बंदी असलेल्या नायलॉन मांजा विक्रीवर पोलिसांची कारवाई

नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी
राज्यभरात बंदी असलेल्या व जीवघेण्या ठरणार्‍या
नायलॉन मांजाची विक्री करणार्‍या इसमावर नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने कारवाई केली. सिन्नर फाटा परिसरातून नायलॉन मांजा विक्रीसाठी आलेल्या व्यक्तीला अटक करून नायलॉन मांजा जप्त करण्यात आला आहे.

नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या गुन्हेशोध पथकातील विशाल कुंवर व समाधान वाजे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, चंद्रेश पाटील हा इसम सिन्नर फाटा येथील सीटी लिंक बस डेपोकडे जाणार्‍या रस्त्यावर नायलॉन मांजाची विक्री करण्यासाठी येणार आहे. गुन्हेशोध पथकाने सिन्नरफाटा परिसरात सापळा रचला. संशयित इसम पोलिसांना पाहून पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना पाठलाग करून त्याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्याने आपले नाव चंद्रेश गोविंद पाटील (वय 37, रा. मराठा कॉलनी, सिन्नर फाटा, नाशिकरोड) असे सांगितले. त्याच्या ताब्यातून पाच हजार रुपये किमतीचा बंदी असलेला नायलॉन मांजा जप्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीस अटक करून न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने आरोपीस एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही कारवाई सहायक पोलीस आयुक्त संगीता निकम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, पोलीस निरीक्षक बडेसाब नाईकवाडे यांच्या सहकार्याने गुन्हेशोध पथकातील सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी, पोलीस हवालदार विजय टेमगर, हवालदार संदीप सानप, पोलीस शिपाई विशाल कुंवर, नाना पानसरे, अजय देशमुख, समाधान वाजे व नितीन भामरे यांनी पार पाडली.

Police take action against sale of banned nylon manja

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *