सातपूरला पोलिसाच्या खासगी
वाहनाची धडक; मायलेकासह ३ जखमी
संतप्त जमावाकडून धडक देणाऱ्या कारची तोडफोड
सातपूर: प्रतिनिधी
नाशिकच्या सातपूर भागातील अशोक नगर भाजी मार्केट परिसरात शनिवारी रात्री भीषण अपघात झाला. एका भरधाव कारने रस्त्यावरील नागरिकांना उडवले. या अपघातात तिघेजण जखमी झाले असून, संतप्त नागरिकांनी संबंधित गाडीची तोडफोड केली.
शनिवारी दिनांक २४ जानेवारी रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास महिंद्रा एसयूव्ही (एमएच १५ केके ३१५७) ही गाडी अशोक नगर भाजी मार्केट परिसरातून वेगाने जात होती. यावेळी चालकाचे नियंत्रण सुटल्याने या गाडीने रस्त्यावरील ३ ते ४ लोकांना जोराची धडक दिली. या भीषण धडकेत बाळासाहेब गोसावी आणि त्यांचा मुलासह अन्य एक महिलाही जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. जखमींना तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ही कार सातपूर पोलिस ठाण्यातील आबाजी मुसळे या पोलीस कर्मचाऱ्याची असल्याचे समजते. संबंधित कर्मचारी आपली ड्युटी संपवून घरी जात असताना हा अपघात घडला. या घटनेची माहिती मिळताच सातपूर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी पुढील चौकशी सुरू आहे