इंदिरानगरमध्ये ठिय्या, पोलीस निरीक्षकावर मारहाणीचा आरोप
सिडको विशेष प्रतिनिधी :-इंदिरानगर पोलीस ठाण्यात सोशल मीडियावर वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल प्रकरणी बोलावण्यात आलेल्या महिलेने वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी मारहाण केल्याचा गंभीर आरोप केला आहे. शैला शिरसाठ या महिलेनं पोलीस ठाण्याच्या गेटवर ठिय्या आंदोलन करत संबंधित अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी केली असून, “न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहील,” असा इशाराही दिला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,शैला शिरसाठ यांनी दोन समाजात तेढ निर्माण होईल अशा प्रकारचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले होते. मात्र, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांनी त्यांना कानशिलात लगावल्याचा शिरसाठ यांचा आरोप आहे.
घटनेची माहिती समजताच परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी पोलीस ठाण्यात हजेरी लावत जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. शिरसाठ यांनी दिलेल्या अर्जाच्या आधारे मारहाणीबाबत सखोल चौकशी केली जाईल, असे उपायुक्तांनी स्पष्ट केले.
स्थानिक रहिवाशांनुसार, पांडवनगरी परिसरात एक महिला वारंवार वाद घालत असून बाहेरच्या गुंडांनाही बोलावते. काही दिवसांपूर्वी अशाच एका वादातून धारदार शस्त्राचा वापर करत हल्लाही झाला होता. या पार्श्वभूमीवर संबंधित व्हिडिओ प्रकरण जोडले जात आहे.
शैला शिरसाठ या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्या असल्याने मनसेचे स्थानिक नेते आणि हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने पोलीस ठाण्यासमोर जमले होते. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांचे स्पष्टीकरण:
“सदर महिलेने समाजात तेढ निर्माण होईल असा व्हिडिओ व्हायरल केला होता. चौकशीसाठी तिला बोलावण्यात आले होते आणि कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे
तृप्ती सोनवणे
वरिष्ठ पोलीस निरीक्षक
इंदिरानगर पोलीस स्टेशन