महालक्ष्मीनगर खून प्रकरणातील आरोपींची पोलिसांनी काढली धिंड

सिडको : विशेष प्रतिनिधी
अंबडच्या महालक्ष्मीनगर भागात दोन दिवसांपूर्वी रात्री सुमारे अकरा ते साडेअकरा वाजेच्या सुमारास घडलेल्या खून प्रकरणातील आरोपींना अंबड पोलिसांनी अवघ्या दोन तासांंत गजाआड केले. या पार्श्वभूमीवर सोमवारी (दि. 30) अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांच्या पथकाने आरोपींची खून झालेल्या परिसरातून धिंड काढून नागरिकांमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा संदेश दिला.
या घटनेविषयी मिळालेल्या माहितीनुसार, महालक्ष्मीनगर परिसरात राहणार्‍या 22 वर्षीय युवकाचा काही कारणावरून वाद झाला होता. या वादातूनच आरोपींनी धारदार शस्त्राने वार करत युवकाचा निर्घृण खून केला व घटनास्थळाहून फरार झाले. खून झाल्यानंतर अंबड पोलीस ठाण्याच्या गुन्हेशोध पथकाने तत्परता दाखवत घटनास्थळाजवळील व परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. या तांत्रिक पुराव्यांच्या आधारे व गोपनीय माहितीच्या साहाय्याने पोलिसांनी दोन्ही आरोपींना अवघ्या दोन तासांत शोधून काढले व अटक केली.
या प्रकरणातील पोलिसांच्या जलद कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये दिलासा निर्माण झाला आहे. गुन्हा घडलेल्या भागातून आरोपींची पोलिसांच्या ताब्यात असताना काढलेल्या धिंडमुळे कायदा व सुव्यवस्थेचा धाक निर्माण झाला असून, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना इशारा देण्यात आला आहे. या संपूर्ण कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्यासह अंबड पोलीस ठाण्याची टीम सक्रियपणे सहभागी झाली. नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांकडून असेच कठोर पाऊल उचलले जाईल, असा स्पष्ट संदेश पोलिसांनी दिला आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *