प्राचार्यांचे प्राचार्य

प्राचार्यांचे प्राचार्य

गोखले एज्युकेशन सोसायटीचे महासंचालक तथा सचिव, आंतरराष्ट्रीय व्यवस्थापनतज्ज्ञ, प्राचार्यांचे प्राचार्य म्हणून ओळख असलेले सर डॉ. मोरेश्वर सदाशिव तथा मो. स. गोसावी यांचे रविवार दिनांक ९ जुलै २०२३ रोजी पहाटे पावणेदोन वाजता निधन झाले. गोखले एज्युकेशन सोसायटी म्हणजे डॉ. मो. स. गोसावी आणि डॉ. मो. स. गोसावी म्हणजे गोखले एज्युकेशन सोसायटी, असे एक समीकरण महाराष्ट्राच्या शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्य आणि सामाजिक क्षेत्रात आजही पाहायला मिळते. गोसावीसरांनी आपले सारे जीवन शैक्षणिक क्षेत्रासाठी समर्पित केले होते. त्यांच्या जाण्याने गोखले एज्युकेशन सोसायटीतच नव्हे, तर शैक्षणिक क्षेत्रात एक पोकळी निर्माण झाली आहे. सन १९७२ पासून डॉ. गोसावी यांनी संस्थेची धुरा हाती घेतली. शैक्षणिक कारकिर्दीत गोखले एज्युकेशन सोसायटीचा खर्‍या अर्थाने कायापालट झाला. काळाची गरज ओळखून त्यांनी आपल्या संस्थेत नवनवीन अभ्यासक्रम आणले. देशात मास्टर ऑफ बिझिनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन (एमबीए) अभ्यासक्रम त्यांनीच प्रथम आपल्या संस्थेत सुरू केला. व्यावसायिक आणि उद्योजकीय शिक्षणातून रोजगार निर्मिती व्हावी, यावर त्यांनी नेहमीच भर दिला. त्यासाठी आपल्या संस्थेत त्यांनी नवीन विभाग आणि संस्था सुरू केल्या. वाणिज्य, व्यवस्थापन, संगणकीय प्रणाली, भांडवल बाजार, पत्रकारिता, अभियांत्रिकी, फार्मसी, पर्यटन, अशा विविध क्षेत्रांत प्रशिक्षित मनुष्यबळ आपल्या संस्थेतून निर्माण होण्यासाठी त्यांचा विशेष कटाक्ष होता. संस्थेच्या कॅम्पसमध्येच वैद्यकीय महाविद्यालय उभारणीचे त्यांनी हाती घेतलेले काम प्रगतीपथावर आहे. यानिमित्ताने बाह्यरुग्ण कक्षही सुरू करण्यात आला आहे. विद्यार्थी व शिक्षकांनी संशोधन करावे, यासाठी त्यांनी नेहमीच प्रोत्साहन दिले. अलीकडेच त्यांनी युट्यूबवर विचारधन नावाची मालिका सुरू केली होती. भारतातील महान विभुतींचे सामाजिक, शैक्षणिक, राष्ट्रीय योगदान, सर्वधर्मीय सण उत्सवांचे महत्व यावर त्यांनी प्रबोधनात्मक उपक्रम विचारधनच्या माध्यमातून सुरू केला होता. कोणत्याही विषयावर कोणत्याही क्षणी बोलण्यास ते सदैव तयार असायचे. प्रत्येक दिवसाचे महत्व ते पटवून द्यायचे. कोणत्याही विषयातील संकल्पना अगदी सोप्या भाषेत मांडण्याची त्याची होतोटी होती. भारतीय संस्कृती जगाला मार्गदर्शक ठरणारी असून, भारत हा जगद्गुरू असल्याचा उल्लेख ते नेहमी करायचे.
टी. ए. कुलकर्णी यांचा वारसा
महात्मा गांधी यांचे राजकीय गुरू नामदार गोपाळकृष्ण गोखले यांच्या तिसर्‍या स्मृतीदिनी त्यांचे शिष्य आणि थोर समाजसेवक, प्राचार्य त्र्यंबक अप्पा (टी. ए.) कुलकर्णी यांनी दिनांक १९ फेब्रुवारी १९१८ रोजी गोखले एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. शिक्षण आणि प्रशिक्षणाच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण नागरिक घडविण्याच्या मुख्य उद्दिष्टासह स्थापन झालेल्या शैक्षणिक संस्थांपैकी ही एक सर्वांत जुनी आणि आद्य शैक्षणिक संस्था आहे. मातृभूमीवर उत्कट प्रेम करणाऱ्या नामदार गोपाळकृष्ण गोखले यांनी भारतासाठी संपूर्ण आयुष्य वेचले. सत्यता आणि सचोटी ही मूल्ये सर्वाधिक महत्वाची असल्याचे ते मानत होते. पाच डिसेंबर १९१२ रोजी मुंबईतील काशीबाई धर्मशाळा इमारतीत पहिली ते तिसरीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना प्रिन्सिपल टी. ए. कुलकर्णी यांनी केल्यापासून नामदार गोपाळकृष्ण गोखले यांच्या नावाने एक संस्था आपण स्थापन केलीच पाहिजे, हा विचार प्रिन्सिपल टी. ए. कुलकर्णी यांच्या मनात सतत घोळत होता. याच विचारातून त्यांनी मुंबईत गोखले एज्युकेशन सोसायटी स्थापन केली. मुंबईत या संस्थेची स्थापना झाली असताना नाशिकमध्ये उच्च शिक्षणाचे केंद्र स्थापन करण्याच्या उद्देशाने सेठ हंसराज ठाकरसी यांनी १९२४ साली अडीच लाख रुपये देणगी संस्थेला दिली. याच देणगीतून नाशिकमध्ये हंसराज प्रागजी ठाकरसी महाविद्यालयाचा म्हणजे एचपीटी कॉलेजचा जन्म झाला. तत्कालीन मुंबई इलाख्यातील हे पहिले ग्रामीण महाविद्यालय ठरले. नावलौकिकप्राप्त या संस्थेच्या अनेक लक्षणीय वैशिष्ट्यांपैकी एक वैशिष्ट्य म्हणजे शिक्षकांनी चालविलेली ही सोसायटी आहे. कॅम्पसमधील सक्षम अभ्यासक्रमांना सुसज्ज आकार देण्याच्या कार्यात सर डॉ. मो. स. गोसावी यांचा सिंहाचा वाटा आहे. सरांच्या आदर्शवादी आणि विद्यार्थीभिमुख दृष्टीकोनातून सोसायटी एका नव्या उंचीवर गेली आणि जगाच्या नकाशावरही तिचे नावही लिहिले गेले. सरांची दूरदृष्टी आणि ६३ वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवातून सोसायटीतील शिक्षणाला एक नवीन आयाम लाभला. सन १९५८ साली भियक्ष (बीवायके) वाणिज्य (सिन्नर) महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी सरांची नियुक्ती टी. ए. कुलकर्णी यांनी केली, तेव्हा त्यांचे वय केवळ २२ वर्षे होते. त्यावेळी कविवर्य कुसुमाग्रज तथा तात्यासाहेब शिरवाडकर आणि गांवकरीचे संपादक दादासाहेब पोतनीस २२ वर्षांचा प्राचार्य पाहण्यासाठी महाविद्यालयात आवर्जून गेले होते. ही एक विशेष बाब.
विद्यार्थी देवो भव

भारतीय प्रशासकीय सेवा म्हणजे आयएएस ही अत्यंत कठीण परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर गोसावीसरांना सरकारी सेवा करण्याची संधी होती. पण, शिक्षण क्षेत्रासाठी अशी माणसे मिळणार नाहीत, असे त्यांचे वडील मोरेश्वररावांनी म्हटले होते. वडिलांचा सल्ला शिरवांद्य मानून डॉ. गोसावी यांनी शैक्षणिक क्षेत्राला वाहून घेण्याचा निर्धार केला. या क्षेत्रात त्यांनी आपल्या विद्वत्तेचा ठसा उमटविला. निवृत्तीपर्यंत म्हणजे ३८ वर्षे याच पदावर सर कार्यरत राहिले. जगातील सर्वांत तरुण आणि सर्वाधिक कालावधीचे प्राचार्य असण्याचा बहुमान त्यांना लाभला. जगातील सर्वांत लहान वयाचे प्राचार्य म्हणून गिनीस बुकात त्यांचे नाव आजतागायत कायम आहे. गोखले एज्युकेशन सोसायटीतील विविध शाळा आणि महाविद्यालयांच्या प्राचार्यांचे प्राचार्य म्हणून त्यांची सचिव या नात्याने ओळख निर्माण झाली. ‘विद्यार्थी देवो भव’ हे बोधवाक्य त्यांनीच सोसायटीला देऊन विद्यार्थ्यांना शिक्षण प्रकियेत नेहमीच केंद्रस्थानी ठेवले. याचे फलित म्हणजे गुणवत्तापूर्ण पायाभूत सुविधांनी सोसायटी सक्षम बनली. सर्व स्तरांवरील विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीनुसार सुमारे ३०० अभ्यासक्रम शिकवले जात आहेत. पूर्ण गुणवत्तेसह आजीवन शिक्षणाच्या सर्व उपक्रमांमध्ये उत्कृष्टता साध्य करणे, हाच सोसायटीचा मुख्य उद्देश आहे. अर्थपूर्ण अस्तित्वाची १०५ वर्षे सोसायटीने पूर्ण केली आहेत. मुंबई, नाशिक, पालघर या तीन विभागांमध्ये १४० संस्थांतून सुमारे सव्वालाख विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या गरजेची पूर्तता सोसायटी करत आहे. सोसायटीमध्ये अनुभवी शिक्षकवर्ग असून, त्यात बहुतांश पीएचडीधारक आहेत. संस्थेत सर्व विद्याशाखांच्या विद्यार्थ्यांसाठी करिअरशी निगडित अभ्यासक्रम आहेत. व्यावसायिक व उद्योजकीय क्षमता निर्माण करण्यासाठी विद्यार्थ्यांना आवश्यक ती कौशल्ये संपादन करता यावीत, यासाठी आंतरसंवाद आणि तंत्रज्ञानाधारित अध्यापन-अध्ययन प्रक्रिया सहाय्यभूत ठरत आहे. विद्यार्थ्यांसाठी नावीन्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करुन सर्व क्षेत्रांची निपुणता कॅम्पसमध्ये आणण्यासाठी सोसायटी प्रयत्नांची पराकाष्ठा करत असते. सर्वकाही करताना संशोधन हाच प्रत्येक उपक्रमाचा केंद्रबिंदू ठेवण्यात आला आणि येत आहे. विविध क्षेत्रांत माजी विद्यार्थी घवघवीत यश संपादन करत आहेत, हीच गोखले एज्युकेशन सोसायटीच्या शैक्षणिक गुणवत्तेची आणि दर्जाची एक निशाणी आहे. याचे श्रेय सर डॉ. मो. स. गोसावी यांनाच द्यावे लागते.

One thought on “प्राचार्यांचे प्राचार्य

  1. गोखले एज्युकेशन सोसायटी हा साहेबांचा श्र्वास होता,
    जणूंकाही ते अखेरपर्यंत सोसायटी साठीच जगत होते.
    इतकी असाधारण बुद्धीमत्ता असलेली विद्वान व्यक्ती विरळाच.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *