नाशिक: प्रतिनिधी
शिक्षण क्षेत्रातील भीष्माचार्य गोखले एज्युकेशन सोसायटीचे सचिव व महासंचालक सर डॉ. मो. स. गोसावी यांचे आज दि.९ जुलै रोजी पहाटे १.४५ मिनिटांनी देहावसान झाले. ते ८८ वर्षाचे होते. त्यांच्या जाण्याने शिक्षण क्षेत्रातील आधारवड हरपला आहे. त्यांच्या पश्चात मुले शैलेश, कल्पेश आणि कन्या डॉ. दीप्ती देशपांडे असा परिवार आहे. त्यांचे पार्थिव सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत बी.वाय.के.महाविद्यालयालयात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. आज रविवारी सायंकाळी 5.30 वाजता वैकुंठधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. शिक्षण क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांच्या अतुलनीय कार्याची दखल घेऊन त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. शहरी भागातील विद्यार्थ्यां बरोबरच ग्रामीण व दुर्गम आदिवासी विद्यार्थ्यांना त्यांनी गोखले शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्या. त्यांच्यासाठी शिक्षणाची कवाडे खुली केली होती. सामाजिक विकासासाठी शिक्षण हे एकमेव साधन आहे, हा विश्वास ठेवून त्यांनी स्वतःला शिक्षणाच्या प्रचार – प्रसारासाठी आजीवन वाहून घेतले होते.