पक्षांतराने गुंतागुंतीची स्थिती, प्रभागातील लढतींकडे शहराचे लक्ष
लक्ष्यवेध : प्रभाग 16

प्रभागात उभारलेले क्रीडासंकुल.
प्रभाग 16 हा जुने नाशिक व पंचवटी इंदिरानगर, नाशिकरोड या महत्त्वाच्या भागांचा केंद्रबिंदू आहे. प्रभाग 16 मध्ये गांधीनगर एव्हिएशन, भारतीय नौसेना विमानतळ, गांधीनगर मुद्रणालय आहे. प्रभागात उत्तर महाराष्ट्रातील सर्वांत उंच महात्मा फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्ध यांचे स्मारक आहे. उपनगर ते जयभवानीनगरपर्यंत पसरलेल्या विस्तृत आणि दाट लोकवस्तीच्या परिसराचा समावेश असलेला प्रभाग क्रमांक 16 हा येत्या नाशिक महानगरपालिका निवडणुकीतील सर्वांत महत्त्वाचा आणि चुरशीचा प्रभाग ठरणार आहे. मागील निवडणुकीतील बहुपक्षीय विजय, बदलती राजकीय परिस्थिती, नागरिकांच्या नव्या अपेक्षा या सर्वांचा संगम झाल्याने 2025 च्या निवडणुकीचा केंद्रबिंदू म्हणून या प्रभागाची ओळख बनत आहे.
सन 2017 च्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 16 मध्ये काँग्रेसचे राहुल दिवे, काँग्रेसच्या आशा तडवी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुषमा पगारे आणि भाजपचे अनिल ताजनपुरे हे चौघे निवडून आले होते. या प्रभागाची राजकीय विविधता आणि मतदारांचे वेगळेच समीकरण सर्वांसमोर स्पष्ट झाले होते. आगामी निवडणुकीतही अशीच बहुरंगी लढत दिसत असून, यावेळी परिस्थिती पूर्वीपेक्षा अधिक गुंतागुंतीची आहे. या प्रभागातून राहुल दिवे, आशा तडवी, भाजपचे अनिल ताजनपुरे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुषमा पगारे या निवडून आल्या होत्या. प्रभागात काँग्रेसचा वरचष्मा राहिला आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुषमा पगारे यांनी शिंदे सेनेमध्ये प्रवेश केला आहे. भाजपाचे अनिल ताजनपुरे हे इतर मागासवर्ग सर्वसाधारण गटातून निवडून आले होते. मात्र, यंदा इतर मागासवर्ग महिला राखीव झाल्याने ताजनपुरे यांना निवडणूक लढता येणार नाही. त्यामुळे पत्नी पुष्पा ताजनपुरे या निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. पण ताजनपुरे यांची भावजय सुनीता ताजनपुरे यादेखील भाजपाकडून निवडणूक लढविण्याची तयारी करत आहेत. दोघी जावा समोरासमोर निवडणुकीत उभ्या राहण्याचे चिन्ह आहे.
बदलती राजकीय समीकरणे, पक्षांतराची हालचाल यामुळे प्रभाग क्रमांक 16 येत्या महानगरपालिका निवडणुकीत सर्वाधिक चर्चेत राहणार आहे. हा प्रभाग राजकीयदृष्ट्या जितका संवेदनशील आहे तितकाच सामाजिकदृष्ट्या महत्त्वाचा आहे. येथील निवडणूक निकाल संपूर्ण शहराच्या राजकीय दिशेला निर्णायक वळण देऊ शकतो. प्रमुख राजकीय पक्ष स्वतंत्र निवडणुकीच्या मैदानात उतरण्याच्या तयारीत दिसत आहेत. त्यामुळे या प्रभागातील लढतींकडे शहराचे लक्ष लागले आहे. काँग्रेस, भाजप, शिवसेना (शिंदे गट), शिवसेना ठाकरे गट, मनसे, रिपाईं आठवले गट, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी यांचे उमेदवार मैदानात उतरणार आहेत. अनेक इच्छुकांची नावे समोर येत आहेत. यावेळेस मतदार कोणत्या दिशेने कल देतात, हे पाहणे औत्सुकतेचे ठरणार आहे. भाजपला हा प्रभाग आपल्या ताब्यात पाहिजे. मात्र, राहुल दिवे यांची प्रभागातील पकड पाहता सध्यातरी भाजपला सोपे दिसत नाही. दुसरीकडे राहुल दिवे हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात व तांबे परिवाराच्या जवळचे मानले जातात. विधान परिषद निवडणुकीत दिवे यांनी अपक्ष उमेदवारी करणारे आमदार सत्यजित तांबे यांचा उघड प्रचार केला होता. त्यामुळे आगामी मनपा निवडणुकीत राजकारण काय घडते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
विद्यमान नगरसेवक

अनिल ताजनपुरे

राहुल दिवे

आशा तडवी
सुषमा पगारे
विकासकामे
उपनगर मॉडेल रोड, आनंदनगर येथे स्केटिंग ग्राउंड, मातोश्रीनगरला मदर्स पार्क, संजय गांधीनगरला स्केटिंग जॉगिंग ट्रॅक, श्रमनगर, पगारे वस्तीत पाणीपुरवठा व ड्रेनेजची कामे, काँक्रीट रस्ते. प्रभागात विविध ठिकाणी
गतिरोधक लावल्याने अपघातांवर नियंत्रण आले. टाकळी रोड भागात उद्यान विकसित झाले. भव्य क्रीडासंकुल, आधुनिक जिम, प्रभागात पथदीप नव्याने लावण्यात आले.
पोलीस ठाणे बांधले. समतानगरला नवीन मोठी पाण्याची पाइपलाइन टाकली आहे.
प्रभागाची व्याप्ती
उपनगर, गांधीनगर, शिवाजीनगर, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर, बोधलेनगर, रामदास स्वामीनगर, आगर टाकळी गाव, पंचशीलनगर, ड्रीम सिटी, मातोश्रीनगर, समतानगर, जय भवानीनगर.
गटाची लोकसंख्या
लोकसंख्या : 45,564
अनुसूचित जाती : 13,400
अनुसूचित जमाती : 3,779
शासकीय वसाहती, मध्यमवर्गीय, झोपडपट्टीसह संमिश्र परिसर
प्रभागात शासकीय वसाहतीसह मध्यमवर्गीय परिसर, तसेच झोपडपट्टी भागाचा समावेश आहे. हा प्रभाग नाशिक-पुणे महामार्गालगत असून, लोकसंख्या आणि मतदार संख्येच्या दृष्टीने हा प्रभाग अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. गेल्या अनेक निवडणुकांपासून काँग्रेसचा हा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. या प्रभागाची भौगोलिक रचना अत्यंत व्यापक आहे. उपनगर, गांधीनगर, शिवाजीनगर, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर, बोधलेनगर, रामदास स्वामीनगर, आगर टाकळी गाव, पंचशीलनगर, ड्रीम सिटी, मातोश्रीनगर, समतानगर आणि जय भवानीनगर.
इच्छुक उमेदवार
राहुल दिवे, सुषमा पगारे, आशा तडवी, सुनीता ताजनपुरे, पुष्पा ताजनपुरे, आकाश साळवे, संकेत पगारे, राजू कट्यारे, नीलेश सहाणे, संकेत ताजनपुरे, शुभम पाटील, वंदना मनचंदा, रमेश जाधव, सचिन गायकवाड, अनिल गांगुर्डे, कपिलदेव शर्मा, कुणाल वाघ, महेंद्र पवार, सुनील जाधव, सुमन ओहोळ, वनिता गांगुर्डे, रवी पगारे, मेघना साळवे, प्रवीण नवले, अलका साळवे, राजश्री शिंदे, दीपक हिरे, अमित कंटक, पूजा नवले, विशाल साळवे, लक्ष्मण पगारे, चंद्रकांत गांगुर्डे, श्याम थविल, संकेत पगारे, शशिकांत पवार, सचिन गायकवाड, प्रवीण महाजन, निकिता पाटील, दीपाली जाधव, वैष्णवी कंटक, माधुरी गांगुर्डे, कमल दहिया, माधुरी पगारे, सोनाली सूर्यवंशी.
रखडलेली कामे
प्रभागात रस्त्यांची कामे सिंहस्थात होणे अपेक्षित होते. संगम पुलाचे नूतनीकरण झाले नाही. मोकळ्या भूखंडाचा विकास झाला नाही. वाहतूक कोंडीवर उपाय नाही. त्यामुळे अवजड वाहनांचा त्रास आहे.