स्टेडियम वगळता प्रभावी कामांचा अभाव; पाणीप्रश्न, रस्त्यांचे प्रश्न कायम
महापौर, स्थायी समितीचे सलग दोनवेळा अध्यक्षपद, एकदा गटनेतेपद, सत्तेतील पक्ष, अशी जमेची बाजू असूनही शहराचे एक प्रवेशद्वार असणार्या प्रभाग क्रमांक एकमधील समस्या आजही जैसे थे आहेत. रखडलेली विकासकामे, खड्डेमय रस्ते, पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या, उद्यानांची झालेली दुरवस्था, अशा अनेक समस्यांनी प्रभाग 1 मध्ये आगामी काळात कोण नेतृत्व करते, यावर विकासाची पुढील प्रक्रिया अवलंबून असणार आहे. प्रभागात एक भव्य स्टेडियम उभे राहत असल्याने नवीन ओळख निर्माण होणार आहे.
मात्र, गेल्या दोन ते तीन वर्षांत या प्रभागात अनेक समस्यांनी डोकं वर काढल्याचे दिसत आहे. यात मुख्य पिण्याच्या पाण्याची समस्या अधिक गंभीर आहे. प्रभागातील कॉलनी रस्ते खड्ड्यांत गेले असून, रस्त्यात खड्डा की खड्ड्यांत रस्ता, असा प्रश्न उपस्थित होत आहे. रस्त्यावर वाढलेले अतिक्रमण, रस्त्याच्या मधोमध असलेल्या झाडांमुळे होणारे अपघात, अशा समस्यांनी प्रभागातील नागरिक त्रस्त झाले आहेत. म्हसरूळ गावातील अतिप्राचीन सीता सरोवराचा विकास साधला गेला नाही, अशी खंत म्हसरूळ ग्रामस्थ, भक्त-भाविक यांनी व्यक्त केली आहे. मागील सिंहस्थात दोन कोटी रुपये निधी मंजूर होऊनही विकास झाला नाही. या सिंहस्थ कुंभमेळ्यात सीता सरोवराचा विकास व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
नाशिक ही धार्मिक भूमी असून, प्रभू श्रीरामचंद्रांचे वास्तव्य, प्रसिद्ध श्री काळाराम मंदिर, तीर्थक्षेत्र रामकुंड आणि बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी याच प्रभागातून जावे लागत असल्याने शहराचे एक मुख्य प्रवेशद्वार, अशी या प्रभागाची ओळख आहे.
पूर्वीचे गावठाण; परंतु आताचे छोटेे महानगर असलेल्या म्हसरूळ प्रभाग एकमध्ये गेल्या काही वर्षांपासून भाजपचे लोकप्रतिनिधी आहेत. पूर्वीची लोकसंख्या अन् आताची लोकसंख्या यात मोठी वाढ झाल्याने गावठाण वगळता कॉलनी परिसर मोठ्या प्रमाणात विस्तारला गेला आहे. या प्रभागात उद्यानांची संख्या सर्वाधिक आहे. पण आजच्या घडीला या उद्यानांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे.काही उद्यानांत खेळणी लावलेली आहे, पण त्या सर्व गवतात हरवून गेल्या आहेत.खेळण्यांचे नुकसानदेखील झाले आहे. उद्याने नागरी वस्तीत असल्याने उद्यानांत मद्यपींचा वावर वाढला असून, परिसरातील महिला, नागरिक सुरक्षित नाहीत. समाजमंदिर असून नसल्यासारखे आहेत. सर्वच कॉलनी परिसरात पाण्याची गंभीर समस्या असल्याने पाऊस भरपूर असूनही पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.रस्त्यांचीदेखील चाळण झाल्याने किरकोळ अपघातांचे प्रणाम वाढले आहे. पथदीप जुने झाले असून, अनेक पथदीप झाडांच्या फांद्यामुळे झाकले गेल्याने अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. म्हसरूळ-मखमलाबाद तसेच म्हसरूळ- नाशिक या मुख्य रस्त्यावर भरणारा भाजीबाजार, मुख्य रस्त्याची दुरवस्था अशा एक ना अनेक समस्या प्रभागात उभ्या ठाकल्या आहेत. सध्या मनपात प्रशासक राज असून, प्रभागातील महापौर, स्थायी समिती दोन वेळा अध्यक्ष, काही महिने मिळालेले गटनेतेपद अशी महत्त्वाची पदे उपभोगलेल्या लोकप्रतिनिधींनाही प्रशासन जुमानत नसल्याने नागरिकांच्या नशिबी मात्र समस्यांचा डोंगर उभा राहिला आहे.
विद्यमान नगरसेवक
रंजना भानसी
गणेश गिते
अरुण पवार
पूनम धनगर
या आहेत समस्या
♦ अतिप्राचीन सीता सरोवराकडे दुर्लक्ष.
♦ कॉलनी परिसरात पाण्याची गंभीर समस्या.
♦ मुख्य रस्त्यावर अतिक्रमण.
♦ कॉलनी परिसरात खड्डेच खड्डे.
♦ उद्याने असून नसल्यासारखी.
प्रभागाचा परिसर
म्हसरूळ गावठाण व मळे परिसर, पोकार कॉलनी, किशोर सूर्यवंशी मार्ग, ओंकारनगर , बोरगड, चामरलेणी, म्हसोबावाडी, प्रभातनगर, ओमकारनगर, गोरक्षनगर, गायत्रीनगर, कलानगर, गजपंथ सोसायटी परिसर, तवली फाटा परिसर, शंकरनगर.
प्रभागातील विकासकामे
♦ प्रभागात भव्य स्टेडियम.
♦ पाच जलकुंभ.
♦ म्हसरूळ-आडगाव लिंक रोड रुंदीकरण व डांबरीकरण.
♦ फिल्टरेशन प्लांट ते प्रभातनगर पाण्याच्या टाकीपर्यंत मोठी पाइपलाइन.
♦ दोन अद्ययावत अभ्यासिका.
सन 2011 नुसार लोकसंख्या
♦ लोकसंख्या- 53,294
♦ अनुसूचित जाती- 5,946
♦ अनुसूचित जमाती- 9,478
इच्छुक उमेदवार
प्रवीण जाधव, रंजना भानसी, गणेश गिते, अरुण पवार, सोमनाथ वडजे, डॉ. सचिन देवरे, अमित घुगे, भाऊसाहेब नेहरे, राजू थोरात, नंदा थोरात, सरिता म्हस्के, रेखा नेहरे, संध्या केदारे-संधान, गणेश चव्हाण, बाळासाहेब उखाडे, सुनील निरगुडे, रोहिणी उखाडे, स्वाती पाटील, संतोष पेलमहाले, विश्वास मोराडे, वंदना पेलमहाले, गणेश पेलमहाले, श्याम गायकवाड, पद्माकर मोराडे, आकाश कोकाटे, करुणा गायकवाड.
अनेक समस्यांनी नागरिक त्रस्त
प्रभागात मूलभूत सुविधांसाठी जनता लोकप्रतिनिधी निवडून देतात; परंतु पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या आहे. उद्याने असून नसल्यासारखी आहेत. नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असून, महापालिका प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे.
– प्रवीण जाधव, सामाजिक कार्यकर्ते
धार्मिक स्थळाकडे दुर्लक्ष
अतिप्राचीन असलेल्या व धार्मिक महत्त्व असलेल्या श्रीक्षेत्र सीता सरोवर विकासापासून वंचित राहिले आहे. रामायणाशी निगडित असलेल्या या सरोवराचा विकास महत्त्वाची पदे भोगलेल्या लोकप्रतिनिधींनी करायला हवा होता, परंतु त्याकडे पूर्णतः दुर्लक्ष केले गेले.
-विश्वास मोराडे, ग्रामस्थ, म्हसरूळ
उद्यानांची दुरवस्था
गेल्या 20 ते 25 वर्षांपासून या भागात राहत असून, उद्यानांकडे उद्यान विभागाने कानाडोळा केला आहे. याठिकाणी रोज सकाळपासून काही टवाळखोर येऊन मद्यपान करतात. लहान मुलांना खेळण्या बागडण्यासाठी चांगल्या उद्यानाची गरज आहे. याठिकाणी सरपटणारे प्राणी, त्यात विंचू, साप वावरत असल्याने मुलांसह इतरांच्याही जीवाला धोका आहे. त्यामुळे उद्यान विकसित करण्याची गरज आहे.
– हरी महाले, रहिवासी, स्नेहनगर
भाजी बाजाराचे अतिक्रमण
म्हसरूळ-नाशिक रस्त्यावरील म्हसरूळ गावाजवळ, तसेच म्हसरूळ- मखमलाबाद लिंक रोडवरील कंसारा माता चौक परिसरात भाजीपाला विक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे. यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता आहे. भाजीपाला घेण्यासाठी येणारे ग्राहक गाडीवर बसून भाजीपाला खरेदी करतात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा होतो. अनेक वेळा किरकोळ अपघातदेखील होताना दिसतात. त्यामुळे अतिक्रमणाकडे लक्ष देण्याची गरज आहे.
– हर्षल पवार, कार्याध्यक्ष, पंचवटी शिवजन्मोत्सव समिती
कॉलनी रस्त्यांची लागली वाट
या प्रभागात मोठ्या प्रमाणात कॉलनी परिसर विस्तारला गेला आहे. गेल्या तीन-चार वर्षांपासून महापालिकेत प्रशासक असल्याने कॉलनी परिसरात रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. रस्ते खड्ड्यात की खड्ड्यांत रस्ते असा प्रश्न उपस्थित होतो.
– मेघा मोरे, स्थानिक रहिवासी
उद्यानांमध्ये मद्यपींचा वावर
प्रभाग 1 मध्ये मोठ्या प्रमाणात उद्याने आहेत. बोटावर मोजण्याइतकी चांगले असून, इतर उद्यानांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. उद्यानांमध्ये गवत वाढल्याने खेळण्या झाकल्या आहेत. अनेक उद्यानांमध्ये मद्यपींचा वावर वाढल्याने महिलांच्या सुरक्षेचा प्रश्नदेखील ऐरणीवर वर आला आहे.
– सौ. करुणा गायकवाड, सामाजिक कार्यकर्त्या
सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…
टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…
बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…
महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…
सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…