निफाडला मॉन्सूनपूर्व शेती मशागतीला सुरुवात

खरीप हंगामाचे हिरवे स्वप्न उराशी बाळगून बळीराजा जोमाने लागला कामाला

निफाड ः विशेष प्रतिनिधी

रखरखत्या उन्हात शेतकरी खरीपपूर्व मशागतीच्या कामाला लागला आहे. सध्या वातावरणात बदल झाला असून, यंदा मॉन्सून लवकरच म्हणजे 27 मेस दाखल होणार, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. खरीप हंगाम चांगला होईल, या आशेने शेतकरी मॉन्सूनपूर्व मशागतीच्या कामाला लागला आहे. सध्या शेतकरी आर्थिक अडचणीत आहे. मागील खरीप हंगामात सोयाबीनचे उत्पादन चांगले निघाले तरी हमीभावापेक्षा कमी बाजारभाव मिळाल्याने शेतकरी नाराज आहेत.
शेतकरी हा कायम आशेवर जगतो. नैसर्गिक संकटांसह सुलतानी संकटे नेहमीच त्याच्या पाचवीला पूजलेली असतात. परिसरातील शेतकर्‍यांचे द्राक्षबाग व टोमॅटो ही पिके वगळता मुख्य पीक असलेले सोयाबीन, मका दोन ते तीन वर्षांपासून हमीभावापेक्षा कमी म्हणजेच सोयाबीन चार हजार रुपयांच्या जवळपास विकत असल्यानेे शेतकर्‍यांचे कंबरडे मोडले आहे. आज नाहीतर उद्या धरणी माय भरभरून देईल, या आशेवर शेतकरी तग धरून उभा आहे.
गेल्या वर्षीच्या खरीप हंगामातही फारसे काही हाती लागले नाही. कोणत्याही शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळत नाही. अशा बिकट परिस्थितीत शेतकरी कडक उन्हात, तर अवकाळी पावसात जिवाची पर्वा न करता हिरवे स्वप्न उराशी बाळगून जोमाने शेती मशागतीला लागला आहे.
सध्या वातावरणात कमालीचा बदल झाला आहे. कधी जीवघेणे ऊन, तर कधी गारांचा पाऊस पडतोय. तरीदेखील मागील वर्षाची कसर पुढे निघेल, या आशेवर शेतकरी जोमाने खरीपपूर्व मशागत करत आहेत. अवकाळी झाल्यास नांगरूण ठेवलेली जमीन मशागत करण्यास सोपी जाते. त्यामुळे झटपट व वेळेवर ट्रॅक्टरद्वारे नांगरणीच्या कामाला वेग दिला आहे. आजही बहुतांश शेतकरी ट्रॅक्टरच्या सहाय्याने मशागत करण्यास प्राधान्य देताहेत. शेतीत मोठ्या प्रमाणात यांत्रिकीकरण झाले असले तरी आजही काही कामे मनुष्यबळाचा, तर काही यंत्राचा वापर करूनच करावी लागतात. शेतातील धसकट वेचणे, शेणखत टाकणे, पाळी घालणे यांसारखी अनेक कामे सध्या वेगात सुरू आहेत. त्यामुळे दुपारी बारापर्यंत शेतात मजुरांच्या सहाय्याने
कामे केली जात आहेत.

सोयाबीन पेरणीचा टक्का घटण्याची शक्यता

यंदा मॉन्सून एक आठवडाआधी म्हणजेच 27 मेस अंदमान-निकोबारमध्ये दाखल होणार असल्याच्या हवामान खात्याच्या अंदाजामुळे शेतकर्‍यांच्या आशा काही प्रमाणात पल्लवित झाल्या आहेत. त्याअनुषंगाने शेतकरी तयारी करत आहेत. मात्र, शासनाने जाहीर केलेली कर्जमाफी प्रत्यक्षात येत नसल्याने शेतकरी नाराजी व्यक्त करत आहेत. यंदा सोयाबीनला कमी दर मिळाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे सोयाबीन पेरणीचा टक्का घटण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *