प्रत्येक प्रवासाची सुरुवात हादर्याने, शेवट भीतीने
लासलगाव : वार्ताहर
कांदानगरी अर्थात लासलगावमधील कमलाकर टॉकीज ते बसस्टॅण्डदरम्यानचा मेनरोड सध्या अक्षरशः खड्ड्यांनी पोखरला असून, वाहनचालक आणि पादचार्यांसाठी हा रस्ता एक संकटमय प्रवास ठरत आहे.खड्ड्यांमुळे दररोज अपघाताचा धोका वाढला आहे. या रस्त्यावरील गज अक्षरशः वरती आले असून, वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
रस्त्यांची ही दयनीय अवस्था पाहता स्थानिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे.विशेष म्हणजे, मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नातून महाराष्ट्र राज्य पायाभूत विकास महामंडळाच्या माध्यमातून लासलगाव-विंचूर रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी तब्बल 134 कोटी रुपयांची मंजुरी मिळाली आहे. मात्र, लासलगावच्या मुख्य रस्त्यावरील काम अद्यापही सुरू झालेले नाही. मागील आठवड्यात खुद्द मंत्री भुजबळ यांनी संबंधित ठेकेदारांना त्वरित काम सुरू करण्यास तसेच तोपर्यंत रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या होत्या. पण आजतागायत या सूचनांची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे ठेकेदारांच्या या टाळाटाळीवर नागरिक आश्चर्य व्यक्त करत आहेत. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच रस्त्यांची झालेली वाताहत आगामी दिवसांत परिस्थिती किती गंभीर होईल याची कल्पना देणारी आहे.
हा रस्ता लासलगाव बाजार समितीला जोडणारा महत्त्वाचा मार्ग असून, अनेक अवजड वाहने पिंपळगाव बसवंत येथील टोल टाळण्यासाठी या मार्गाचा वापर करतात. त्यामुळे येथे वाहतुकीचा मोठा ताण असतो.
या रस्त्यावरील प्रवास म्हणजे मृत्यूशी झुंज वाटते. खड्डा चुकवायचा तर समोरून येणार्या वाहनाचा धोका आणि खड्ड्यात गेलो की अपघात अटळ! प्रशासनाने रस्त्यावरील खड्डे लवकरात लवकर बुजवावे.
– रवी होळकर, लासलगावठेकेदाराच्या उदासीनतेमुळे रस्ते अपघातप्रवण झाले असून, नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. प्रशासनाने याची तत्काळ दखल घ्यावी.
– शिवा सुरासे, माजी पं.स. सभापती