नवनिर्वाचित नगरसेवकांसाठी महापालिकेत जय्यत तयारी

महापौर, उपमहापौरांसह गटनेत्यांच्या कार्यालयांत साफसफाई; खुर्च्या, टेबल दाखल

नाशिक : प्रतिनिधी
नाशिक महापालिकेत चार वर्षांनंतर नगरसेवकांची एन्ट्री होणार आहे. या नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींसाठी महापालिका प्रशासनाने महासभा सभागृहाचे यापूर्वीच नव्याने काम केले आहे. महापौर, उपमहापौर व विरोधी पक्षनेता कार्यालय, गटनेता कार्यालयांची दुरुस्ती काही दिवसांपूर्वी केली आहे. येत्या पंधरा ते वीस दिवसांत महापौरपदासह उपमहापौर, सभागृह नेते, गटनेते, विविध समित्यांच्या सभापतींची नियुक्ती होणार आहे. कार्यकर्त्यांच्या गर्दीने कार्यालये गजबजणार असल्याने नव्याने खुर्च्या आणल्या असून, रंगरंगोटीचे काम सुरू आहे.

सोमवारी (दि.19) महापौर, उपमहापौर, गटनेते यांच्या कार्यालयांत खुर्च्या ठेवण्याचे काम सुरू होते. महापालिकेची निवडणूक 15 जानेवारी रोजी झाली. दुसर्‍या दिवशी दहा ठिकाणी निकाल जाहीर करण्यात आला. यावेळी भाजपने पुन्हा नाशिकचे मैदान मारत विरोधकांचा दारुण पराभव करत सर्वाधिक 72 जागा मिळवून महापालिकेची सत्ता हस्तगत केली.

दरम्यान, आरक्षण सोडतीनंतर भाजपकडून सत्ता स्थापण्याचा दावा केला जाईल. प्रशासकीय राजवटीत पदाधिकार्‍यांची कार्यालयेही बंद होती. मात्र, निवडणूक झाल्याने राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची वर्दळ वाढणार आहे. त्यामुळे कार्यालयांची रंगरंगोटी करण्याबरोबरच नव्याने खुर्च्या दालनात आणल्या आहेत. दरम्यान, महासभेद्वारे संख्याबळावर भाजपातून महापौर व उपमहापौरांची निवड केली जाईल. नवनियुक्त लोकप्रतिनिधींच्या नजरा आता महापौर आरक्षणाकडे लागल्या असून, सोबतच त्या-त्या पक्षाकडून नियुक्त्या केल्या जातात. त्याकडेदेखील लक्ष लागले आहे. प्रशासनाकडून पदाधिकार्‍यांच्या दालनात कोणतीही कमी राहणार नाही, याची खबरदारी घेताना दिसत आहे.

Preparations underway in the Municipal Corporation for newly elected corporators

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *