलंगणा राज्यनिर्मितीसाठी केसीआर यांनी तेलंगणा राष्ट्र समितीची स्थापना केली होती. केसीआर केंदात काँग्रेसशी हातमिळवणी केल्याने तेलंगणा राज्य स्थापन केले. नंतर केंद्रात त्यांची भाजपाशी जवळीक वाढली होती. तेलंगणा राष्ट्र समितीच्या प्रादेशिक राजकारणातून बाहेर पडून त्यांना राष्ट्रीय राजकारणात सक्रिय होण्याचे वेध लागले होते. त्यासाठी त्यांनी पक्षाचे नाव भारत राष्ट्र समिती ठेवले. महाराष्ट्रातही या पक्षाचा प्रभाव वाढविण्याची मोहीम त्यांनी हाती घेतली होती. परंतु तेलंगणा विधानसभा निवडणुकीत या पक्षाला काँगेसने खाली खेचले तेव्हाच केसीआर यांच्या पक्षाची वाताहत होण्यास सुरुवात झाली. कविता यांनी आक्रमक भूमिका घेतल्याचा फायदा उठविण्यासाठी काँग्रेस प्रयत्नशील आहे. भारत राष्ट्र समितीचे काँग्रेससमोर मोठे आव्हान आहे. कविता यांनी नवा पक्ष स्थापन केल्यास भारत राष्ट्र समितीच्या आव्हानातील हवा निघून जाईल. या राज्यात एएमआयएमआय पक्षाची चांगली ताकद असून, त्याची युती भारत राष्ट्र समितीशी आहे. अशा परिस्थितीत कमी वाव असलेला भाजपा या राज्यात कविता यांच्याशी हातमिळवणी करण्याची तितकीच शक्यता आहे. दुसरीकडे, कविता यांनी आपल्या पक्षाबाबत राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्याशी चर्चा केली आहे. पक्षातून निलंबित झाल्यापासून त्या ‘तेलंगणा जागृती’च्या माध्यमातून लोकांचे प्रश्न उपस्थित करत आहेत.
Poem after Rohini