सावकार मुन्ना राणेकडून 13 लाखांचा मुद्देमाल जप्त

अंबड पोलिसांची यशस्वी कारवाई

सिडको : विशेष प्रतिनिधी
अंबड पोलीस ठाणे हद्दीत अवैध सावकारी करून नागरिकांची फसवणूक करणारा आणि मी सातपूर येथील पीएल ग्रुपचा सदस्य असल्याचे सांगणारा खुटवडनगर येथील विवेक उर्फ मुन्ना बारसू राणे या खासगी सावकाराकडून पोलिसांनी सुमारे 13 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या कारवाईत बलेनो कंपनीची एक चारचाकी कार आणि ट्रॅक्टर जप्त करण्यात आला असून, याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
अवैध सावकारी प्रकरणात संशयित विवेक उर्फ मुन्ना बरसू राणे हा गेल्या काही दिवसांपासून फरार होता. त्याच्या अटकेसाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त परिमंडळ 2 मोनिका राऊत, सहायक आयुक्त शेखर देशमुख, तसेच अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू होता. प्रकरणाचा तपास उपनिरीक्षक नितीन फुलपगारे करत होते. गोपनीय माहितीच्या आधारे विवेक उर्फ मुन्ना बारसू राणे हा संशयित आरोपी पाथर्डी फाटा परिसरात येणार असल्याचे समजताच पोलीस कर्मचारी किरण गायकवाड, राहुल जगझाप, अनिल गाढवे, सचिन करंजे, राकेश पाटील, मयुर पवार, स्वप्निल जुंद्रे, तुषार मते, संदीप भुरे, दीपक निकम, समाधान शिंदे, सागर जाधव, घनश्याम भोये, प्रवीण राठोड, विष्णू जाधव, संदीप डावरे, दीपक पाटील यांनी साफळा रचुन ताब्यात घेऊन कारवाई केली.
अटक केल्यानंतर पोलिसांनी खासगी सावकारी करणारा संशयित आरोपी मुन्ना राणेला विश्वासात घेऊन विचारणा केली असता, त्याने व त्याचा मित्र नीलेश जाधव यांनी अनेक नागरिकांना अवैधपणे व्याजाने पैसे देऊन त्यांच्याकडून मारुती बलेनो कार, इनोव्हा क्रिस्टा, जॉन्डिअर कंपनीचा ट्रॅक्टर व टाटा 407 टेम्पो गहाण घेतल्याचे उघड झाले. पोलिसांनी त्याच्याकडून 6 लाख रुपये किमतीची मारुती बलेनो कार आणि 7 लाख रुपये किमतीचा जॉन्डिअर ट्रॅक्टर असा एकूण 13 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी पुढील तपास उपनिरीक्षक नितीन फुलपगारे व अंमलदार दत्ता धिंदळे करीत आहेत.

नागरिकांसाठी आवाहन

मुन्ना राणे किंवा त्याच्यासारख्या अन्य अवैध सावकारांमुळे कोणत्याही नागरिकाला त्रास होत असल्यास त्यांनी तत्काळ अंबड पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. त्यांच्या समस्या पोलिसांकडून निश्चितपणे सोडवण्यात येतील.
– शेखर देशमुख, सहायक पोलीस आयुक्त, अंबड विभाग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *