त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी
संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज यात्रोत्सव पौष वारी दि. 18 जानेवारी रोजी संपन्न होत आहे. याबाबत शासनस्तरावर बैठका होत आहेत. संत निवृत्तिनाथ समाधी मंदिर संस्थान विश्वस्त मंडळाची नियोजन बैठक संस्थानच्या कार्यालयात संपन्न झाली. मंदिर जीर्णोद्धाराचे काम सुरू आहे, मात्र वारकर्यांची व परंपरागत मानकर्यांची कुठलीही गैरसोय होणार नाही याची दखल संस्थानाने घेतली असून, त्या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे.
पौषवारी अगोदर मंदिर गाभार्यास नवीन काळा पाषाण बसविण्याचे काम युद्धपातळीवर करण्यात येत आहे. मंदिर
जीर्णोद्धार विकास आराखड्याच्या दृष्टीने नियोजित असलेले गाभार्यातील बाकी असलेले हे काम पुढील दोन दिवसांत पूर्ण होत आहे.
मंदिरासमोर तात्पुरत्या स्वरूपाचा सभामंडप व दर्शनबारी उभारण्यात येत असून, वारीस आलेल्या भाविकांना त्याचा वापर करता येईल. मंदिर परिसरात स्वच्छता करण्यात येत आहे.सपाटीकरण होत आहे. मानकर्यांच्या येणार्या दिंडीसाठी स्वतंत्र सोयीसुविधा युक्त मंडप देऊन राहुट्या उभारल्या जाणार आहेत. पिण्याच्या पाण्याची योग्य व्यवस्था नगरपालिका प्रशासनाच्या मदतीने करण्यात येत आहे. दर्शनबारीसाठी संस्थानकडून सीसीटीव्ही लावले जाणार आहेत. तर मंदिर परिसराच्या बाहेर बाजूस प्रशासनाकडून सीसीटीव्ही नियोजन करण्यात आले आहे. वारकर्यांची गैरसोय होणार नाही या दृष्टीने त्र्यंबकेश्वर महावितरण अधिकारी व कर्मचारी यांच्या समन्वयाने रूपरेषा आखली आहे.
मंदिर दर्शनासाठी येणार्या वारकरी भाविकांची व मानकर्यांची दिंड्यांतील भाविकांची स्वच्छतागृह व्यवस्थेसाठी मंदिराच्या आजूबाजूच्या परिसराची पाहणी करण्यात आली. यावेळी नगरपालिकेचे मुख्याधिकारी संजय जाधव, संस्थानचे अध्यक्ष नीलेश गाढवे, सचिव ऍड. सोमनाथ घोटेकर, विश्वस्त नारायण मुठाळ, माधवदास राठी, श्रीपाद कुलकर्णी, नवनाथ गांगुर्डे, राहुल साळुंके, जयंत गोसावी, योगेश गोसावी, ह.भ.प. कांचनताई जगताप, भानुदास गोसावी, उपसमितीचे सदस्य निवृत्ती गंगापुत्र, बाळासाहेब पाचोरकर, कैलास अडसरे, किरण चौधरी, राजेश घुले उपस्थित होते.