कोचिंग क्लासेस चालवणार्‍या महिलेच्या घरात घरफोडी; 2 लाख 61 हजारांचा ऐवज लंपास

सिडको : विशेष प्रतिनिधी
उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भीमनगर येथील एका कोचिंग चालवणार्‍या महिलेच्या घरात घुसून चक्क कुलूप तोडून अतिक्रमण करत सुमारे 2 लाख 61 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
याबाबत फिर्यादी सुप्रिया साहेबराव आहिरे (वय 32, रा. फ्लॅट नं. 09, योगेश्वर अपार्टमेंट, भीमनगर, नाशिकरोड) ही महिला खासगी कोचिंग क्लास चालवत आहेत. फिर्यादी आहिरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार संशयित आरोपी विनोद पवार, प्रणय पगारे, अरुण पगारे व श्रुतिका पगारे यांनी घरात घुसून वरील सर्व सामान बेकायदेशीरपणे चोरून नेले.
चोरीस गेलेल्या मालामध्ये विविध इलेक्ट्रॉनिक वस्तू, मोबाइल फोन, कपाटातील कपडे, 85,000 रुपयांची रोख रक्कम, सोन्याचे दागिने (पेंडल्स, चेन, अंगठ्या) व अन्य घरगुती वस्तूंचा समावेश आहे. याशिवाय एमपीएससी व यूपीएससीसाठी आवश्यक असलेली पुस्तके आणि महत्त्वाची कागदपत्रेही चोरून नेण्यात आली आहेत. या गंभीर घटनेनंतर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, पुढील तपास उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. दरम्यान, नाशिकरोड परिसरात चोरी व जबरदस्तीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने स्थानिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. पोलिसांनी तत्काळ कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *