रासायनिक खतांची दरवाढ चिंताजनक

निफाड तालुक्यात 22 हजार 384 टन खतांचे आवंटन मंजूर

निफाड : विशेष प्रतिनिधी
शेतकर्‍यांना सरकारकडून रासायनिक खतांसाठी अनुदान देण्यात येते. मात्र, खरीप हंगाम सन 2025 च्या पार्श्वभूमीवर बाजारात खतांचे दर वाढले आहेत. या दरवाढीचा थेट परिणाम शेतकर्‍यांच्या उत्पादन खर्चावर होणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे. निफाड तालुक्यात 22 हजार 384 मेट्रिक टन खतांचे आवंटन मंजूर झाल्याबाबतची माहिती कृषी अधिकारी सुधाकर पवार यांनी दिली आहे.
खरीप हंगामासाठी सोयाबीन, मका, बाजरी, भुईमुगासह सर्व पिकांसाठी युरिया, डीएपी तसेच विविध खतांची नितांत गरज असते. खत पिकांसाठी अत्यंत आवश्यक आहे. पिकांना खते वापरताना शेतकर्‍यांनी माती परीक्षण करूनच खते वापरावीत, जेणेकरून खते कमी लागतील, ती विस्कटून देऊ नयेत, पेरून द्यावीत. खते मुळांच्या कक्षेत द्यावीत. शक्यतो खते फेकून देऊ नये, खतांचा दुरुपयोग होतो. अर्थातच पिकांना पाहिजे त्या प्रमाणात खतांची उपलब्धता होत नाही. तण मोठ्या प्रमाणात वाढते.
पेरणी यंत्राद्वारे खतांचा वापर करावा. शेतकर्‍यांनी नांगरटीनंतरच्या सर्व मशागती व पेरण्या व्यवस्थित कराव्यात. बांधबंदिस्ती करून घ्यावी. योग्य पद्धतीने खते वापरल्यास पिकांची वाढ योग्य होते. खतांच्या दरात नेहमी वाढ होते. खत दरवाढीचा परिणाम थेट पिकांच्या उत्पादन खर्चावर होतो.शेतकर्‍यांनी खतांचा योग्य पद्धतीने अभ्यास करून वापर करावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी सुधाकर पवार यांनी केले आहे. सर्व खतांवर अनुदान देण्यात आले असले तरी बाजारातील वाढलेले दर शेतकर्‍यांना आर्थिकदृष्ट्या अडचणीत आणणारे आहेत. शासन खतांचे उत्पादन व वितरण सुरळीत राहावे यासाठी तसेच शेतकर्‍यांना अडचण न येण्यासाठी प्रयत्नशील आहे. मात्र, खत दरवाढीचा थेट परिणाम शेतीच्या उत्पादन खर्चावर होणार आहे.

खरीप हंगामाचे संपूर्ण नियोजन करण्यात आले आहे.

तालुक्याला आवश्यक असलेले खते आणि बियाणे काही प्रमाणात उपलब्ध झाले असून,

मुबलक प्रमाणात उपलब्ध होणार आहेत.

तसेच सर्व खते आणि बियाणे कंपन्यांच्या अधिकारी आणि

वितरक यांच्यासोबत बैठक घेऊन आवश्यक त्या सूचना त्यांना देण्यात आल्या आहेत.

-सुधाकर पवार, तालुका कृषी अधिकारी, निफाड

खतांचे मंजूर आवंटन
युरिया  – 7152 मेट्रिक टन
डीएपी  – 1940 मेट्रिक टन
एमओपी  – 265 मेट्रिक टन
एसएसपी  – 2809 मेट्रिक टन
संयुक्तखते – 10218 मेट्रिक टन
एकूण  – 22384 मेट्रिक टन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *