वाहनचालकांची कसरत; यंत्रणांचे दुर्लक्ष
पळाशी : वार्ताहर
चाळीसगाव ते नांदगाव महामार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून, वाहनचालकांना खड्डे वाचविण्याच्या प्रयत्नात दररोज अपघातांना सामोरे जावे लागते. नांदगाव- चाळीसगाव महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे.
पिंपरखेड, नस्तनपूर, न्यायडोंगरी, रोहिणी, तळेगाव, हिरापूर येथे मोठे खड्डे पडले असून ते बुजविण्याचे काम संबंधित यंत्रणा व एजन्सी करत नाही. अधिकारी सुस्त, लोकप्रतिनिधी मस्त व वाहन चालक व नागरिक मात्र त्रस्त आहेत. तळेगाव नजीकच्या रेल्वे उड्डाण पुलाला मोठे भगदाड पडले असून, मोठा अपघात होऊ शकतो. आतापर्यंत अनेकांना जीव गमवावा लागला आहे. मात्र याची दखल तक्रार करूनही सार्वजनिक बांधकाम विभाग व संबंधित एजन्सी घेत नाही. टोल मात्र वसूल केला जात आहे. संबंधित एजन्सीने महामार्ग दुरुस्ती कडे साफ दुर्लक्ष केले आहेत. नांदगाव- चाळीसगाव महामार्गावर अवजड वाहतुकीसह लहान मोठी वाहनाची वर्दळ वाढल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे.न्यायडोंगरी, रोहिणी, तळेगाव, हिरापूर येथे तर मोठमोठे खड्डे पडले असून, त्या खड्ड्यांमुळे वाहन चालवण्यासाठी कसरत होत आहे. वाहनांची पाटे तुटून आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. अनेक निरपराध व्यक्तींना खड्ड्यांमुळे जीव गमवावा लागला आहे. या मार्गावर खड्डे बुजवण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग व संबंधित एजन्सी करेल का? असा संतप्त प्रश्न वाहनचालक व स्थानिक नागरिक विचारीत आहेत.