आरोग्य विद्यापीठातील डॉक्टरांचा प्रयत्न यशस्वी
नाशिक : प्रतिनिधी
आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्थेत सर्पदंश झालेल्या गर्भवती महिलेचे आणि गर्भातील बाळाचे यशस्वीपणे प्राण वाचविण्यात डॉक्टर यशस्वी झाले आहेत. याप्रसंगी अधिष्ठाता डॉ. मृणाल पाटील यांनी सांगितले की, इगतपुरी तालुक्यातील महिलेला सर्पदंश झाला होता. तिला तातडीने महाराष्ट्र पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्थेत दाखल केले. तज्ज्ञ डॉक्टरांच्या त्वरित आणि दक्षतेने करण्यात आलेल्या उपचारांमुळे तिच्या जीवाचा धोका टळला आणि गर्भातील बाळाचा जीवसुद्धा धोक्यात आला नाही. डॉक्टरांनी केलेल्या या यशस्वी प्रयत्नांमुळे अभिमान वाटतो व अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा आणि डॉक्टरांच्या मदतीने अशा जटिल प्रसंगातही जीव वाचवता येतो, असे त्यांनी सांगितले.
हॉस्पिटलमध्ये दाखल होताना रुग्ण बेशुद्ध होती. तत्काळ व्हेंटिलटेरवर घेऊन अतिदक्षता विभागात हलवण्यात आले. तपासणीदरम्यान रुग्णाच्या रक्ताच्या गुठळ्या होण्याची प्रक्रिया वाढली होती. या आधारावर ‘मिश्र सर्पदंश-वास्कुलोटॉक्सिक + न्यूरोपॅरालिटिक’ असे तात्पुरते निदान करण्यात आले. रुग्णावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले. पहिल्या पाच दिवसांत प्रकृतीमध्ये कोणतीही सुधारणा झाली नाही. गर्भ तपासणीमध्ये बाळाचे हृदयाचे ठोके ऐकू न आल्यामुळे गर्भ मृत असल्याची शक्यता होती. मात्र, पाचव्या दिवशी रुग्णाने डोळे उघडले. ज्यामुळे उपचार सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला गेला. चमूने सर्पदंश झालेल्या गर्भवती महिलेचे आणि तिच्या गर्भातील बाळाचे यशस्वीपणे प्राण वाचवले आहे. या घाडसी आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या कौशल्याने महिलेचे जीवन वाचवण्यात यश मिळाले असून, त्यांचे कौतुक करण्यात येत आहे. महिलेची प्रकृती गंभीर होती, परंतु तातडीने घेतलेल्या उपचारांमुळे तिच्या व गर्भातील बाळाच्या जीवाचा धोका टळला आहे. डॉ. माधुरी किर्लोस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी डॉक्टरांच्या मदतीने केलेल्या उपचारांमुळे महिला व गर्भातील बाळ पूर्णपणे सुरक्षित असल्याने पुढील उपचार काळात रुग्णाची परिस्थिती सुधारली. आरोग्य विद्यापीठाच्या पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्थेत कार्यरत डॉ. माधुरी किर्लोस्कर, डॉ. राहुल केकाण, डॉ. पंकज चव्हाण, निवासी डॉक्टर डॉ. अनुश्री सोनवणे, डॉ. आशिष साबणे, डॉ. पवन तेजा, डॉ. रोहिदास खंदारे यांचे कौतुक केले जात आहे.